Dharashiv News : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. कोणती जागा कोणत्या पक्षाने लढवावी हे अद्याप निश्चित झालेले नाही,असे असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने 'दादागिरी' करत धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे ठरले, असे म्हणत उमेदवारही जाहीर करून टाकला आहे. महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने यावर आक्षेप घेतला असून, ही महायुतीची भूमिका नाही, वरिष्ठ नेते निर्णय घेतील असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही दादागिरी अजितदादा गटाच्या अंगलट तर येणार नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महायुतीतील तिन्ही पक्षांतील इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) धाराशिवला आले होते. त्यांनी भाजपची बैठक घेऊन लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले होते.
राज्यात भाजपचे मिशन 45 चे ध्येय आहे, म्हणजे भाजपला लोकसभेच्या 45 जागा जिंकावयाच्या आहेत. त्यामुळे महायुतीतील सहकारी पक्षांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. उमेदवारी मिळाली तर आपल्या विजयासाठी भाजप जीव तोडून प्रयत्न करणार, याची जाणीव महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांना झाली आहे. (Dharashiv Politics)
भाजपमधून इच्छुकांची संख्या मोठी आहे. अजित पवार गटाकडून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार इच्छुक आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी मात्र या सर्वांवर कडी केली आहे. महायुतीचे ठरले असून, धाराशिव लोकसभा मतदारसंघ अजित पवार (Ajit Pawar) गटाला सुटणार आहे. आमचा उमेदवारही अजित पवार यांनी निश्चित केला आहे, असे 11 डिसेंबर रोजी धाराशिव येथे पत्रकार परिषदेत त्यांनी जाहीर करून टाकले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
धाराशिव लोकसभा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार असून, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या नावावर अजित पवार यांनी शिक्कामोर्तब केल्याचे त्यांनी सांगितले. धुरगुडे यांचा हा आततायीपणा महायुतीत मतभेद निर्माण करणारा ठरू शकतो.
धाराशिव लोकसभा मतदारसंघ अजित पवार गटाला सुटला तर उमेदवार प्रा. सुरेश बिराजदार हेच उमेदवार असतील हे निश्चित आहे. त्यांनी प्रा. बिराजदार यांना तसा निरोप दिला आहे. त्यानुसार ते कामाला लागले आहेत. आपल्यालाच उमेदवारी मिळणार, असे गृहीत धरून शिवसेना शिंदे गटाकडून माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड हेही कामाला लागले आहेत. महायुतीत सर्वात मोठा 'प्लेयर' असलेल्या भाजपमध्ये याबाबत संयम असल्याचे दिसून येत आहे. भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी आहेच, मात्र जागा भाजपलाच सुटणार आणि मलाच उमेदवारी मिळणार, असे एकाही इच्छुकाने अद्याप तरी म्हटलेले नाही.
यांसदर्भात भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य-पाटील यांनी 'सरकारनामा'ला सांगितले, धाराशिव लोकसभा मतदारसंघ महायुतीतील कोणत्या पक्षाला सुटणार याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे. त्यासंदर्भात आम्हाला अद्याप निरोप आलेला नाही. तसेही यासंदर्भात राज्य पातळीवरून अजून काही ठरलेले नाही. त्यामुळे जागा आम्हालाच सुटली, असे कसे म्हणता येईल? राष्ट्रवादी काँग्रेसने काय बोलावे, हा त्यांचा प्रश्न आहे, मात्र जागावाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही, असेही चालुक्य यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष सूरज साळुंके यांनी 'सरकारनामा'ला सांगितले, उस्मानाबादचे विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Omraje Nimbalkar) हे आता ठाकरे गटात असले तरू ते धनुष्यबाणावर लढलेले आहेत. त्यामुळे महायुतीत ही जागा आमचीच आहे. असे असले तरी याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत घेतील, असेही साळुंके यांनी स्पष्ट केले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.