छत्रपती संभाजीनगर : विधानसभेच्या फुलंब्री मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे भाजप महायुतीच्या अनुराधा चव्हाण यांनी मोठा विजय मिळवला आहे. पहिल्या फेरीपासून प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेस महाविकास आघाडीचे विलास औताडे यांच्यावर घेतलेली आघाडी अनुराधा चव्हाण केवळ कायमच राखली नाही तर ती वाढवली. शेवटच्या फेरीचा निकाल हाती आला तेव्हा भाजपच्या अनुराधा चव्हाण यांनी 32278 मतांनी काँग्रेसच्या विलास औताडे यांचा पराभव केला.
भाजपचे नेते व या मतदारसंघाचे दोन टर्म आमदार राहिलेले माजी आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी निवड झाल्यानंतर भाजपने अनुराधा चव्हाण यांना फुलंब्रीतून उमेदवारी दिली होती. (BJP) डझनभर इच्छुकांच्या गर्दीत पक्षाने अनुराधा चव्हाण यांच्यावर विश्वास दाखवत महिला चेहरा दिला होता. बागडे यांनी राखलेला हा गड त्यांच्या पश्चात भाजप आणि अनुराधा चव्हाण यांनी अखेर राखला आहे.
दुसरीकडे जालना लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले असले तरी विधानसभेत मात्र मतदारांनी भाजपलाच पसंती दिली. अनुराधा चव्हाण यांना 134065, काँग्रेसचे विलास औताडे 101787 तर वंचित बहुजन आघाडीचे महेश निराळे यांना 6154 मते मिळाली. (Marathwada) फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचा प्रचार बंद पडलेल्या देवगिरी साखर कारखान्याच्या भोवती केंद्रीत झाला होता. महायुती-महाविकास आघाडी दोघांकडून तो सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. अनुराधा चव्हाण यांना मतदारसंघात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची मोठी साथ मिळाल्याचे त्यांच्या मताधिक्यावरून स्पष्ट होते.
2009 मध्ये काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी भाजपच्या हरिभाऊ बागडे यांचा अवघ्या अडीच हजार मतांनी पराभव केला होता. त्यानंतरच्या निवडणुकीत मात्र बागडे यांनी विजय मिळवत फुलंब्री मतदार संघ भाजपचा गड असल्याचे दाखवून दिले होते. अनुराधा चव्हाण यांच्या रूपाने फुलंब्री मतदार संघात पहिल्यांदा भाजप ने महिला उमेदवार दिल्याने या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष होते. हरिभाऊ बागडे यांचा राजकीय वारसदार म्हणून अनुराधा चव्हाण यांची पक्षाने निवड केल्याची मतदारसंघात चर्चा होती.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती म्हणून काम केलेल्या आणि सध्या फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती असलेल्या अनुराधा चव्हाण यांनी यापूर्वी राष्ट्रवादी कडून फुलंब्री मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना यश मिळाले नव्हते, मात्र भाजपकडून त्यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आणि त्यांनी त्याचे सोने केले. त्यांच्या विरोधात काँग्रेसने विलास औताडे हा जुनाच चेहरा मैदानात उतरवला होता.
सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून फुलंब्री चे माजी आमदार कल्याण काळे हे निवडून आले. त्यानंतर काँग्रेसकडूनही फुलंब्री मध्ये नवा चेहरा दिला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या विलास औताडे यांच्यावरच पक्षाने पुन्हा विश्वास दाखवला. फुलंब्री मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत झाली. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रमेश पवार यांनी बंडखोरी केली, मात्र त्यांच्या प्रभाव जाणवला नाही.
देवगिरी कारखाना प्रचारात गाजला
काँग्रेसकडून बागडे यांच्या काळात फुलंब्री मतदारसंघ पिछाडीवर गेला, असा आरोप केला गेला. तर बागडे यांच्या नेतृत्व दहा वर्षात फुलंब्री मतदारसंघाचा कायापालट झाल्याचा दावा भाजपने केला. अनुराधा चव्हाण यांच्याकडे त्यांनी जिल्हा परिषदेच्या सदस्य आणि आपल्या संस्थेच्या माध्यमातून आदर्श गाव, पिण्याच्या पाण्यासाठी राबवलेल्या योजना आणि महिला मुलींच्या सुरक्षेसाठी केलेले काम ही शिदोरी घेऊन निवडणूक लढवली होती. हरिभाऊ बागडे यांनी दहा वर्षात केलेली विकास कामे पुढे घेऊन जाण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला होता.
लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून मतदार संघातील हजारो महिलांना मिळालेला लाभ अनुराधा चव्हाण यांना थेट विधानसभेत घेऊन देणारा ठरला आहे. मतदारसंघातील बंद पडलेला देवगिरी सहकारी साखर कारखाना हाच प्रचाराचा कळीचा मुद्दा राहिला. फुलंब्री विधानसभा मतदारसंघासाठी आर्थिक कणा ठरू शकेल, असा देवगिरी साखर कारखाना गेल्या पंधरा वर्षापासून बंद आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांकडून देवगिरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्याचे आश्वासन दिले गेले.
यावरून चव्हाण आणि औताडे यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही केले. हरिभाऊ बागडे यांनी स्वतःचा छत्रपती संभाजी महाराज साखर कारखाना सुरळीत सुरू राहावा यासाठी देवगिरी कारखाना सुरू होऊ दिला नाही, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. तर देवगिरी साखर कारखाना राज्यात काँग्रेस आघाडीची सत्ता असताना का सुरू केला नाही? असा पलटवार महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी केला. निवडणुकीच्या तोंडावर साखर कारखाना सुरू करणार असे सांगणाऱ्या महायुतीच्या नेत्यांनी तसे शपथ पत्र लिहून द्यावे, असे आव्हान जालन्याचे काँग्रेस खासदार कल्याण काळे यांनी जाहीर सभेतून महायुतीला दिले होते.
या नेत्यांच्या सभांनी गाजले मैदान
महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांच्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, भाजपचे विधानसभा पक्ष निरीक्षक निरंजन सिन्हा ,अनुसूचित जातीचे राष्ट्रीय अध्यक्ष लालसिंह आर्याजी, युवा सेनेचे सचिव निलेश शिंदे यांच्या सभा झाल्या. या व्यतिरिक्त पुर्व आणि फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या चिकलठाणा भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीच्या उमेदवारांसाठी संयुक्त सभा झाली.
राज्यातील महायुतीचे बडे नेते मात्र फुलंब्रीत फिरकले नाही. या उलट महाविकास आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांच्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री अमित देशमुख, खासदार कल्याण काळे यांनी प्रचार सभा घेतल्या. तेलंगणाचे सिंचन मंत्री रेड्डी, काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष लालजी देसाई, काँग्रेसचे सचिव सचिन पायलट, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे यांनी मतदारसंघात सभा घेतल्या.
2009 कल्याण काळे (काँग्रेस) विजयी-63236 मते हरिभाऊ बागडे (भाजप) पराभूत- 60649 2014 हरिभाऊ बागडे (भाजप) विजयी-73294 मते कल्याण काळे (काँग्रेस) पराभूत-69683 अनुराधा चव्हाण (राष्ट्रवादी)-31959 2019 हरिभाऊ बागडे (भाजप) विजयी-106190 मते कल्याण काळे (काँग्रेस) पराभूत -90916
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.