Uddhav Thackeray-Eknath Shinde-Anil Jagtap Sarkarnama
मराठवाडा

Thackeray Group News : ठाकरेंना बीडमध्ये पुन्हा धक्का; अंधारेंवर आरोप, सहसंपर्कप्रमुखांची शिंदेसेना प्रवेशाची घोषणा

Datta Deshmukh

Beed News : शिवसेनेच्या (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर पुन्हा एकदा आरोपाचा बाँब पडला आहे. बीडचे माजी जिल्हाप्रमुख व जिल्हा सहसंपर्कप्रमुख अनिल जगताप यांनी अंधारे यांच्यामुळे जिल्ह्याच्या शिवसेनेत अंधेरा वाढत आहे. अंधारे व संपर्कप्रमुख किशोर पोद्दार यांनी पैसे घेऊन पदे वाटल्याचा आरोप करीत याबाबत आपल्याकडे सबळ पुरावे असल्याचा दावा करून आपण येत्या नऊ तारखेला शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार आहे, अशी घोषणा जगताप यांनी केली. (Beed Joint Communications Chief Anil Jagtap will join Shinde Sena)

गेल्या महिन्यात शिवसेनेच्या (उबाठा) जिल्हा संघटनेत मोठे फेरबदल झाले आहेत. माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्यासह माजी मंत्री बदामराव पंडित, बाळासाहेब अंबुरे या तिघांना जिल्हा सहसंपर्कप्रमुख करण्यात आले, तर परमेश्वर सातपुते, गणेश वरेकर व रत्नाकर शिंदे यांना जिल्हाप्रमुख, तर शेख निजाम यांना बीड शहप्रमुख करण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काही महिन्यांपूर्वी बाललैंगिक अत्याचार प्रकरणात दाखल गुन्ह्यात रत्नाकर शिंदे यांचे नाव आल्याने त्यांना पदावरून हटविले होते. मात्र, पुन्हा त्यांची जिल्हाप्रमुखपदावर नेमणूक करण्यात आली. संघटनेतील या फेरबदलानंतर अंबाजोगाई, परळी, धारुर आदी विविध भागांतील पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर पैसे घेऊन पदेवाटप केल्याचा गंभीर आरोप केला होता. आता, पुन्हा अनिल जगताप यांनी अंधारेंवरच आरोपांचे बाँब फेकले आहेत.

शिवसेनेत (उबाठा) सर्वकाही व्यवस्थित असताना एक डिसेंबर 2023 रोजी उपनेत्या आणि कायम मराठा आरक्षणाच्याविरोधात असणाऱ्या सुषमा अंधारे यांनी जिल्हाभरात स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कुटील डाव रचून मला पदावरून हटवले. मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला व गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरात सर्वत्र मराठा आरक्षणाचे काम प्रभावीपणे सुरू केल्याचे आरक्षणविरोधी सुषमा अंधारे यांना खटकल्याचा आरोप करीत त्यांनीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनात माझ्याविषयी विष कालवून अचानक तातडीने बीड शिवसेनेमध्ये खांदेपालट घडवून आणली, असा आरोप जगताप यांनी केला.

गेल्या चाळीस वर्षांपासून मातोश्रीवर श्रद्धा ठेवूनही पक्षाने कुठलीही सूचना न देता पदावरून काढले. पात्रता नसलेल्या परमेश्वर सातपुते, गणेश वरेकर, रत्नाकर शिंदे या तिघांना जिल्हाप्रमुखपदी व निजाम शेख यांना शहरप्रमुख करण्यात आले, असेही जगताप यांचे म्हणणे आहे.

पक्षाने सुषमा अंधारे यांच्या सांगण्यावरून विधानसभा निवडणुकीच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर माझं पद काढून घेत माझ्यावर जाणिवपूर्वक अन्याय केला. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त सदस्य नोंदणी बीड जिल्ह्याने केल्याचे सांगून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आमची प्रशंसा केली होती. कदाचित याचा विसर त्यांना पडला असावा. शिवसेना कोणाची, या लढाईमध्ये आमच्या वतीने जिल्ह्यातून मोठ्या संख्येमध्ये बॉण्ड देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

उपनेत्या सुषमा अंधारे आणि बीड जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोद्दार यांनी भरगच्च पैसे घेऊन संघटनेतील पदे विकली. नवे जिल्हाप्रमुख, शहरप्रमुखांची नियुक्ती केली आहे. याचे सबळ पुरावे आमच्याकडे आहेत. बीड शिवसेना आता अंधारीसेना झालेली असून मराठाविरोधी सुषमा अंधारे यांचा डाव साध्य झाला आहे, असा आरोपही जगताप यांनी केला आहे.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT