

Pune News : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. त्यामुळे अनेक ठिकाणी महायुतीने मित्रपक्षांच्या मदतीने सत्तास्थापन केली. त्यामुळे पंचायत समिती व जिल्हा परिषदेत सत्तास्थापन करताना भाजपचा वरचष्मा राहिला आहे. मात्र, भाजपने काही ठिकाणी मित्र पक्षांना गृहीत धरणे त्यांच्या अंगलट आले आहे. त्यामुळेच गेल्या 24 तासांत भाजपला 3 मोठे धक्के बसले आहेत. याठिकाणी महायुतीमधील मित्रपक्षांनीच त्यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे.
स्थानिक समीकरणे लक्षात घेऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जुन्नरमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शिंदे यांची शिवसेना एकत्र आली. तर दुसरीकडे भाजप नको म्हणून मिरज पंचायत समिती निवडणुकीत शिंदेसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यामुळे मिरजेत सर्वाधिक जागा जिंकून भाजप सत्तेपासून दूर राहिला तर हवेलीत भाजपच्या हातात सत्तेची सूत्रे जाऊ नये म्हणून अपक्षाच्या मदतीने राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली.
जुन्नरमध्ये भाजपच्याविरोधात दोन्ही सेना एकत्र
जुन्नर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना या दोन्ही सत्तेसाठी एकत्र आल्या. सभापतीपदी शिंदे शिवसेनेच्या पक्षाच्या कमल शेळकंदे विराजमान झाल्या तर उपसभापतीपदी शिवसेना ठाकरे पक्षाचे अमित ढोले यांची निवड झाली.
याठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेचे (Shivsena) आठ सदस्य निवडून आले होते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सहा सदस्य विजयी झाले. भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा एक सदस्य निवडून आला. त्यामुळे जुन्नर पंचायत समितीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. शिंदेसेनेला सत्ता मिळविण्यासाठी ठाकरेंच्या सेनेची किंवा भाजपचा पाठिंबा आवश्यक होता. मात्र, शिंदेसेनेने भाजपचा पाठिंबा न घेता ठाकरे सेनेचा पाठिंबा घेऊन सत्ता मिळवली.
मिरजमध्ये शिंदेंची शिवसेना काँग्रेससोबत
सांगलीतील मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला (BJP) सत्तेपासून दूर ठेवले. याठिकाणी अवघ्या 21 वर्षांची तन्वी सुनील कमलेकर यांची सभापतिपदी निवड झाली. शेवटच्या क्षणी घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर याकामी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची महाविकास आघाडीला साथ मिळाली. सांगलीचे माजी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या नेतृत्वात मिरजेत भाजपला यश मिळाले.
पंचायत समितीच्या 22 जागांपैकी 10 जागांवर भाजपचे सदस्य जिंकून आले. त्याखालोखाल राष्ट्रवादी शरद पवार गट 4, काँग्रेस आणि अजित पवार गट 3 तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 2 जागा मिळाल्या. भाजपने सर्वात जास्त जागा जिंकल्याने सभापतीपदाच्या निवडणुकीत समीकरणे जुळवून आणेल, अशी चर्चा असताना मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची महाविकास आघाडीला साथ मिळाली.
हवेलीत अपक्षाच्या मदतीने राष्ट्रवादी सत्तेत
हवेली पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती निवडणुकीत अपक्ष उमेदवाराच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आली. सभापतीपदी युवराज काकडे तर उपसभापतीपदी अपक्ष सदस्या विद्या गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. हवेली पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी 7 सदस्यांची गरज होती. निवडणुकीत राष्ट्रवादीने 6 जागांवर तर भाजपने 4 जागी विजय मिळवला.
शिंदे यांची शिवसेना आणि अपक्ष उमेदवाराने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. यामध्ये सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एक जागेची आवश्यकता होती. अपक्षाची मदत घेऊन राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली. त्यांनी भाजपची मदत घेतली नाही. त्यामुळे या तीन ठिकाणच्या पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे या तीन ठिकाणी संधी असताना बॅकफूटवर यावे लागले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.