Yogesh Kadam-Sunil Tatkare Sarkarnama
कोकण

Konkan Politics : दापोलीत भाजप कदमांना साथ देईल; पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वाद विसरतील काय?

Vijaykumar Dudhale

Ratnagiri News : शिवसेना-भाजप युती सरकारसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार हे सामील झाले आहेत. त्यानंतर अनेक मतदारसंघाची समीकरणे बदलली आहेत. युती सरकारमध्ये दापोलीचे आमदार योगेश कदम यांचे मतदारसंघात वर्चस्व दिसून येत होते. ज्यांच्याशी आतापर्यंत दोन हात केले, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच आता सोबतीला आला आहे. खासदार सुनील तटकरे आणि आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेना-राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. नेत्यांचे मनोमिलन झाले; पण कोकणातील गावोगावचे कार्यकर्ते वाद विसरणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. (BJP will support Kadam in Dapoli; But will the activists of NCP forget the controversy?)

महाविकास आघाडी सरकार कोसळून राज्यात एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि भाजपची सत्ता आली. त्यानंतर अनेक मतदारसंघातील राजकीय गणिते बदलली आहेत. शिंदेसोबत गेलेल्या आमदारांना सुगीचे दिवस आले. रायगड लोकसभा मतदारसंघातील दापोलीतही शिवसेना आमदार योगेश कदम यांचा वरचष्मा राहिला. निवडणुकांमधून तो दिसून आला. पण, ज्यांच्याशी दोन हात केले, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच पुन्हा सत्तेत सामील झाल्याने दापोलीची समीकरणे बदलल्याचे दिसून येत आहे.

शिवसेनेने दापोलीत २०१९ पासून आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत वगळता सर्वच निवडणुकीत एकहाती वर्चस्व राखले आहे. अवघ्या चार वर्षांत आमदार कदम यांनी प्रत्येक गावांत कोट्यवधी रुपयांचा विकास निधी दिला. आमदार योगेश कदम व शिवसेना यांना मानणारा वर्ग कदमांच्या पाठीशी ठाम उभा राहिला आहे.

भारतीय जनता पक्षही केंद्रात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र यांचे हात बळकट करण्यासाठी हायकमांडच्या आदेशाचे पालन करेल. मात्र, सत्तेतील भागीदार पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कदम यांना किती बळ देतील, याबाबत निश्चितपणे खात्री देता येत नाही.

रायगडचे खासदार तथा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची दापोलीत बैठक घेतली. तसेच राष्ट्रवादी-शिवसेना पदाधिकारी यांची संयुक्त बैठक मुंबईत खासदार तटकरे आणि आमदार कदम यांच्या उपस्थितीत पार पडली आहे. दोन्ही पक्षाचे पदाधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे नेत्यांचे मनोमिलन झाल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, आमदार योगेश कदम हे गोकुळ अष्टमीच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर गेले होते. त्याच प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी हे शिवसेनेच्या व्यासपीठावर उपस्थित होते. या सर्व घडामोडीत नेत्यांचे मनोमिलन झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, गावपातळीवर लढणारे कार्यकर्ते आपापसांतील वाद विसरतील का, हा खरा प्रश्न आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT