Archana patil, Usha Gaikwad  Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv ZP Election : धाराशिव झेडपीवर महायुतीचा 'गुलाल'! भाजपच्या वाट्याला दोन तर शिंदेंची शिवसेना, राष्ट्रवादीला एक सभापती पद; 'या' नेत्याची लागली वर्णी

BJP Shiv Sena NCP alliance News : महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्रित येत भाजप-शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर सत्ता स्थापन केली आहे.

सरकारनामा ब्युरो

Dharashiv News : धाराशिव जिल्हा परिषदेत एकत्र येत महायुतीने सत्ता स्थापन केली आहे. झेडपीच्या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्यानंतर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्रित येत भाजप-शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर सत्ता स्थापन केली आहे. झेडपीच्या अध्यक्षपदी भाजप आमदार राणाजगजितसिंह पती यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा गायकवाड यांची उपाध्यक्षपदी यापूर्वीच निवड झाली होती. तर उत्सुकता लागून रहिलेल्या सभापतींची निवड शुक्रवारी झेडपीच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली. त्यामध्ये भाजपच्या वाट्याला दोन तर एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला एक व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक सभापतिपद आले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडीनंतर शुक्रवारी विशेष सभा पार पडली. यावेळी चार सभापतींची निवड करण्यात आली. महायुतीमध्ये ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार सर्वच घटक पक्षांना प्रतिनिधित्व देण्यात आले. अध्यक्ष निवडींनंतर कोणत्या पक्षाला किती वाटा मिळणार? याबाबतची उत्सुकता लागली होती. या निवडीवेळी भाजप (BJP) आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांना दूर ठेवण्यात यश मिळवले आहे.

अर्थ व बांधकाम सभापतीपदी सिद्धेश्वर कोरे (भाजप), समाजकल्याण सभापतीपदी विश्वास कोकणे (भाजप), कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी भाऊसाहेब खरसडे (राष्ट्रवादी), महिला व बालकल्याण सभापतीपदी पूजा शिंदे (शिवसेना) यांची निवड करण्यात आली. या निवडीतून सत्तास्थापन करताना योग्य समतोल राखण्यात आला आहे.

धाराशिव झेडपीतील अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आल्यानंतर सभापती पदांसाठी इच्छुक मोठ्या प्रमाणात होते. प्रत्येकानी सभापतिपद आपल्याच वाट्याला यावे यासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती. तर काही अपक्ष सदस्यांनी पत्नीला भाजपमध्ये पाठवून सभापतीपदावरची दावेदारी कायम ठेवली होती. त्यामुळे शुक्रवारी होत असलेल्या निवडीविषयी उत्सुकता लागून राहिली होती.

या विशेष सभेवेळी महाविकास आघाडीकडूनही सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र, सभेत झालेल्या मतदान प्रक्रियेत महायुतीच्या उमेदवारांचा 45 विरुद्ध 10 च्या फरकाने विजय झाला. या पदवाटपामुळे जिल्हा परिषदेतील सत्तासमीकरण आता स्पष्ट झाले आहे. महायुतीच्या आघाडीला घवघवीत यश मिळाल्याने येत्या काळात आता विकासकामांना गती मिळणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या निवडीकडे लागले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT