Chhatrapati Sambhajinagar-Jalna Constituency : राज्यातील सतरा विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था या मराठवाड्यातील मतदारसंघाचाही समावेश आहे. 2018 मध्ये शिवसेना-भाजप युतीने ही जागा मोठ्या मताधिक्याने जिंकली होती. शिवसेनेकडून अंबादास दानवे यांना युतीने मैदानात उतरवले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीची दीडशेहून अधिक मते फोडत अंबादास दानवे यांनी सर्वाधिक मताधिक्याने विधान परिषदेवर निवडून जाण्याचा विक्रम तेव्हा केला होता.
शिवसेनेकडे (Shivsena) असलेली छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची ही जागा त्यांच्याकडेच राखणार? की मग स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये या दोन्ही जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष ठरलेली भाजप या मतदारसंघावर दावा सांगणार? यावर पुढील राजकीय घडामोडी अवलंबून असणार आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. तर संभाजीनगरची जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील नऊ पैकी सहा नगरपालिका या भाजपच्याच ताब्यात आहेत.
या जोरावरच भाजपा या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर दावा सांगू शकते. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे या जागेवर दावा सांगू शकतात. महायुतीकडे विजयासाठीचे पुरेसे संख्याबळ असल्याने आणि महाविकास आघाडीतील विरोधी पक्षामध्ये फारसा उत्साह नसल्याने ही निवडणूक महायुतीला अवघड जाणार नाही, अशी सद्यस्थिती आहे. परंतु यासाठी महायुतीतील तीनही पक्षांमध्ये एकमत होणे महत्वाचे असणार आहे.
इच्छूकांची संख्या हेच टेन्शन..
गेल्या तीन वर्षात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षात मोठ्या प्रमाणत इतर पक्षांमधून इनकमिंग झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून काही बडे चेहरे या दोन्ही पक्षात दाखल झाले आहेत. विधान परिषदेच्या या एका जागेवर इच्छूकांची संख्या अधिक असल्याने महायुतीच्या नेत्यांचे टेन्शन वाढणार आहे.
यापुर्वी ऑगस्ट 2019 मध्ये झालेली औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक ही मराठवाड्याच्या राजकारणातील अत्यंत गाजलेली आणि प्रतिष्ठेची निवडणूक ठरली होती. या निवडणुकीत युतीचे उमेदवार अंबादास दानवे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार बाबुराव कुलकर्णी यांचा प्रचंड मताधिक्याने पराभव केला होता.
या निवडणुकीची आकडेवारी, पडद्यामागील राजकीय समीकरणे आणि वरिष्ठ नेत्यांनी हलवलेली सूत्रे महत्वाची ठरली होती. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेल्या अंबादास दानवे यांनी या मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे, रामदास कदम, नेते तथा खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह जालना जिल्ह्यातील भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती.
या निवडणुकीत महानगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सभापती, सदस्य हे प्रामुख्याने मतदार होते. 657 मतदारसंख्या असलेल्या या मतदार संघात तेव्हा 90 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीनंतर जेव्हा निकाल जाहीर झाला तेव्हा अंबादास दानवे यांना तब्बल 524 मते मिळाली होती. तर काँग्रेस आघाडीच्या बाबुराव कुलकर्णी यांना फक्त 106 मतांवर समाधान मानावे लागले होते.
दानवे हे तब्बल 418 मते घेऊन विधान परिषदेवर निवडून गेले होते. कागदावर युती आणि आघाडीची जी आकडेवारी होती, ती प्रत्यक्ष मतदानात पूर्णपणे बदलली. गुप्त मतदान पद्धतीचा फायदा घेत अंबादास दानवे यांनी विरोधी पक्षांची मते मोठ्या प्रमाणात आपल्याकडे खेचली. निवडणूक सुरू झाली तेव्हा शिवसेना-भाजप महायुतीकडे अधिकृतपणे 330 मते होती, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे 250 मते होती. एमआयएम (AIMIM) आणि अपक्षांकडे 77 मते होती.
काँग्रेस-एमआयएमची मते फुटली..
अंबादास दानवे यांना स्वत:च्या महायुतीच्या कोट्यापेक्षा तब्बल 194 मते जास्त मिळाली होती. काँग्रेस-आघाडीकडे 250 मते असताना त्यांच्या उमेदवाराला केवळ 106 मते पडली. म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या किमान 140 पेक्षा जास्त सदस्यांनी अंबादास दानवे यांच्या बाजूने 'क्रॉस व्होटिंग' केले. याशिवाय एमआयएमच्या काही नगरसेवकांनीही दानवेंना मतदान केली होती, असे बोलले गेले. या निवडणुकीच्या विजयामागे केवळ स्थानिक गणिते नव्हती, तर राज्य पातळीवरील बड्या नेत्यांची रणनीती आणि छुपा पाठिंबा कारणीभूत होता.
उद्धव ठाकरे, तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांनी दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून प्रतिष्ठेची जागा जिंकण्याची जबाबदारी खैरे यांच्यासह रामदार कदम, एकनाथ शिंदे व काही स्थानिक नेत्यांवर सोपवली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे या नेत्यांनी राज्यात भाजप-शिवसेना युती असल्याने भाजपची सर्व मते विशेषतः जालना जिल्हा परिषद आणि नगरपालिकेतील मते शिवसेनेच्या पारड्यात पडतील याची पूर्ण खबरदारी घेतली. जालना जिल्ह्यातून दानवे यांना मोठी रसद मिळाली होती.
सत्तारांचा बाबुरावांना हात..
अब्दुल सत्तार यांनी तेव्हा काँग्रेसमध्ये बंड पुकारले होते. तेच खऱ्या अर्थाने या निवडणूकीत गेंमचेंजर ठरले होते. निवडणुकीच्या अगदी आधी सत्तार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. सिल्लोड आणि परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांवर त्यांची मजबूत पकड होती. सत्तार यांनी उघडपणे अंबादास दानवे यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्या कोट्यातील सर्व मते दानवे यांच्याकडे वळवली होती. पुढे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सत्तार यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेत सिल्लोड-सोयगावमधून निवडणूक लढवली होती.
दोघांकडे इच्छूकांची गर्दी..
छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन्ही जिल्ह्यात शिवसेना-भाजप या पक्षांकडे इच्छूकांची बरीच गर्दी आहे. यात प्रामुख्याने काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले आणि महापालिकेच्या सत्तेत सिंहाचा वाटा उचलणारे माजी आमदार कैलास गोरंट्याल तर शिवसेनेकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून आलेले भास्कर आंबेकर हे दोन प्रमुख दावेदार मानले जात आहेत. तर इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतून आलेले राजू वैद्य, तर अकरा महिन्यांची टर्म नुकतीच संपलेले माजी आमदार संजय केनेकर हे ही या मतदारसंघातून दावेदारी करू शकतात. या शिवाय शिंदेंच्या शिवसेनेकडून नंदकुमार घोडेले, विकास जैन या दोन माजी महापौरैंचे अद्याप राजकीय पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे ते ही आशा बाळगून असणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.