amit shah sharad pawar jayant patil sarkarnama
महाराष्ट्र

Jayant Patil On Amit Shah : "पवारांना 50 वर्षापासून जनता सहन करतेय", शाहांच्या विधानावर पाटील म्हणाले...

Akshay Sabale

गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांनी मंगळवारी ( 5 मार्च ) महाराष्ट्रातून निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सभेतून अमित शाहांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यावर हल्लाबोल केला. "महाराष्ट्राची जनता शरद पवारांना 50 वर्षापासून सहन करतेय," अशी टीका अमित शाहांनी केली होती. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी भाष्य केलं आहे.

अमित शाह काय म्हणाले होते?

"उद्धव ठाकरे यांना आदित्यला आणि शरद पवार यांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे आहे. ममता बॅनर्जी भाच्याचे तर एम. के स्टॅलिन मुलाचे भवितव्य शोधण्यात व्यस्त आहेत. शरद पवारांना महाराष्ट्राची जनता 50 वर्षापासून सहन करतेय. विरोधी पक्ष 'लोकशाही' नव्हे तर 'घराणेशाही' जपण्यात 'मस्त' आहे. नरेंद्र मोदी मात्र विकसित भारताचे स्वप्न साकारण्यात व्यस्त आहे," असं म्हणत अमित शाहांनी ( Amit Shah ) विरोधकांचा समाचार घेतला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"...म्हणून त्यांना आज शरद पवार म्हणतात"

अमित शाहांच्या विधानावर जयंत पाटील ( Jayant Patil ) म्हणाले, "शरद पवारांनी शून्यातून जग निर्माण करणे ते इथेपर्यंतचा प्रवास महाराष्ट्रानं पाहिला आहे. महाराष्ट्रानं शरद पवारांना साथ दिली. सहन करण्याचा प्रश्नच कधी उद्भवला नाही. पवारांनी सगळ्या महाराष्ट्रातील जाती धर्मांना बरोबर घेऊन राजकारण केलं. त्यामुळे त्यांना आज शरद पवार म्हणतात."

"जनतेचं जीवन उभे करण्याचं काम पवारांनी केलं"

"महाराष्ट्रातील लाखो तरूण पवारांना मानतात. किल्लारीचा भूकंप झाल्यानंतर तेथील जनतेचं जीवन उभे करण्याचं काम शरद पवारांनी केलं. हे महाराष्ट्र विसरला नाही," असं जयंत पाटलांनी म्हटलं.

"उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली"

"बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना आणि सिद्धातांना अवघा देश मानत होता आणि आजही मानतो. पण, उद्धव ठाकरे राम मंदिर, सर्जिकल स्ट्राईक आणि छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध करणाऱ्यांबरोबर जाऊन बसले. ते बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असूच शकत नाही. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली," असं टीकास्र अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर सोडलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT