Mumbai News : राज्यातील पाच विधान परिषदेच्या जागासाठी 23 ऑक्टोबरला मतदान होत आहे. त्यामुळे वातावरण पुन्हा एकदा तापणार आहे. पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघ, छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदार संघ, नागपूर पदवीधर मतदारसंघ तर अमरावती शिक्षक मतदारसंघात निवडणूक होत आहे. या पाचही ठिकाणी होत असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी महायुती, महाविकास आघाडीतील मित्रपक्षातच उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काळात उमेदवारी मिळवताना कोणाचा पत्ता कटणार, कोणाला संधी? मिळणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
राज्यातील या पाच विधान परिषदेच्या आमदारकीची मुदत 5 डिसेंबरला संपणार आहे. त्यापूर्वीच निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या पाच जागेवर सध्या महायुतीचे वर्चस्व आहे. सहा वर्षापूर्वी निवडणुका झाल्या त्यावेळी चित्र वेगळे होते. त्यावेळी पाच पैकी चार मतदार संघावर महाविकास आघाडीचे वर्चस्व होते. त्यामध्ये दोन जागा काँग्रेसला तर दोन जागा एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या होत्या तर एका जागेवर अपक्षाने बाजी मारली होती.
त्यानंतर जून 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकार पडले. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली तर संपूर्ण राज्यातील चित्र बदलण्यास सुरुवात झाली. वर्षंभराताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उभी फूट पडली. त्याचा परिणाम या पाच जागेवर झाला. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदार संघातील आमदार सतीश चव्हाण हे अजित पवार सोबत गेले आहेत. त्यामुळे ते सध्या महायुतीसोबत आहेत. तर दुसरीकडे पुणे पदवीधर मतदारसंघात विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण लाड सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत असले तरी त्यांनी पुढील निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्या बदल्यात लाड यांनी त्यांच्या मुलाला भाजपमध्ये प्रवेश करण्यास सांगून भाजपकडून उमेदवारी फायनल करून घेतल्याची चर्चा रंगली आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघातुन ॲड. किरण सरनाईक हे अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले होते. आमदार सरनाईक यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सहयोगी आमदार झाले आहेत. उर्वरित नागपूर पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार ॲड. अभिजित वंजारी हे काँग्रेससोसबत आहेत. तर पुणे शिक्षक मतदारसंघातील आमदार जयंत आसगावकर काँग्रेससोबत आहेत. त्यामुळे सध्या आघाडीकडे तीन तर महायुतीकडे दोन असे संख्याबळ आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघात महायुतीमध्ये रस्सीखेच
पुणे पदवीधर मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या पाच जिल्ह्याचा समावेश आहे. हा मतदारसंघ एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघातून चंद्रकांत पाटील दोन वेळा विजय मिळवला होता. मात्र २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण लाड या ठिकाणी विजयी झाले होते. अरुण लाड सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत असले तरी मात्र, त्यांच्या घरातच आता मोठी राजकीय फूट पडली आहे. अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून ते स्वतः या जागेसाठी इच्छुक आहेत.
सध्या या जागेवर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचा दावा कायम आहे. स्वतः सुनेत्रा पवार यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका लावत मतदार नोंदणीचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, भाजपला हा मतदारसंघ परत मिळवायचा असून त्यांनी सरचिटणीस राजेश पांडे यांची 'मतदार नोंदणी प्रमुख' म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे महायुतीतील मित्रपक्षातच जागावाटपावरून 'आरपार'ची लढाई सुरू आहे. तर दुसरीकडे या जागेवर राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी दावा केला आहे. त्यामुळे महायुतीमधील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच दिसत आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्ये चुरस
पुणे शिक्षक मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या पाच जिल्ह्याचा समावेश आहे. या मतदारसंघात २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार जयंत आसगावकर विजयी झाले होते. या मतदारसंघात पुन्हा निवडणूक लढण्यासाठी जयंत आसगावकर इच्छुक आहेत. त्यांनी तयारी सुरु केली आहे.
त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून दोघेजण इच्छुक आहेत. एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे, मंत्री उदय सामंत यांचे ओएसडी सचिन सानप इच्छुक आहेत तर दुसरीकडे भाजप व राष्टवादी काँग्रेसकडून चाचपणी सुरु आहे. त्यामुळे याठिकाणी कोण उमेदवार असणार यावरून जोरदार रस्सीखेच दिसत आहे.
छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ :
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, बीड, धाराशिव (उस्मानाबाद) लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्याचा समावेश आहे. गेल्या 18 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी ही जागा भाजपकडून खेचून घेतली होती. 2008 पूर्वी या मतदारसंघावर भाजपची मजबूत पकड होती. जयसिंगराव गायकवाड, श्रीकांत जोशी यांच्या रूपाने पदवीधरांचे प्रतिनिधित्व भाजपकडे होते. परंतु 2008 पासून सातत्याने तीन वेळा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकला आहे.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर दिवंगत नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना-भाजप युतीच्या महायुतीमध्ये सहभागी झाला होता. तीन टर्म जागा जिंकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या मतदारसंघावर सहाजिकच पहिला दावा असणार आहे. चौथ्यांदा मराठवाडा पदवीधर मतदार संघातून विद्यमान आमदार सतीश चव्हाण हे निवडणूक लढण्यास इच्छुक असून तयारी सुरु केली आहे तर दुसरीकडे सुरुवातीपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भाजपने ही जागा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
या मतदारसंघासाठी वर्षभरापूर्वीच भाजपने प्रभारी नेमून मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. भाजपकडून देखील मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यामध्ये पदवीधर मतदार नोंदणी अभियानाची संपूर्ण धुरा आणि जबाबदारी सांभाळणारे माजी आमदार संजय केणेकर, गेल्या निवडणुकीत नोंदणीची जबाबदारी सांभाळणारे प्रवीण घुगे यांचे नाव आघाडीवर आहे. आता हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःकडे राखणार की महायुतीत सत्ताधारी भाजपाच्या दबावापुढे झुकत मतदारसंघ सोडणार? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन सत्ताधारी मित्र पक्षांमध्येच रस्सीखेच दिसत आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघ
हा मतदारसंघ नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या 6 जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार ॲड. अभिजित वंजारी हे काँग्रेससोबत आहेत. त्यांनी गेल्या निवडणुकीत 58 वर्षांपासून भाजपचा गड असलेला बालेकिल्ला सर करीत तब्बल १८,९१० मतांनी ऐतिहासिक विजय मिळवला होता.
आरएसएसचे मुख्यालय, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात २०२० मध्ये झालेला पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला होता.भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची अन् बदल्याची लढाई बनली आहे. त्यामुळे यावेळेसची निवडणूक भाजपच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.
त्यामुळे भाजपकडून यावेळेस कोणाला संधी दिली जाणार यावर बरेच काही अवलंबुन असणार आहे. भाजपमधून प्रवीण दटके, धर्मपाल मेश्राम, संदीप जोशी किंवा माजी महापौर प्रवीण कोहळे यांसारख्या प्रमुख नेत्यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे, मात्र पक्षाने अद्याप अधिकृत उमेदवाराची घोषणा केलेली नाही. दुसरीकडे या मतदारसंघात काँग्रेसकडून पुन्हा एकदा आमदार वंजारी निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. वंजारी यांची उमेदवारी आधीच निश्चित करून काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतली आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघ :
अमरावती शिक्षक मतदारसंघातुन सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महायुतीमधील मित्रपक्ष आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्ष ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. 2020 च्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी विजय मिळवला होता. तेव्हा त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांचा पराभव केला होता. तिकीट न मिळाल्यामुळे किरण सरनाईक यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यापूर्वीच आमदार किरण सरनाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करीत सहयोगी सदस्यत्व स्वीकारले आहे. शिवसेनेच्या निवडणूक लढण्याची तयारी ते करीत आहेत. दुसरीकडे माजी आमदार श्रीकांत देशपांडे हे देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते. पण शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जोशी यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या निवडणुकीत जोशी हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार होते. त्यामुळे आता शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत काँग्रेसने माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या कन्या प्रा. आदिती पोहरे यांना मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे. त्यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जवळपास निश्चित झाली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांच्या प्रा. आदिती पोहरे या सून आहेत. त्यामुळे या मतदारसंघात चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.