Ashok Chavan News, Nanded Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan Resign From Congress: अशोक चव्हाणांचा राजीनामा अन् महाविकास आघाडी 'चेकमेट'?

Mahavikas Aghadi News : अशोक चव्हाणांनी हात दाखवल्याने महाविकास आघाडी पेचात..

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा देत आपल्याच पक्षाला हात दाखवला. आपण जोपर्यंत काँग्रेससोबत होतो प्रामाणिकपणे काम केले, असे सांगत अशोक चव्हाण यांनी साळसुदपणाचा आव आणला. पण त्यांच्या ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला हात देण्यामुळे मराठवाड्यात महाविकास आघाडीचे मिशन धोक्यात आले आहे.

महाविकास आघाडीचे जागावाटप, वंचित आघाडीला सोबत घेण्याचा निर्णय या सगळ्या प्रक्रियेत अशोक चव्हाण यांचा मोठा सहभाग होता. राज्यातील काँग्रेसचे बडे नेते म्हणून त्यांनीच आघाडीत पक्षाचे नेतृत्व केले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आता एका क्षणात ते या महाविकास आघाडीचा भाग नाही म्हटल्यावर मित्रपक्ष असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी पक्षाला धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात चव्हाणांच्या पक्ष सोडण्यावर भाष्य करत याचा संबंध थेट आदर्श घोटाळ्याशी जोडला.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अद्याप यावर प्रतिक्रिया आलेली नाही. तर महाविकास आघाडीचा नुकताच भाग बनलेल्या वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनीही चव्हाण यांच्या काँग्रेस (Congress) सोडून भाजपमध्ये जाण्याच्या शक्यतेबद्दल आश्चर्य व्यक्त न करता भाजपचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरतील असा दावा केला आहे. महाविकास आघाडीच्या निर्णय प्रक्रियेतील महत्वाचे नेते असलेल्या अशोक चव्हाणांच्या पक्ष सोडल्यामुळे महाविकास आघाडीला राज्यात आणि मराठवाड्यातही आपली रणनीती पूर्णपणे बदलावी लागणार आहे.

विशेषतः नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, जालना या काँग्रेसचा प्रभाव असलेल्या जिल्ह्यांमध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्ष असलेल्या शिवसेना- राष्ट्रवादीला डॅमेज कंट्रोलसाठी वेगाने पावलं उचलावी लागणार आहेत. मराठवाड्यातील काँग्रेसच्या इतर आमदारांची भूमिका काय आहे? हेही दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे. यातील काहीजण अशोक चव्हाण यांच्यासोबत जाण्याची शक्यता पाहता आघाडीला तिथेही तातडीने पर्याय निर्माण करावे लागणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता मराठवाड्यातील सर्वात मोठे नेते म्हणून अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे एकमेव होते. त्यांची जागा भरून काढू शकेल, काँग्रेसच्या पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांना थोपवू शकेल असा एकही चेहरा सध्यातरी दिसत नाही. कधी काळी राज्यातील काँग्रेसचं नेतृत्व करणाऱ्या लातूर जिल्ह्यात सेटलमेंटच्या राजकारणामुळे इथे पक्षाची दयनीय अवस्था झाली आहे. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा चालवणाऱ्या अमित-धीरज या देशमुख पुत्रांभोवतीही सध्या संशयाचे वातावरण आहे.

डॅमेज कंट्रोल कसे करणार?

शिवराज पाटील चाकूरकर, दिलीपराव देशमुख यांच्यासारखे नेते आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत. ते मैदानावरची लढाई आता करू शकत नाहीत. अशावेळी मराठवाड्यात काँग्रेस पक्ष तर अडचणीत आला आहेच, पण लोकसभा निवडणुक दोन महिन्यांवर आलेली असतांना महाविकास आघाडीतील शिवसेना-राष्ट्रवादी अधिक अडचणीत सापडले आहेत. आधीच या दोन्ही पक्षात फूट पडल्यामुळे त्यांची ताकद विखुरली गेली आहे. त्यात ज्या काँग्रेचा लोकसभा निवडणुकीत आधार मिळणार होता, तिलाही भाजपने सुरूंग लावला.

निवडणुकीला अगदी कमीवेळ असताना अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस सोडून जाण्याने होणारे नुकसान महाविकास आघाडीला महागात पडणार आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जनसंवादच्या निमित्ताने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात केली आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार अद्याप बाहेर पडेलेल नाहीत. अशावेळी अशोक चव्हाणांमुळे महाविकास आघाडीचे झालेले डॅमेज, कसे कंट्रोल करणार? हा नेत्यांपुढे खरा प्रश्न असणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT