Raosaheb Danve Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Railway : धाराशिव रेल्वेमार्गासाठी निधीचा बूस्टर डोस ; महायुतीच्या उमेदवाराला देणार बळ...

Shital Waghmare

Dharashiv Loksabha : नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वेमार्ग विकासासाठी मोठा निधी मिळाला. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे हे यश असल्याचे बोलले जाते. महाराष्ट्राला मिळालेल्या निधीतून मागील अनेक वर्षांपासून धाराशिव जिल्ह्यासाठी राजकारणाचा नवा मुद्दा ठरलेल्या सोलापूर - तुळजापूर - धाराशिव रेल्वेमार्गासाठीही अडीचशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

आगामी लोकसभा निवडणूक पाहता धाराशिवमधील महायुतीच्या उमेदवारासाठी हा बूस्टर डोस ठरणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत धाराशिव रेल्वे मार्गाचा प्रश्न महत्वाचा ठरणार आहे. महाविकास आघाडीतून खासदारकीसाठी ओमप्रकाश राजेनिंबाळकरांना कडवी टक्कर देण्यासाठी महायुतीतून तगडा उमेदवार शोधण्याचे काम सुरू आहे. 2019 मध्ये राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती.

तेव्हा ते राष्ट्रवादीत होते. आता ते सत्ताधारी भाजप पक्षाचे आमदार आहेत, संभाव्य लोकसभेचे उमेदवार म्हणूनही त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला अडचणीचा ठरू शकणारा धाराशिव रेल्वे मार्गाचा प्रश्न त्यासाठी अंतरिम बजेटमध्ये भरीवर निधी देऊन सोडवण्याचा प्रयत्न केंद्रातील नेत्यांनी केला आहे. त्यामुळे सहाजिकच निधीचा हा बुस्टर डोस महायुतीतील भाजपच्या लोकसभा उमेदवाराला बळ देणारा ठरणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या रेल्वेमार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 225 कोटींची तरतूद करण्यात आल्याचा थेट फायदा भाजपला होणार आहे. मात्र महायुतीतून लोकसभेची जागा भाजप, अजित पवार गट की, शिंदे सेनेकडे जाणार हे अद्याप स्पष्ट नाही. उमेदवार कोणीही असला तरी त्याला रेल्वे मार्गासाठी दिलेल्या निधीचा फायदा निश्चित होईल, असे बोलले जाते. जिल्ह्याला काहीच मिळाले नाही, ही विरोधकांची ओरड होती.

मात्र सत्ताधारी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी अर्थसंकल्पातील रेल्वेसाठी केलेल्या तरतुदीचा मुद्दा वेचून विरोधकांपुढे ठेवला आहे. आगामी काळात लोकसभेची उमेदवारी महायुतीतील कोणत्याही पक्षाला मिळाली तरी कार्यकर्त्यांकडून ओमराजे आणि राणाजगजीतसिंह पाटील या दोन दादांमध्येच लढत व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे.

ही पारंपारिक लढत अटीतटीची होऊ शकते, असाही अंदाज बांधला जात आहे. राणाजगजितसिंह पाटील यांना उमेदवारी मिळाली तर त्यांना लातूर जिल्ह्यातील औशाचे आमदार अभिमन्यू पवार, बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत यांची मदत मिळू शकते. असे झाल्यास धाराशिव लोकसभेची लढत रंगतदार आणि राज्यात चर्चिली जाऊ शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

रेल्वेच्या मुद्दाने भाजपला बळ

सोलापूर - तुळजापूर - धाराशिव रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्यात धाराशिव - तुळजापूर या 30 किलोमीटर ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी अंतरिम अर्थसंकल्पात 225 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिंदे - फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर राज्याच्या 50 टक्के हिस्स्याचे 452 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे रेल्वेने 544 कोटी रूपयांच्या कामाची निविदा प्रकाशित केली आहे.

आता अंतरिम अर्थसंकल्पात यासाठी केलेल्या तरतुदीमुळे या प्रकल्पाला अधिक गती मिळेल. 2019 मध्ये निवडणुक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धाराशिव जिल्ह्यातील जनतेला शब्द दिला होता. तो 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला येण्याआधी खरा करू दाखवला आहे. सोलापूर - तुळजापूर - धाराशिव या एकूण 84.44 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत.

त्यात धाराशिव जिल्ह्यातील कामाचे दोन स्वतंत्र टप्पे केले आहेत. या रेल्वेमार्गावर एकूण 110 पूल आणि तीन मोठे उड्डाणपूल असणार आहेत. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील 32 गावांतील 1 हजार 375 एकर जमीन संपादीत करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. धाराशिव तालुक्यातील नऊ आणि तुळजापूर तालुक्यातील 15 गावांमधील 494.26 हेक्टर जमिनीचे भूसंपादनाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT