MP hemant Patil, Ambadas Danve Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve On Hemant Patil : हेमंत पाटील तुम्हाला मातोश्रीवरचा सन्मान पचवता आला नाही, उमेदवारी जाताच दानवेंनी डिवचले..!

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : महायुतीचे राज्यातील जागावाटप रखडले आहे. ज्यांची उमेदवारी जाहीर केली, त्यांच्याविरोधात मित्रपक्षांनीच विरोधाचा सूर लावला. त्यामुळे राज्याच्या सत्तेत मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याच शिवसेनेच्या जाहीर केलेल्या उमेदवारांना बदलण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावली आहे. वाशीम-यवतमाळच्या भावना गवळी, हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी भाजपच्या दबावामुळे मागे घेण्यात आली आहे.

यावरून आता शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हेमंत पाटील यांना मातोश्रीवर मिळत असलेल्या सन्मानाची आठवण करून देत डिवचले आहे. शिवसेनेत, मातोश्रीवर सन्मान मिळत होता तो हेमंत पाटील यांना पचवता आला नाही. शिवसेनेतील स्वातंत्र्य सोडून भाजपची गुलामी पत्करली, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत. जाहीर झालेली उमेदवारी केवळ भाजपचा दबाव म्हणून बदलावी लागावी, यापेक्षा मोठी नामुष्की काय असावी.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

असा दबाव उद्धवसाहेबांवर टाकण्याची हिंमत कधीच कोणाची झाली नाही. आता कुठे जाणार तुम्ही गद्दारांनो? लोकसभा (Lok Sabha) हा तर ट्रेलर आहे.. तुमचे दिल्लीश्वर विधानसभेत पूर्ण पिक्चर दाखवतील, अशा शब्दांत दानवे यांनी शिंदे गटाच्या जखमेवर मीठ चोळले. हिंगोलीत शिवसेनेचा विद्यमान खासदार असतानाही ही जागा आपल्याकडे घेण्यासाठी शिंदे सेनेला बरीच ताकद लावावी लागली. इकडून-तिकडून जागा मिळाली, हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांच्याविरोधात भाजपने मोहीम सुरू केली.

हिंगोली जिल्ह्यातील भाजपच्या (BJP) आजी-माजी आमदारांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेत हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलावी, अशी मागणी लावून धरली. भाजपला जागा सोडायची नसेल तर शिवसेनेच्या धनुष्यबाणावर आम्ही लढायला तयार आहोत, अशी टोकाची भूमिका घेतली.अखेर भाजपच्या या दबावाला मुख्यमंत्री बळी पडले.

हेमंत पाटील यांची उमेदवारी कापली असली तरी त्यांच्यासाठी दिलासादायक गोष्ट म्हणजे त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ- वासीममधून उमेदवारी देण्यात आली आहे. तिथे भावना गवळी यांची उमेदवारी कापण्यात आल्यामुळे त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. अशावेळी शिंदे सेनेकडून हिंगोलीची हक्काची जागा तर गेलीच, पण यवतमाळ-वाशीममध्ये राजश्री पाटील यांच्या विजयाचीही खात्री देता येत नाही. त्यामुळे भाजपने शिवसेना शिंदे गटाची लोकसभा निवडणुकीत पुरती कोंडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

Edited By : Chaitanya Machale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT