Mumbai News : राज्यातील राज्यसभेच्या सात जागेसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यातच बुधवारी भाजपने त्यांच्या कोट्यातील चार उमेदवार जाहीर केले तर यापूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्र्वादी काँग्रेसचा उमेदवार ठरला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नावाची घोषणा थोड्यावेळात होणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका जागेसाठी जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत होती.
बुधवारी दुपारी महाविकास आघाडीत एकमत झाले असून दिल्लीतून काँग्रेस हायकमांडचा फोन येताच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावर आघाडीचे एकमत झाले आहे. औपचारिक घोषणा बाकी आहे. त्यामुळे आता शरद पवार यांच्या 'एन्ट्री'ने राज्यसभेच्या सातही जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महायुतीही बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे सात जागेसाठी आठवा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता कमी असल्याने ही निवडणूक जवळपास बिनविरोध होणार आहे.
राज्यसभेच्या सातव्या जागेवरून महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळली. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी, राजन विचारे, विनायक राऊत यांच्या नावाची चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेसाठी शरद पवार यांचे नाव पुढे आले होते. दुसरीकडे शरद पवार यांचे नाव जाहीर झाले तर ही निवडणूक बिनविरोध करण्याची भाजपची तयारी होती. परंतु महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांची शिवसेना किंवा काँग्रेस या पक्षातील नेत्यांना उमेदवारी दिली तर भाजपदेखील सातव्या जागेसाठी उमेदवार देण्याची तयारी करीत होती. त्याचमुळे फाटाफूट टाळण्यासाठी आघाडीकडून शरद पवार उमेदवार असणार हे जवळपास फायनल झाले आहे.
विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीचे सहा आणि महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. भाजपने आपल्या चार उमेदवारांचे नाव जाहीर केले आहेत. या यादीमध्ये माजी मंत्री विनोत तावडे, आरपीआय (आठवले गट) पक्षाचे प्रमुख तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपाचे हिंगोलीत नेते रामराव वडकुते, नागपूरच्या भाजपाच्या नेत्या माया इवनाते यांचे नाव आहे. प्रत्येक एक जागा ही अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पार्थ पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पाच उमेदवार ठरले आहेत.
एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे यांचे नाव जवळपास फायनल आहे. बुधवारी रात्रीपर्यंत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. तर महाविकास आघाडीकडून खासदार शरद पवार हे पुन्हा एकदा राज्यसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे आता हीच शक्यता लक्षात घेता आता राज्यातील सातही जागा बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आघाडीचा उमेदवार ठरला
महाविकास आघाडीचा एक उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतो. या जागेसाठी शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात आहे. याआधी राज्यसभेची जागा आम्हाला द्यावी, अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती. काँग्रेसकडून माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती. मात्र दिल्लीला हायकमांडचा फोन आल्याने काँग्रेसने शरद पवार यांच्या नावाला पाठींबा दर्शवला आहे.
बिनविरोध निवडणूक होणार
राज्यसभेचा एक उमेदवार निवडून येण्यासाठी पहिल्या सपंतीच्या 37 मतांची गरज आहे. महायुतीचे संख्याबळ 232 आहे. शिंदे गटाकडे 20 मते तर अजित पवार यांच्या पक्षाकडे तीन मते अतिरिक्त आहेत. त्यामुळे ऐनवेळी मतांची जुळवाजुळव करून भाजप सातव्या जागेसाठी ताकद लावण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु आता सातव्या जागेसाठी शरद पवार यांचेच नाव निश्चित झाल्याने सातवी जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.