Dharashiv : महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतणे आणि त्यांच्यातील वाद कायमच चर्चेत असतात. बाळासाहेब ठाकरे-राज ठाकरे, शरद पवार-अजित पवार, गोपीनाथ मुंडे-धनंजय मुंडे, सुनील तटकरे-अवधूत तटकरे, जयदत्त क्षीरसागर-संदीप क्षीरसागर, अशोक पाटील निलंगेकर-संभाजी पाटील निलंगेकर अशी ही मोठी यादी आहे. महाराष्ट्राचे राजकारण कायम या काका-पुतण्यांभोवती फिरताना आपण पाहतो. पण, धाराशिव जिल्ह्यातही ( Dharashiv Loksabha constituency ) काका-पुतण्याच्या राजकारणाचा नवा अध्याय लिहला जातोय.
राज्याचे आरोग्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत ( Tanaji Sawant ) आणि त्यांचे पुतणे धनंजय सांवंत यांची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे. बुधवारी (ता.7) रोजी धाराशिवमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा होत आहे. तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर होणारा हा मेळावा धाराशिवमधील लोकसभेचा उमेदवार ठरवणारा असल्याचा बोललं जात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या पार्श्वभूमीवर पुतणे धनंजय सावंत यांनी काका तानाजी सावंत यांच्याकडे 'काका मला खासदार करा,' असा आग्रह धरल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष असलेले धनंजय सावंत हे काकांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकीय धडे गिरवत आहेत. मात्र, त्यांना आता थेट दिल्लीच गाठायची आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी त्यांनी शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी करत स्वतःचा भावी खासदार असा उल्लेख केला आहे. आता काका तानाजी सावंत पुतण्याला लोकसभेची उमेदवारी मिळवून देण्यासाठी शिष्टाई करणार का? आणि ती मिळालीच तर त्याला निवडून आणणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मुख्यमंत्रीपदाचा पदभार घेतल्यानंतर एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यापूर्वी अतिवृष्टीच्या पाहणीसाठी तुळजापूर आणि धाराशिव तालुक्यात मुख्यमंत्री आले होते. यापूर्वी मुख्यमंत्र्यांचा दौरा हा शासकीय होता. यावेळी मात्र ते पहिल्यांदाच पक्षाच्या मेळाव्यासाठी येत आहेत. त्यामुळे सावंत काका-पुतण्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे. स्वतः तानाजी सावंत, आमदार ज्ञानराज चौगुले मेळाव्याच्या प्रत्येक गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना हा मराठवाड्यातील सर्वात मोठा कारखाना म्हणून ओळखला जातो. धाराशिव जिल्हा आणि परिसरातील राजकारणावर या कारखान्याचा पूर्वीपासून प्रभाव राहिला आहे. मात्र, मागील बारा ते तेरा वर्षांपासून हा कारखाना बंद होता. तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ शुगरने तेरणा कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी घेतला आहे.
शरद पवार यांच्या उपस्थितीत दोन दशकापूर्वी तेरणा कारखान्यावर झालेला जाहीर कार्यक्रम आजही अनेकांच्या स्मरणात आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत याच तेरणा कारखान्यावर शिवसेनेचा मेळावा, तोही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत आहे. त्यामुळे यातून कोणत्या राजकीय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. जिल्ह्याचे नेतृत्व एकहाती आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न सावंत यानिमित्ताने करणार आहेत.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.