Nanded Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्वसामान्यांमध्ये मिसळणे, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मन राखणे, कितीही व्यस्त कार्यक्रम असला तरी दिलेला शब्द पाळणे यासाठी ओळखले जातात. अपघातातील रुग्णाला मदत करणे, रस्त्याने वाट पाहत असलेल्यांचे गाडीतून उतरून स्वागत स्वीकारणे हे शिंदे यांच्या बाबतीत नेहमीचेच.
पण राज्याच्या राजकारणात भूकंप घडवू शकेल अशी घटना, राज्याचे नाही तर देशाचे लक्ष लागलेल्या आमदार अपात्रता प्रकरणावरच्या सुनावणीचे टेन्शन असतानाही एकनाथ शिंदे शांत कसे असा प्रश्न त्यांच्या आजच्या कृतीकडे पाहून निश्चितच पडतो.
त्याचे झाले असे, की मुख्यमंत्री नांदेडमार्गे हिंगोली दौऱ्यावर आले होते. शिवसेना संकल्प मेळाव्यासाठी मुख्यमंत्र्यांचे नांदेड विमानतळावर आगमन झाले. त्यांचा हा दौरा खूप घाईचा आणि आमदार अपात्रतेच्या निकालाच्या तणावात झाला. अशातही नांदेड विमानतळावर उतरताच त्यांनी आठवणीने जिल्हाधिकाऱ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकाऱ्यांचा वाढदिवस लक्षात ठेवत मुख्यमंत्र्यांनी विमानतळावरच त्यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. नांदेडचे जिल्ह्याधिकारी अभिजित राऊत यांचा वाढदिवस होता. हे माहीत झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतरच ते पुढील नियोजित कार्यक्रमासाठी गेले. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीमुळे जिल्हाधिकाऱ्यांसह उपस्थितीत अधिकारीही भारावले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मिशन 48 साठी शिवसंकल्प अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील मेळाव्याला एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. मराठवाड्यातील हा पहिला मेळावा हिंगोली लोकसभा मतदारसंघातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघात आयोजित करण्यात आला होता.
मुख्यमंत्री शिंदेंचे नांदेड विमानतळावर खासदार हेमंत पाटील, यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, आमदार संतोष बांगर, बालाजी कल्याणकर, विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळीच कुणीतरी मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा आज वाढदिवस असल्याचे सांगितले. त्यानंतर शिंदेंनी अभिजीत राऊतांना बोलवत पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.