Malegaon News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन वर्षांपूर्वी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा पुढचा अध्यक्ष तावरे आडनाव सोडून इतर आडनावाचा असेल, हा माझा शब्द आहे, असा शब्द दिला होता. तो शब्द अजित पवार यांनी अखेर खरा केला आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ॲड. केशवराव सर्जेराव जगताप यांना, तर उपाध्यक्षपदी तानाजी नामदेव देवकाते (रा. नीरावागज) यांना संधी दिली आहे. (Selection of Keshavrao Jagtap as the President of Malegaon Sugar Factory)
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर बारामतीत पहिलीच निवडणूक होत होती. त्यात अजित पवारांनी बारामतीत राजकीयदृष्ट्या आपलेच वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या निवडी बिनविरोध झाल्याने कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला.
ठरलेला साडेतीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी, तर एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर उपाध्यक्ष सागर जाधव यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. त्यांच्या रिक्त जागेवर केशवराव जगताप यांना अध्यक्ष, तर उपाध्यक्षपदी तानाजी देवकाते यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडेकर, कार्यकारी संचालक अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी संचालक मंडळाची बैठक झाली. उपमुख्यमंत्री पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी अध्यक्षपदासाठी अॅड जगताप, तर उपाध्यक्षपदासाठी तानाजी देवकाते यांची नावे जाहीर केली. त्यानुसार उपस्थित संचालकांनी या दोन्ही नावांना सहमती दर्शविली.
या वेळी बाळासाहेब तावरे म्हणाले की, ‘माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या काळात ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माळेगाव’ने प्रगती साधली आहे. त्याचा सभासदांना गर्व वाटतो. माळेगाव कारखान्याने गेल्या वर्षी गाळप केलेल्या उसाला राज्यात प्रथम क्रमांकाचा प्रतिटन ३४११ अंतिम दर जाहीर केला आहे. नेतृत्वाचे मार्गदर्शन आणि संचालकांचे सहकार्य यामुळे हे शक्य झाले.
पुढील हंगाम अडचणीचा : ॲड. जगताप
कमी पावसामुळे राज्यात आगामी हंगामात उसाची टंचाई जाणवणार आहे. त्यातही माळेगाव कारखान्याचे कार्यक्षेत्र अत्यंत मर्यादित आहे. याही परिस्थितीत माळेगाव कारखान्याने १० लाख टनांपेक्षा अधिकचा ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवत इथेनॉल प्रकल्पाचे विस्तारीकरण, कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविणे यांसारख्या कामांवर लक्ष केंद्रित करण्यात येईल, त्यासाठी संचालक, सभासद आणि कामगारांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांनी व्यक्त केली.
या वेळी संचालक तानाजी कोकरे, बन्शीलाल आटोळे, रंजन तावरे, संजय काटे, योगेश जगताप, सुरेश खालटे, अनिल तावरे, मदनराव देवकाते, प्रताप आटोळे, नितीन सातव, गुलाबराव गावडे, राजेंद्र ढवाण, स्वप्निल जगताप, संगीता कोकरे, अलका पोंदकुले, तानाजी नामदेव देवकाते, मंगेश जगताप, नितीन जगताप, सुरेश देवकाते, पंकज भोसले, कार्यकारी संचालक अशोकराव पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.