Mumbai News : राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. मात्र, महायुतीमध्ये भाजपच मोठा भाऊ ठरला आहे. भाजपने संपूर्ण महाराष्ट्रावरील पकड निवडणुकीगणीस आणखीनच पक्की केली आहे. विशेषतः अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकीत कोणाचे वर्चस्व असणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अजितदादानंतर पश्चिम महाराष्ट्रावर वर्चस्व मिळवण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्लॅन या निवडणुकीत सीएम देवेंद्र फडणवीस यांनी उधळून लावला.
बारामतीजवळील विमान अपघातात 28 जानेवारीला अजित पवार यांचे निधन झाले. ऐन जिल्हा परिषदेच्या निवडणूक काळातच त्यांचे निधन झाल्याने निवडणूक चार दिवस पुढे ढकलण्यातही आली होती. अजित पवार यांच्या निधनानंतर, त्यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील बालेकिल्ल्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी महायुतीतच चढाओढ सुरू झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागात मोठ्या प्रमाणावर दौरे करून स्वतःची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला होता. विशेषता या काळात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत 12 पैकी सर्वाधिक पाच जिल्हा परिषदा पश्चिम महाराष्ट्रातील होत्या.
राज्याच्या राजकारणात पश्चिम महाराष्ट्र आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. राष्ट्र्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर याठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यामुळे या निवडणुकीत देखील अजित पवार यांची राष्ट्रवादी बाजी मारेल असे चित्र होते. मात्र,अजित पवार यांच्या निधनांनंतर पहिल्यांदाच पश्चिम महाराष्ट्रात स्पेस निर्माण झाली होती. ही निर्माण झालेली स्पेस भरून काढण्यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपने मोठे प्लॅनिंग केले होते. मात्र, या निवडणुकीतील निकाल पाहता एकनाथ शिंदे यांचा हा प्लॅन सीएम देवेंद्र फडणवीस यांनी उधळून लावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अत्यंत शांतपणे स्थानिक पातळीवर भाजपची संघटनात्मक ताकद वापरली. पुणे, सांगली आणि सातारा यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांत शिंदेंच्या शिवसेनेला आणि राष्ट्रवादीच्या उरल्यासुरल्या गटाला बाजूला सारत भाजपने मोठे यश मिळवले. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत पहिल्यांदाच मोठी चुरस पाहवयास मिळाली.
भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच प्रमुख लढत पाहवयास मिळाली. या निवडणुकीत काही ठिकाणी महायुती म्हणून एकत्रित लढले तर काही ठिकाणी ही तीन पक्ष एकमेकांविरोधात लढले. मात्र शेवटी जनतेनेच त्रिशंकू कौल दिला. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत काही तडजोडी या सर्वच पक्षांना कराव्या लागल्या आहेत.
त्यामध्ये कोल्हापूर झेडपीत महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार पक्षाचा अध्यक्ष झाला आहे. तर भाजपचा उपाध्यक्ष झाला आहे. पुणे झेडपीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर सत्तास्थापन केली आहे. तर सांगली झेडपीत महाविकास आघाडीचे अध्यक्ष उपाध्यक्ष झाले आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपने दूर ठेवले आले. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश अबिटकर, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, सांगलीतील शिंदे सेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या कचखाऊ भूमिकेने हे घडले आहे. हाती आलेली सत्ता एकनाथ शिंदे यांच्या हातातून निसटली आहे.
पुणे, सोलापूर जिल्हा परिषदेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठे अपयश आले आहे. सातारा व सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपने स्वतःच्या हिंमतीवर अध्यक्ष, उपाध्यक्ष भाजपचा केला आहे. सातारा व सोलापूर जिल्हा हा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. याठिकाणी झेडपी निवडणुकीत भाजपने एकहाती वर्चस्व निर्माण केले आहे. या दोन्ही ठिकाणी सत्तास्थापन करीत असताना सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भूमिका महत्वपूर्ण ठरली आहे. त्याचमुळे अजितदादानंतर पश्चिम महाराष्ट्रावर वर्चस्व मिळवण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्लॅन या निवडणुकीत सीएम देवेंद्र फडणवीस यांनी उधळून लावता आला आहे.
एकनाथ शिंदेंचा पश्चिम महाराष्ट्रातील विस्तार रोखला
राज्यातील 188 नगरपालिका व नगरपंचायतींपैकी 117 ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. तर 29 महापालिकांपैकी 20 ठिकाणी भाजपचा महापौर बसला आहे. त्याशिवाय 12 पैकी 8 जिल्हा परिषदांवर कब्जा मिळवून भाजपने महायुतीमध्ये आपणच 'मोठा भाऊ' असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा पश्चिम महाराष्ट्रातील विस्तार रोखण्यासाठी भाजपने 'छुप्या' पद्धतीने काम केल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात या निमित्ताने रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.