Sharad Pawar-Ajit Pawar-Ramdas kadam Sarkarnama
कोकण

Ramdas Kadam : अजित पवारांच्या विधानाचे स्वागत करत रामदास कदमांची शिवसेनेबाबत मोठी भविष्यवाणी...

Vijaykumar Dudhale

Ratnagiri, 07 September : ज्येष्ठ नेते शरद पवारांना सोडणं ही माझी चूक होती. बारामतीत घरातील उमेदवार देऊन मी चूक केली, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोलीत बोलताना दिली. त्या विधानाचे शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी स्वागत केले आहे. नातीगोती सांभाळूनही राजकारण करता येऊ शकतं, असे सांगून दोन्ही शिवसेनेच्या एकत्रीकरणाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कबुलीवर बोलताना रामदास कदम (Ramdas kadam) म्हणाले, शेवटी ही रक्ताची नाती असतात. राजकारणात गेल्यानंतर नात्यामध्ये शंभर टक्के वैमनस्यच आणायचे, हे चुकीचे आहे. नातीगोती सांभाळूनही राजकारण होऊ शकतं ना आणि हा महाराष्ट्र आहे, बिहार नाही. उलट अजितदादांच्या विचारांचे मी स्वागतच करेन.

जोपर्यंत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे काँग्रेससोबत एकत्र आहेत, तोपर्यंत शिवसेना एकत्र येणार नाही, असे मी मागेच सांगितले होते. आता पुलाखालून एवढं पाणी गेलं आहे की, आता दोन्ही शिवसेना (Shivsena) एकत्र येणं अशक्य आहे, अशा शब्दांत शिवसेनेच्या एकत्र येण्याबाबत रामदास कदम यांनी भविष्यवाणी केली.

रामदास कदम म्हणाले, शिवसेनेशी आमची अतूट बांधिलकी होती. पण, ती बाळासाहेब ठाकरेंशी होती, उद्धव ठाकरेंशी नव्हती. काँग्रेससोबत जाऊन बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी फारकत घेण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत. तेव्हा नात्याचा प्रश्न येतोच कोठे. ते नाते उद्धव ठाकरे यांनी तोडलं आहे.

दिल्लीत जाऊन सोनिया गांधींच्या पायाशी बसायचं आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला मूठमाती देण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले आहे. आता उद्धव ठाकरे आणि आमचं नातं कुठं शिल्लक राहिलं आहे. आम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा भगवा प्यारा आहे. त्या भगव्याला अधिक तेज कसं येईल, यासाठी आम्ही मरेपर्यंत दिवसरात्र प्रयत्न करणार आहोत. पण बाळासाहेब ठाकरेंचा भगवा आम्ही सोडणार नाही, जो उद्धव ठाकरेंनी सोडला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची वेळ आता निघून गेली आहे. पुलाखालून आता बरंच पाणी वाहून गेलं आहे. तो विषय संपला आता. त्या गोष्टीला आम्ही पूर्णविराम दिलेला आहे, असेही शिवसेनेच्या एकत्र येण्याच्या मुद्यावर रामदास कदमांनी भाष्य केले.

तिसऱ्या आघाडीबाबत बोलताना रामदास कदम म्हणाले, राजकारणात काहीही होऊ शकतं. पण, माझं आडनाव जोशी नसल्यामुळे मी याबाबत सांगू शकणार नाही. पण, मला एवढं माहिती आहे की, राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT