Eknath shinde, devendra fadnavis, hemant patil, ashok chavan  Sarkarnama
मराठवाडा

Eknath Shinde On Mahayuti : अशोक चव्हाण यांच्या 'स्वबळा'ची हवा एकनाथ शिंदे यांनी नांदेडमध्येच काढली!

Ashok Chavan advocates for self-reliance in Nanded, while Eknath Shinde hints at joining the Mahayuti alliance to contest elections. : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युतीत लढायची की स्वबळावर? याचा निर्णय स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून घेतला जाईल, अशी भूमिका सुरुवातीला महायुतीतील सर्वच घटक पक्षांनी घेतली होती.

Jagdish Pansare

Shivsena News : भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी कार्यकर्ता मेळाव्यात आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याचे आवाहन केले होते. राज्यात महायुतीची सत्ता असताना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळाची भाषा अशोक चव्हाण यांच्याकडून झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यात याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र चव्हाण यांच्या स्वबळाची नांदेडमध्येच हवा काढत, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचा झेंडा डौलाने फडकवा, असे आवाहन केले.

नांदेड जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढली आहे, राज्यात आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री आहे. तर केंद्रातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपले सरकार आहे. तेव्हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आपण स्वबळावर लढल्या पाहिजेत. प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे. तुम्ही निर्णय घ्या, तुम्ही म्हणाल तेच होईल, असे म्हणत अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी स्वबळाचा नारा दिला होता. त्यानंतर नांदेड मध्ये महायुतीत कुरबुरी सुरू झाल्या.

शिवसेना (Shivsena) नांदेड उत्तर मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी भाजप मध्ये आलेल्या नव्या लोकांनी मा‍झ्या विरोधात काम केले. मतदार संघात पैसे वाटल्याचा आरोप करत अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला होता. तर शिवसेनेचे दुसरे आमदार तथा विधान परिषदेतील गट नेते हेमंत पाटील यांनीही अशोक चव्हाण म्हणजे भाजप नव्हे, त्यांच्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडत आहे, असा आरोप केला. एवढेच नाही तर त्यांची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे सांगत खळबळ उडवून दिली होती.

या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचा आभार दौरा नांदेडमध्ये पार पडला. यावेळी केलेल्या भाषणात आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायत अशा सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचा झेंडा डौलाने फडकवा, असे आवाहन केले. यातून त्यांनी अशोक चव्हाण यांच्या स्वबळातील हवाच काढल्याची चर्चा सुरू झाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युतीत लढायची की स्वबळावर? याचा निर्णय स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून घेतला जाईल, अशी भूमिका सुरुवातीला महायुतीतील सर्वच घटक पक्षांनी घेतली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील राज्य पातळीवरचे काही नेते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक महायुती एकत्रितच लढणार असे बोलू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेड मध्ये केलेल्या स्वबळाच्या भाषेला एकनाथ शिंदे यांनी तिथेच उत्तर दिले.

अशोक चव्हाण यांचा भाजप मध्ये प्रवेश झाल्यापासून ते नांदेड जिल्ह्यात आपला स्वतंत्र गट तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी नुकताच केला. अधिकार्‍यांच्या बदल्या व इतर शासकिय कामात चव्हाण हस्तक्षेप करतात, दबाव आणतात. युतीत सर्व नेत्यांना एकत्र घेऊन चालण्याऐवजी अशोक चव्हाण महायुती मध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. याची तक्रार आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही करणार असल्याचे पाटील यांनी आभार दौऱ्याच्या काही तास अगोदर म्हटले होते.

एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात अशोक चव्हाण किंवा भाजपाच्या कुठल्याही नेत्याचा उल्लेख न करता त्यांच्या स्वबळाचा मुद्दा खोडून काढला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुती एकत्रितच लढणार असल्याचे संकेत शिंदे यांनी दिले. महायुतीचा झेंडा स्थानिक स्वराज्य निवडणुकीत डौलाने फडकवा या त्यांच्या आवाहनानंतर अशोक चव्हाण यांच्या स्वबळाचे अवसान गळणार की कायम राहणार? हे येत्या काळात स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT