

Dharashiv News : धाराशिव जिल्हयातील आठ पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी शुक्रवारी (दि.6 मार्च) निवडणूका पार पडल्या. या निवडणुकीत महायुतीचे एक हाती वर्चस्व दिसून आले. जिल्ह्यातील आठ पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व दिसून आले. त्यामध्ये धाराशिव, तुळजापूर पंचायत समितीमध्ये भाजपचा सभापती झाला तर उमरगा, लोहारा व कळंब येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा सभापती झाला आहे. तर उमरगा, धाराशिव, लोहारा व कळंब पंचायत समितीमध्ये महिला सभापती विराजमान होणार आहेत.
धाराशिव पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या (BJP) इर्ला पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या गोकर्णा गोपाळ कदम तर वडगाव सिद्धेश्वर गणातून निवडून आलेले प्रमोद पाटील यांची उपसभापती म्हणून निवड झाली. पंचायत समितीच्या 24 गणांपैकी 12 जागा जिंकत भाजपने वर्चस्व सिद्ध केले, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 2 जागांवर विजयी झाली. याशिवाय भाजप पुरस्कृत एक उमेदवारही विजयी झाला. त्यामुळे महायुतीने मिळून स्पष्ट बहुमत मिळवले. दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आठ जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) एका जागेवर विजयी झाली आहे. एकूण संख्याबळ पाहता पंचायत समितीवर महायुतीचे स्पष्ट वर्चस्व दिसून येत आहे. धाराशिव पंचायत समिती ही तुळजापूर व धाराशिव-कळंब या विधानसभा मतदारसंघांत विभागली आहे.
उमरग्यात काँग्रेसच्या मदतीने शिंदेंच्या शिवसेनेचा सभापती
उमरगा पंचायत समितीवर महायुतीचे वर्चस्व आहे. या ठिकाणचे सभापतिपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षीत होते. या पदावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या व माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची कन्या आकांक्षा चौगुले यांची बिनविरोध निवड झाली. उमरगा पंचायत समिती निवडणूकमध्ये कोणत्याच एका पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. या निवडणुकीत भाजप 7, शिवसेना 5, काँग्रेस 3,राष्ट्रवादी 1,मनसे व उद्धव शिवसेना 1, अपक्ष एक असे बलाबल आहे. सभापती पदासाठी शिवसेनेकडून माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या कन्या इच्छुक होत्या. तर भाजपकडून जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे हे इच्छुक होते.
शिवसेना व भाजपकडून सभापती पदासाठी प्रचंड ताकद लावण्यात आली होती. बैठकाही घेण्यात आल्या. शेवटी शिवसेनेने काँग्रेस व अपक्ष यांची जुळवाजुळव करून बहुमताचा 10 हा आकडा गाठला. त्यामध्ये शिवसेनेला यश आल्याने आकांक्षा चौगुले या बिनविरोध सभापती झाल्या. तर उपसभापती पदाकरिता निवडणूक घेण्यात आली. यात अपक्ष म्हणून निवडून आलेल्या रेखा इंगळे यांनी भाजपच्या दगडू पाटील यांचा तीन मतांनी पराभव केला. उपसभापती रेखा इंगळे यांना 10 मते पडली तर भाजपच्या दगडू पाटील यांना 7 मते पडली. यावेळी मनसे -शिवसेना आघाडीचे हरी जाधव गैरहजर राहिले. विशेष म्हणजे शिवसेना भाजप यांनी ही निवडणूक युती म्हणून लढविली होती.
लोहारा पंचायत समिती सभापतीपदी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पल्लवी दादासाहेब जानकर तर उपसभापती पदी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अमोल पांडुरंग पाटील यांची निवड करण्यात आली. याठिकाणी महायुतीचे वर्चस्व पाहवयास मिळाले. शिंदे यांच्या शिवसेनेचे चार, भाजपचे तीन तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचा एक सदस्य निवडून आला होता.
तुळजापूर पंचायत सभापतिपदी भाजपचे विक्रम देशमुख, यांची तर उपसभातिपदी रोहिणी मेलगिरी यांची बिनविरोध निवड झाली. याठिकाणी भाजपकडे एकहाती बहुमत असल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली. या ठिकाणचे सभापतिपद सर्वसाधारण पुरुषासाठी खुले होते.
कळंब पंचायत समितीत ईश्वर चिठ्ठीची महायुतीला साथ
कळंब पंचायत समितीमध्ये महायुतीमधील भाजप व एकनाथ शिंदेची शिवसेना दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ समान होते. मात्र यावेळी सभापती, उपसभापती निवडणुकीत ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. त्याचा फायदा महायुतीला झाला अन त्यांचाच सभापती शिंदेंच्या शिवसेनेचा तर उपसभापती भाजपचा झाला.
कळंब पंचायत समिती सभापतीपदी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या राजश्री वर्पे यांची निवड करण्यात आली तर उपसभापतीपदी भाजपच्या प्रणिता चव्हाण यांची निवड करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.