छत्रपती संभाजीनगर : सलग दोन लोकसभा निवडणुका आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे झालेले पानिपत आणि त्यानंतर सुरू झालेली गळती या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा संपन्न झाला. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) व अंबादास दानवे हे बऱ्याच कालावधीनंतर एकाच व्यासपीठावर आले. यावेळी दोघांचीही भाषणे शिवसैनिकांना निवडणुकीतील पराभवातून बाहेर काढण्यासाठी धीर देणारी होती.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांना 'हात जोडतो पाया पडतो, कोणी कुठेही जाऊ नका' असे आवाहन करत थेट साष्टांग दंडवत घातले. तर (Ambadas Danve) अंबादास दानवे यांनी मात्र माझी आणि चंद्रकांत खैरे यांची शिवसैनिकच बदनामी करतात, असे म्हणत खापर फोडल्याने काही प्रमाणात मेळाव्याच्या ठिकाणी नाराजीचा सूर दिसून आला. एकूणच आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यातून नव्याने पक्ष बांधणी आणि संघटनात्मक ताकद वाढवण्यावर भर देणार असल्याचे खैरे-दानवे या दोन्ही नेत्यांनी सांगितले.
पक्ष सोडून गेलेले लोक हे काही लाख किंवा एखाद्या कोटीच्या कामांसाठी तिकडे गेले आहेत, त्यांच्यावर पश्चातापाची निश्चितच वेळ येईल असे सांगताना चंद्रकांत खैरे यांनी माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. अंबादास दानवे यांनी 'खैरे यांचे आता वय झाले आहे, त्यामुळे ते कोणी काही सांगितले की मनात ठेवतात. मी मात्र या कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो' असे आपल्या भाषणात म्हटले.तोच धागा पकडत खैरे यांनी 'मी अजूनही थकलेलो नाही, पक्षासाठी कधीही, कुठेही जायला तयार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला 80 वर्षापर्यंत आशीर्वाद दिलेला आहे' असे सांगत आपण शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेचे काम करणार असल्याचे सांगितले. माझे समर्थक शिंदे गटात गेल्यानंतर खैरे साहेब तुम्ही जाणार का? असं मला काहीजण विचारतात. मी त्यांना सांगू इच्छितो की माझा शेवटचा श्वास शिवसेना आणि भगव्यातच जाणार. मी कुठेही पक्ष सोडून जाणार नाही, असा शब्द चंद्रकांत खैरे यांनी यावेळी शिवसैनिकांना दिला.
मी लोकसभेची निवडणूक सहा वेळा लढलो, दोन वेळा विधानसभेत आमदार,मंत्री होतो माझे जिल्ह्यात काही वजन आहे. त्यामुळे तुम्ही माझं ऐकलं पाहिजे, मी रागावतो पण परत प्रेमाने पाठीवरून हातही फिरवतो, असे सांगत आपल्यामुळे जर कोणी दुखावले असेल? तर त्यांनी ते मनात ठेवू नये, असे आवाहन चंद्रकांत खैरे यांनी उपस्थितांना केले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून पक्षाला बळकटी देण्यासाठी आणि आगामी महापालिकेत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी प्रत्येकाने आतापासूनच तयारीला लागा,गटबाजीत कोणीही अडकू नका.
मला बोलावले तर मी प्रत्येक ठिकाणी येणारच, पण जर मला माहीत नसले तर माझा नाईलाज असेल, असे सांगत खैरे यांनी पुन्हा एकदा दानवेंवर निशाणा साधला. मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दोन दिवसांपूर्वी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर खैरे-दानवे यांचे सूर मेळाव्यात बदललेले दिसले. दोघांनीही एकमेकांची हातचं राखून स्तुती केली. आम्ही दोघे आता एकत्र आलो आहोत, तुम्ही शिवसैनिकांनीही एकत्र आलं पाहिजे,असे आवाहन चंद्रकांत खैरे यांनी आपल्या भाषणात केले.
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यामुळेच कमावलेल्या पैशातून पक्ष फोडण्याचे पाप केल्याचा आरोप करत आमच्याकडे आता पैसे नाही म्हणून काही लोक पक्ष सोडून जात आहेत, असा आरोपही खैरे यांनी केला. एकूणच शिवसेनेच्या मेळाव्यात चंद्रकांत खैरे यांचे भाषण प्रभावी ठरले तर अंबादास दानवे यांनीही पराभवातून नव्याने उभे राहून पक्ष वाढू शकतो, असा विश्वास शिवसैनिकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
कन्नडचे माजी आमदार उदयसिंह राजपूत यांचे उदाहरण खैरे-दानवे या दोघांनीही दिले.दोन स्कार्पिओ भरून नोटा आलेल्या असतानाही उदयसिंह राजपूत यांनी पक्षाशी असलेली निष्ठा सोडली नाही. मात्र तालुक्यातील काही चांडाळ चौकडींनी उदयसिंह राजपूत यांचे काम केले नाही आणि त्यांचा पराभव झाला. मात्र ते पक्ष सोडून कुठेही गेले नाही याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे आणि प्रत्येक शिवसैनिकाने त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, असे आवाहन खैरे यांनी आपल्या भाषणात केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.