CM Devendra Fadnavis Shiv Sena  sarkarnama
मराठवाडा

Devendra Fadnavis News : देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले, संभाजीनगरात आम्हीच मोठे भाऊ; मित्रपक्ष आमच्या मागेमागे येतील!

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेसोबत युती तुटली याला शिवसेनाच जबाबदार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. परंतु भगव्यासाठी निवडणुकीनंतर केवळ मित्रपक्षच नाही तर जे जे येतील त्यांना सोबत घेऊ.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत शिवसेनेसोबत युती व्हावी, अशी माझी मनापासून इच्छा होती. मी आमच्या स्थानिक नेत्यांना वारंवार सांगितले, दोन-चार जागा कमी लढवू, पण युती झाली पाहिजे. आमच्या पक्षात एकदा आदेश आला की अंमलबजावणी केली जाते. पण शिवसेनेत इथे वाद असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यांच्याकडून वेगवेगळे प्रस्ताव दिले गेले, मी संजय शिरसाट यांच्याशी अनेकदा बोललो, पण त्यांच्या पक्षात एकमत होऊ शकले नाही आणि त्यांनी युती तोडली.

तरी मी स्पष्ट सांगतो, की छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच मोठा पक्ष असेल. निवडणुकीनंतर आमचे मित्रपक्षही आमच्या मागेमागे येतील, असा दावा फडणवीस यांनी केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टाॅक शोच्या माध्यमातून एकाचवेळी 90 वार्डांशी संवाद साधला.

यावेळी फडणवीस यांनी अनेक प्रश्नांवर आपली मतं मांडली. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेसोबत (Shivsena) युती तुटली याला शिवसेनाच जबाबदार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. परंतु भगव्यासाठी निवडणुकीनंतर केवळ मित्रपक्षच नाही तर जे जे येतील त्यांना सोबत घेऊ.

निवडणुकी दरम्यान, संभाजीनगरमध्ये एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यावर काल झालेला हल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न यावरही फडणवीस यांनी भाष्य केले. कुठल्याही शहराची ग्रोथ ही त्या शहरातील कायदा व सुव्यवस्था आणि वातावरणावर अवलंबून असते.

संभाजीनगरमध्ये यापूर्वी दोन दंगली झाल्या, उद्योजकांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार घडत होते. तेव्हा गृहमंत्री म्हणून आम्ही कठोर भूमिका घेतली. विदेशी गुंतवणूक उद्योगांच्या माध्यमातून जेव्हा येत असते तेव्हा ते सद्य परिस्थिती आणि यापुर्वीचा इतिहास याचा अभ्यास करत असते. त्यामुळे आपल्या शहराचा, भागाचा विकास करायचा असेल तर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखलीच पाहिजे.

समृद्धी महामार्गाचे स्वप्न पूर्ण झाले..

समृद्धी महामार्गाची संकल्पना आपण 2001 मध्ये विधानसभेत मांडली होती. तेव्हा माझ्यावर टीका झाली, एवढा मोठा महामार्ग शक्य आहे का? त्यापेक्षा जे रस्ते खराब आहेत ते दुरुस्त करा, असा सल्ला दिला गेला. पण 2014 मध्ये मला संधी मिळाली, मी मुख्यमंत्री झालो आणि समृद्धी महामार्गासाठी प्रयत्न सुरू केले.

नागपूर ते मुंबईपर्यंत एक सरळ रेष ओढली आणि अधिकाऱ्यांना मला असा रस्ता पाहिजे हे स्पष्ट सांगितले. यासाठी सर्वात मोठा प्रश्न भूसंपादनाचा होता. पण आम्ही पाचपट मोबदला देऊन या जमीनींचे संपादन केले.

उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी याच संभाजीनगरमध्ये येऊन सभा घेतल्या. शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गासाठी जमीनी देऊ नका म्हणून सांगितले. पण आम्ही प्रक्रिया सुरू केली, पाचपट मोबदला देण्याचा निर्णय घेतला तेव्हा ठाकरेंनी सभा घेतली त्या गावातील सगळ्या शेतकऱ्यांना आम्हाला पाहिजे तेवढी जमीन देऊन टाकली.

पाच वर्षात हा समृद्धी महामार्ग आम्ही पूर्ण करू शकलो. मध्यंतरी काही अचडणी आल्या, आता पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्या सोडवल्या आणि हा माझा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण झाला, अशी आठवणही फडणवीस यांनी यावेळी सांगितली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT