Eknath Shinde, Manoj Jarange Sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : "तुम्ही असाल दादा, पण...", मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' विधानावर जरांगे-पाटलांचं प्रत्युत्तर

Akshay Sabale

मराठा समाजाला ( Maratha Reservation ) ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी गेल्या 16 दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) यांनी रविवारी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्रमक भाषेत टीका केली. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, यासाठी फडणवीस प्रयत्न करत असल्याचा आरोप जरांगे-पाटलांनी केला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जरांगे-पाटलांना सुनावलं होतं. "जरांगें-पाटलांची भूमिका सतत बदलत गेली," असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी टीका केली होती. याला जरांगे-पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

"मुख्यमंत्री शिंदेंना असं बोलणं शोभत नाही. मी काय बदललो? सगेसोयऱ्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी का केली नाही? यासाठी मराठ्यांनी तुमच्यावर विश्वास टाकला होता का? बदलू नका... तुम्ही असाल दादा. पण, मराठ्यांपेक्षा मोठं कुणी नाही. देवेंद्र फडणवीसांचं ऐकून तुम्ही त्यांची भाषा बोलू नका. तुम्हाला खूप वेळ दिला आहे," असं जरांगे-पाटलांनी सांगितलं.

"सगेसोयऱ्याची अंमलबजावणी, हैदराबाद गॅझेट घेण्याची जबाबदारी तुमची होती. मग, मी कोणती मागणी वाढवली? कुणबी प्रमाणपत्र देण्याचं बंद केलं आहे. शिंदे समिती काम करत नाही. याची-त्याची स्क्रिप्ट मी वाचत नाही. इथे जातच आमची स्क्रिप्ट आहे. मुंबईला आल्यावर कुठे लपून बसला होता, हे नका काढायला लावू. माझ्यावर आरोप करण्यासाठी तुमच्यातील प्रवक्ता, भाजपचे मंत्री पळतात. हे तुम्हाला चालतं का?" असा सवाल जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना उपस्थित केला आहे.

'जरांगे-पाटलांनी भाषा ही राजकीय असून त्यामागे कोणतरी असल्याचा वास येतोय,' असा संशय मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला होता. याबद्दल विचारल्यावर जरांगे-पाटील म्हणाले, "तुम्ही दगाफटका करत आहात.. तुमच्या राजकारणासाठी मराठ्यांना मारता का? सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करावी, हैदराबाद गॅझेट आणणार हे तुमचं आश्वासन होतं. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांच्या दावणीला बसू नये. विचार करावा... अजूनही मराठा समाज मुख्यमंत्र्यांच्या बाजूनं बोलत आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT