sambhaji patil nilangekar- amit deshmukh News sarkarnama
मराठवाडा

Amit Deshmukh-Sambhaji Patil Nilangekar News : लातूरमध्ये पुन्हा देशमुख-निलंगेकर प्रेमाचे भरते! हमदर्द हमदोस्त होणार..

Political circles in Latur are once again abuzz with talks of a renewed friendship between Amit Deshmukh and Sambhaji Patil Nilangekar : मंत्री म्हणून दोघांनीही केलेल्या विकास कामावरून गेल्या काही वर्षात अनेकदा या दोन नेत्यांमध्ये खटकेही उडाल्याचे दिसून आले.

Jagdish Pansare

Latur Political News : लातूर जिल्ह्याच्या राजकारणात देशमुख यांची गढी आणि निलंगेकर असा वाद कायम राहिला आहे.जिल्ह्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांची मैत्री ही परंपरा देखील अनेक वर्ष चालली. दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्यातील मैत्रीचे किस्से आजही राजकारण्यांसाठी आदर्श ठरतात. याच आपल्या नेत्यांच्या राजकारणापलीकडील मैत्रीचा वस्तूपाठ सध्याचे जिल्ह्यातील दोन नेते गिरवू पहात आहेत.

राजकारणाच्या आखाड्यात निवडणुका असतील तेव्हा एकमेकांवर तुटून पडणारे माजी मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) आणि संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात सध्या मैत्रीचे वारे वाहू लागले आहे. लातूरमध्ये झालेल्या एका खाजगी कार्यक्रमात अमित देशमुख आणि संभाजी पाटील निलंगेकर बऱ्याच दिवसांनी एकत्र आले. विशेषत: विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते काठावर पास झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ते काय बोलतात?याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.अपेक्षेप्रमाणे दोघांनीही एकमेकांना चिमटे काढत हमदर्द आता हमदोस्त व्हायला हरकत नाही, अशी साद घातली.

अमित देशमुख यांनी संभाजी पाटील निलंगेकर (Sambhjipatil Nilangekar) यांच्या भाषणातील शेरोशायरी चा धागा पकडत लातूरच्या विकासासाठी सगळे मतभेद बाजूला ठेवून मी आणि संभाजी पाटील निलंगेकर एकत्र काम करायला तयार आहोत,अशी ग्वाही दिली. राजकारण आमचं निवडणुकीपुरतं असतं निवडणुका संपल्या की आम्ही एकमेकांची मित्र असतो, असेही देशमुख यांनी जाहीरपणे सांगितले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत लातूर पेक्षा माझे जास्त लक्ष निलंगाकडे होते.

तर संभाजी पाटील निलंगेकर यांचेही लक्ष त्यांच्या मतदारसंघापेक्षा लातूरकडे अधिक होते,त्याचा परिणाम काय झाला हे निकालानंतर दिसूनच आले,असा टोलाही अमित देशमुख यांनी लगावला. त्यामुळे आम्ही दोघे हमदर्द आहोत. आता हे दोन हमदर्द हमदोस्त कसे होतील? यासाठी आमचे प्रयत्न असणार आहे. अमित देशमुख यांच्या या मैत्रीच्या हाताला संभाजी पाटील निलंगेकर यांनीही टाळी देत भविष्यात लातूरच्या विकासासाठी आम्ही दोघे एकत्रपणे काम करू, असा विश्वास उपस्थितांना दिला.

राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना संभाजी पाटील निलंगेकर हे कॅबिनेट मंत्री होते. तर त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर अचानकपणे काँग्रेसकडून अमित देशमुख यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली. या कार्यकाळात मंत्री म्हणून दोघांनीही केलेल्या विकास कामावरून गेल्या काही वर्षात अनेकदा या दोन नेत्यांमध्ये खटकेही उडाल्याचे दिसून आले.

त्यामुळे एकत्र आले की मैत्रीची भाषा करणारे निलंगेकर-देशमुख हे एकमेकांची पाठ फिरताच पुन्हा आपल्या अजेंड्यानुसारच काम करतात, हा अनुभव लातूरकरांसाठी नवा नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात देशमुख आणि निलंगेकर हे हमदर्द हमदोस्त होतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अमित देशमुख सध्या विरोधी पक्षात आहेत तर संभाजी पाटील निलंगेकर सत्ताधारी असूनही त्यांच्या हाती फारसे काही लागलेले नाही. राज्यात महायुतीचे 238 आमदार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांच्या मंत्रिमंडळात लातूरला प्रतिनिधित्व मिळाले नाही.

याला लातूर जिल्ह्यातील भाजपातील अंतर्गत गटबाजी जबाबदार असल्याचे बोलले जाते. देवेंद्र फडणवीस यांचे लाडके अभिमन्यू पवार आणि संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू होती. या दोघांच्या वादात लातूरचे मंत्रिपद हुकले अशी चर्चा आहे. त्यामुळे नाराज निलंगेकर यांनी विरोधी पक्षात असलेल्या आणि काठावर निवडून आलेल्या अमित देशमुख यांची स्वतःशी तुलना करत त्यांना हमदर्द असे म्हटले. हमदर्द आता हम दोस्त झाले पाहिजे, अशी सादही घातली. आता ही साद त्यांनी किती मनापासून घातली आणि त्याला देशमुख कसा प्रतिसाद देतात? यावर जिल्ह्यातील पुढील राजकारण अवलंबून असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT