Rajya Sabha Election Vishleshan: राज्यसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपचे चार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेचा एक आणि महाविकास आघाडीचा एक उमेदवार बिनविरोध निवडून येणार हे निश्चित झाले आहे. भाजपने आपल्या चार उमेदवारांची नावे जाहीर करत सर्वांना धक्का दिला. या नावांमध्ये विनोद तावडे आणि रामदास आठवले यांच्यासोबत माया इतनावे, रामराव वाडकुते यांचे नाव पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
विनोद तावडे हे 2019 पासून राष्ट्रीय राजकारणात सक्रीय आहेत. 2019 ला त्यांना भाजपने विधानसभेची उमेदवारी दिली नाही. मात्र, उमेदवारी नाकारल्यानंतर ते पक्ष संघटनेत सक्रीय राहिले. अमित शाहांनी त्यांना राष्ट्रीय राजकारणात काम करण्याची संधी दिली. आता ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. तावडेंवर बिहाराची जबाबदारी देण्यात आली होती. भाजपपासून दूर गेलेले नितीशकुमार यांना पु्न्हा भाजपसोबत आणणे आणि सत्ता स्थापन करणे यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिले. त्यानंतर केरळची जबाबदारी आता त्यांच्यावर देण्यात आली.
राष्ट्रीय राजकारणात आणि पक्ष संघटनेत पक्षाने जी जबाबदारी त्यांच्यावर दिली ती योग्य प्रकारे त्यांनी पार पाडली. त्याचेच बक्षीस म्हणून त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली. रामदास आठवले हे मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री आहेत. आरपीआय हा त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यामुळे यावेळी रामदास आठवलेंना उमेदवारी मिळणार की नाही याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, रामदास आठवले यांच्या माध्यमातून बौद्ध समाजात भाजपने एक सॉफ्ट कॉर्नर तयार केला आहे.
माया इतनावे यांच्या नावाने अनेकांना धक्का बसला आहे. त्या नागपूरच्या माजी महौपार आहेत. तसेच विद्यमान नगरसेवक आहेत. राष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा देखील त्यांना संधी मिळाली. नॅशनल कमिशन फॉर शेड्युल्ड ट्राईब्स या समितीवर त्यांनी काम केले आहे. या समितीच्या सदस्याला राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्यासोबत त्यांचा विशेष स्नेह आहे. त्या मूर्मू यांच्या निकटवर्तीय समजल्या जातात. पक्षसंघटनेत त्या सक्रीय होत्या. त्यामुळे इतनावे यांना उमेदवारी देऊन जो पक्षसंघटनेत काम करतो त्याकडे भाजप वरिष्ठांचे बारकाईने लक्ष असते, असा संदेश देण्यात आला आहे. तसेच आदिवासी समाजाला नेतृत्वाची संधी दिल्याचे संदेश देखील दिला आहे.
सात वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले रामराव वडकुते यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेचे आमदार देखील होते. मात्र, मुळच्या भाजप कार्यकर्त्यांना डावलून रामराव वडकुते यांना उमेदवारी देण्यामागे जातीय समीकरण असल्याची चर्चा आहे. हिंगोली मतदारसंघातील रामराव वडकुते हे परभणीमध्ये स्थायीक असल्याचे बोलले जाते. हिंगोली आणि परभणीमधील जातीय समीकरण पाहता येथे मराठा समाजासोबत धनगर समाज देखील मोठ्या संख्येने आहे. मराठा आंदोलनाची धग बसत असताना ओबीसी समाजाने विधानसभेत भाजपला तारले त्यामुळे भविष्याचा राजकारणाच विचार करता वडकुते यांना उमेदवारी मिळाली असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पार्थ पवारांच्या उमेदवारीतून तेच पुढील राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेतृत्व करतील, असा मेसेज दिल्याची चर्चा आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून अनेक दिग्गज उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, शेवटच्या क्षणी उमेदवारीची माळ ही ज्योती वाघमारे यांच्या गळात पडली. आंबेडकरी चळवळीतून आलेल्या ज्योती वाघमारे या फर्ड्या वक्त्या आहेत. आक्रमकपणे त्या आपल्या पक्षाची बाजू मांडताना दिसतात. इंग्रजी विषयातून त्यांनी पीएचडी देखील केली आहे. त्यामुळे दलित महिला चेहरा देत एकनाथ शिंदेंनी दलित समाजाला नेतृत्व दिल्याचा मेसेज दिला आहे. ज्योती वाघमारे यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू आणि कन्नड अशा पाच भाषांवर प्रभुत्व आहे. त्यामुळे त्यांना राज्यसभा देत पक्षाची बाजू राष्ट्रीय स्तरावर मांडणार चेहरा मिळाल्याची देखील चर्चा आहे.
महाविकास आघाडीचा एकच उमेदवार विजयी होईल येवढेच संख्याबळ त्यांच्याकडे होते. त्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसकडून ही जागा आपल्याच मिळावी म्हणून रस्सीखेच सुरू होती. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा देखील सुरू होत्या. त्यामुळे शरद पवार हे महाविकास आघाडीसोबत राहणार की नाही याबाबत देखील वेगवेगळे अंदाज वर्तवले जात होते. शरद पवार यांनी देखील राज्यसभा निवडणूक लढण्याबाबत कोणताही स्पष्ट संदेश न दिल्याने शिवसेना ठाकरे आणि काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा महाविकास आघाडी सोबत असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट करत शरद पवारांच्या उमेदवारीसाठी हालचाली सुरू केल्या. ते उद्धव ठाकरेंसोबत याबाबत बोलत होते. तर, काँग्रेसच्या नेत्यांसोबत सुप्रिया सुळे या चर्चा करत होते. आणि यामधून शरद पवारांची उमेदवारी पक्की करण्यात आली.
शरद पवारांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले. भाजप किंवा शिंदेची शिवसेना ही आठवा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतवरणार नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला देखील आमदार फुटण्याची भीती नाही. पवारांच्या उमेदवारीतून महाविकास आघाडी एकत्र असल्याचे संदेश दिला गेला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.