Jalna Politics News Sarkarnama
मराठवाडा

Jalna Political News : जालन्यात भाऊ, दादा की सेठ ? स्थानिक स्वराज्य संस्थेतील वर्चस्वासाठी कुरघोडीचे राजकारण!

A political clash is unfolding between Danve, Khotkar, and Gorantyal in Jalna district. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेना-भाजप म्हणजे खोतकर व भास्कर दानवे यांच्या हाती सुत्रे आहेत. नगरपालिकेचा कारभार माजी आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हा परिषदेत शिवसेना, तर जिल्हा बँक राजेश टोपे यांच्या ताब्यात अशी सध्या रचना आहे.

Jagdish Pansare

Marathwada News : लोकसभा, विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी राजकीय नेते तयारी लागले आहेत. निवडणुकीतील जय-पराजयाने जालना जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. भाजपचे नेते रावसाहेब दानवे, काँग्रेसचे कैलास गोरंट्याल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री राजेश टोपे यांचा पराभव झाला आहे. तर काँग्रेसचे कल्याण काळे, शिवसेनेचे अर्जून खोतकर, हिकमत उढाण हे विजयी झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी होऊन काँग्रेसचे कल्याण काळे विजयी झाले. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने (Jalna) जालना जिल्ह्यातील सर्व सहा आमदार निवडून आणत बाजी मारली. गेल्या अनेक दशकांपासून जिल्ह्यातील राजकारण हे सेटलमेंटचे राहिले आहे. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रत्येकाला सत्तेत वाटा मिळावा याची काळजी सर्व पक्षीय नेते आतापर्यंत घेत आले आहे.

त्यामुळे जिल्हा परिषद, नगरपालिका,कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा बँके सारख्या मोठ्या सत्ता केंद्रात योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व दिले जाते. सत्तेचे हे वाटप होत असल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठे वाद कधी झाले नाहीत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेना-भाजप म्हणजे खोतकर व भास्कर दानवे यांच्या हाती सुत्रे आहेत. नगरपालिकेचा कारभार माजी आमदार कैलास गोरंट्याल, (Kailas Gorantyal) जिल्हा परिषदेत शिवसेना, तर जिल्हा बँक राजेश टोपे यांच्या ताब्यात अशी सध्या रचना आहे.

अर्थात अशा वाटाघाटीनंतरही नेत्यांमध्ये कुरघोडीचे प्रकार अधूनमधून घडत असतात. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आले होत. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासात सर्वाधिक वाटा त्यांच्या असल्याचा दावा केला जातो. विधानसभेला जालन्यातील मतदारांनी शहरात कायम आलटून पालटून खोतकर-गोरंट्याल यांनाच संधी दिली. त्यामुळे शहराच्या विकासाचे श्रेय हे दोन्ही नेते घेतात.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता या सगळ्या नेत्यांचे लक्ष हे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थाकडे लागले आहे. लोकसभेला पराभूत झाल्यानंतरही जिल्ह्यावर आपले वर्चस्व राहावे यासाठी रावसाहेब दानवे यांनी खासदार पदाच्या तीस वर्षाच्या काळात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा नव्याने मांडण्यास सुरुवात केली आहे. केंद्र शासनाकडून मंजूर करून आणलेल्या योजनांचे श्रेय जेव्हा आजी-माजी आमदरांनी घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा दानवे यांनी त्यांना फटकारले.

आमदार अर्जून खोतकर यांनी दानवेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले, पण माजी आमदार कैलास गोरंट्याल त्यावर काहीही बोलले नाही. नगरपरिषदेचे रुपांतर आता महापालिकेत झाल्याने तशा अर्थाने येणारी महापालिकेची ही पहिली निवडणुक असणार आहे. विधानसभेत पराभूत झाल्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून कैलास गोरंट्याल कमबॅक करण्याच्या तयारीत आहेत. पण विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीला मिळालेले यश पाहता ते किती शक्य आहे? याबद्दल साशंकता आहे.

पाच वर्ष आमदार म्हणून जालना शहराच्या विकासासाठी केलेले काम या शिदोरीवर गोरंट्याल हे महापालिका निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. तर अर्जून खोतकर यांना पुन्हा जालन्यावर पकड मिळवायची आहे. राज्याच्या सत्तेत असल्यामुळे शहरासाठी निधी आणून लोकांना चांगल्या सुविधा देण्याचा त्यांचा दावा आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती प्रमाणेच महापालिका, जिल्हा परिषदेतही खोतकरांना आपली 'भाऊगिरी' दाखवण्याची संधी या निमित्ताने मिळाली आहे. त्यामुळे येत्या काळात जालन्यामध्ये वर्चस्व दादा, भाऊ की सेठ? याची उत्सूकता सगळ्यांना असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT