Jitesh Antapurkar-Ashok Chavan Sarkarnama
मराठवाडा

Jitesh Antapurkar : क्रॉस व्होटिंगचा आरोप असलेले काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर यांनी घेतली भाजप नेत्याची भेट

Marathwada Politics : आमदार जितेश अंतापूरकर यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला नव्हता. शिवाय, विधान परिषदेच्या निवडणूकीत त्यांनी क्रॉस व्होटिंग केल्याची चर्चा आहे.

Vijaykumar Dudhale

Nanded, 22 July : विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्हाेटिंगचा आरोप असलेले देगलूर-बिलोलीचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी भारतीय जनता पक्षाचे खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. अंतापूरकर यांनी या अगोदर भाजपचे नेते संजय उपाध्याय यांचीही भेट घेतली होती, त्यामुळे अंतापूरकर यांची वाटचाल भाजपच्या दिशेने सुरू असल्याचे दिसून येते.

दरम्यान, काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) हे आता भारतीय जनता पक्षाच्या (BJP) गोटात दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजप नेते संजय उपाध्याय यांची भेट घेतली होती.

त्यानंतर भाजपचे खासदार आणि नांदेडचे नेते अशोक चव्हाण यांची गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर अंतापूकर यांनी भेट घेऊन चर्चा केली आहे. तत्पूर्वी त्यांनी मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांशीही चर्चा केली होती. या भेटीची राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे.

अशोक चव्हाण यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर काही आमदार त्यांच्यासोबत जातील, अशी चर्चा होती. त्यात अंतापूरकर यांचे नाव आघाडीवर होते. त्यामुळे आमदार जितेश अंतापूरकर यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला नव्हता. शिवाय, विधान परिषदेच्या निवडणूकीत त्यांनी क्रॉस व्होटिंग केल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीत घेतलेली अलिप्तवादाची भूमिका, विधान परिषद निवडणुकीत केलेले क्रॉस व्हाेटिंगची चर्चा आणि भाजप नेत्यांच्या गाठीभेटी पाहता आमदार जितेश अंतापूरकर हे लवकरच भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा नांदेड जिल्ह्यात सुरू आहे. मात्र, कारवाई होऊ नये, यासाठी अंतापूरकर हे विधानसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसमध्येच राहतील आणि निवडणुकीत भाजपमध्ये जातील, अशी चर्चा आहे.

नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे नऊ उमेदवार निवडून आले होते, तर महविकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा पराभव झाला होता. त्या निवडणुकीत काँग्रेसची सात मते फुटल्याची चर्चा होती. त्यात आमदार जितेश अंतापूरकर यांच्या नावाचाही समावेश होता.

विधान परिषदेच्या निवडणुकीत क्राँस व्होटिंग केलेल्या आमदारांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. त्यानंतर मुंबईत आलेले के. सी. वेणुगोपाल यांनीही स्पष्ट केले आहे. पण, काँग्रेस पक्ष खरोखरच या फुटीवर आमदारांवर कारवाईचे धाडस दाखवेल का, हा खरा प्रश्न आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT