Manoj Jarange Patil  Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठ्यांशी गद्दारी केलीय; मनोज जरांगेंनी तोफ डागली

Maratha Reservation Issue : उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आंदोलकांवर खोटे गुन्हे टाकून कारवाई करत आहेत व मराठा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना येत्या काही दिवसांत मराठा समाज नक्कीच उत्तर देईल. मुख्यमंत्री म्हणतात सहा महिने मी तुमचे फार लाड केले, पण मी कोणाचे उपकार घेत नसतो.

Tushar Patil

Jalna News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे. ते मराठ्यांच्या नजरेतून उतरले असून, त्यांनी केलेली गद्दारी समाज कधीही विसरणार नाही, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी आपला संताप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यक्त केला.

जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील संवाद मेळाव्यात जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या `आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो` या विधानाचाही समाचार घेतला. भोकरदन तालुक्यातील वालसा खालसा, लिंगेवाडी, बाभूळगाव, चोराळा, सिपोरा बाजार व आव्हाना येथे मनोज जरांगे यांनी मराठा समाजाशी संवाद साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करताना दहा टक्के आरक्षण देऊन मराठा समाजाची या दोघांनी फसवणूक केल्याचा आरोप केला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आंदोलकांवर खोटे गुन्हे टाकून कारवाई करत आहेत व मराठा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना येत्या काही दिवसांत मराठा समाज (Maratha community ) नक्कीच उत्तर देईल. मुख्यमंत्री म्हणतात सहा महिने मी तुमचे फार लाड केले, पण मी कोणाचे उपकार घेत नसतो.

ते मला बैठकांना बोलवत होते, पण मी जात नव्हतो. पदाधिकाऱ्यांना पाठवायचो. मी कोणाचा मिंदा होत नाही, ते मला कंटाळून गेलेले आहेत. ते म्हणतात कोणीही हाती लागावा, पण असला निष्ठावान हाती लागू नये. मुख्यमंत्री म्हणतात लिमिट तोडलं की मी करेक्ट कार्यक्रम करतो, राज्याचे मुख्यमंत्री हे पालक असतात. कायद्याची शपथ तुम्ही घ्यायची, सहा महिने करोडो मराठ्यांना येड्यात तुम्ही काढायचं आणि तुम्हीच करेक्ट कार्यक्रम करणार म्हटल्यावर लोकांची मुलं फाशी घेणार नाही तर काय करतील? असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी केला.

मीसुद्धा भ्रमात होतो की मुख्यमंत्री शिंदे मराठा समाजाला आरक्षण देतील म्हणून. पण शिंदेंनी हे स्वप्न धुळीस मिळवलं. मुख्यमंत्री शिंदे हे मराठ्यांच्या नजरेतून उतरलेले आहेत. त्यांनी मराठ्यांशीसुद्धा गद्दारी केली, त्यामुळे मराठेसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात गेले आहेत. मी पण सांगून टाकलं मर्यादा सोडल्यावर माझी जात आणि माझा समाजदेखील तुमचा करेक्ट कार्यक्रम करेल. जर तुम्हाला डाव येतात, तर आम्हालाही प्रतिडाव येतात, चालू द्या कुठपर्यंत चालू द्यायचं ते, असा इशाराही जरांगे यांनी या वेळी दिला.

त्यांनी केसेसचा पहिला डाव टाकला, मराठ्यांनी लगेच उमेदवारी अर्ज भरण्याचा प्रतिडाव टाकला. तुम्ही आता पुढे डाव टाकले तर मराठे त्यापुढचा डाव टाकणार. गल्ली, बोळात पुढाऱ्यांना यापुढे बंदी टाका, त्यांना येऊ देऊ नका. आता दारा-दारात पत्रके चिटकवा, पुढाऱ्यांनी आमच्या दारात यायचं नाही म्हणून. आपल्या दुचाकीलाही अशीच पत्रकं लावा. गावात लावलेले बोर्ड पुढार्‍यांनी काढले, आता तुम्ही घराला बोर्ड लावा, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी समाज बांधवांना केले.

पुढाऱ्यांना अर्ध्या रस्त्यात गाडीतून उतरवून द्या...

रस्त्यात एखाद्या पुढाऱ्याची गाडी बंद पडली, तर त्याला अर्ध्या रस्त्यात नेऊन सोडा आणि गाडी खाली उतरवून द्या. आपल्याशिवाय पुढाऱ्यांना कोणीही विचारत नाही. आपल्याच जिवावर त्यांची गुंडगिरी सुरू आहे. आता पुढाऱ्यांच्या मागे फिरणे बंद करा. माझा जीव जरी गेला तरी करोडो मराठ्यांच्या मुलांना आरक्षण देऊन त्यांच्या अंगावर गुलाल पडल्याशिवाय एक इंचसुद्धा मागे हटणार नाही, याचा पुनरुच्चारही जरांगे पाटील यांनी केला.

Edited By : Vijay Dudhale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT