Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Eknath Shinde Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv ZP President : ठाकरे गेम फिरवण्याच्या तयारीत; शिंदेंच्या नेत्याने सुत्र हलवली, सरळ सांगून टाकलं, 'भाजप आणि आम्ही...'

BJP majority claim News : भाजपला सत्ता स्थापन करण्यापासून रोखण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला काँग्रेस व उद्धव ठाकरेंची शिवसेना बाहेरून पाठींबा देणार असल्याची चर्चा रंगली आहे.

सरकारनामा ब्युरो

Dharashiv News : धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीचे बहुमत असले तरी याठिकाणी भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना सत्तास्थपनेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली सुरु आहेत. भाजपला सत्ता स्थापन करण्यापासून रोखण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला काँग्रेस व उद्धव ठाकरेंची शिवसेना बाहेरून पाठींबा देणार असल्याची चर्चा रंगली असतानाच शनिवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी त्यांचा गट हा भाजपसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सत्तास्थापनेबाबत सस्पेन्स कायम आहे. तर दुसरीकडे कोकणात सहलीला गेलेल्या भाजप सदस्यांसोबत महायुतीमधील एकूण 31 सदस्य असल्याची चर्चा आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यापासून झेडपीचा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अध्यक्षपद हे सर्वसाधारण गटातील महिलेसाठी आरक्षित आहे. या पदासाठी भाजपकडून (BJP) निवडून आलेल्या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील व शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडून आलेल्या माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी इच्छुक असल्याचे समजते. त्यामुळे या पदासाठी या दोघींमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता असतानाच आता शनिवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी त्यांचा गट हा भाजपसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सत्तास्थापनेबाबत सस्पेन्स कायम आहे.

शनिवारी कोकणात सहलीवर असलेल्या महायुतीमधील भाजप, शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी आणि अपक्ष अशा एकूण 31 उमेदवारांची भाजप आमदार राणा पाटील व त्यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांनी भेट घेतली. यावेळी या सदस्यांसोबत पाटील पिता-पुत्र जहाजातून फेरफटका मारत असल्याचे पुढे आले आहे. जिंकलेले हे जवळपास 31 सदस्य आदी मुंबईत गेले होते. त्यानंतर आता कोकणात गेले आहेत. या भेटी दरम्यान सत्ता स्थापनेवर चर्चा झाली. महायुती म्हणून आपण सर्वजण निवडणुकीला सामोरे गेलो आहोत. त्यामुळे महायुती म्हणून सत्ता स्थापन करू असा सूर या सदस्यांचा आहे.

त्यातच गेल्या दोन दिवसापासून भाजपचे आमदार राणा पाटील यांना सत्तास्थपनेपासून दूर ठेवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु आहेत. भाजपला सत्ता स्थापन करण्यापासून रोखण्यासाठी माजी मंत्री तानाजी सावंत यांनी तयारी सुरु केली आहे. त्यांनी निवडणुकीतही भाजपसोबत त्यांच्या भूम-परंडा मतदारसंघात युती केली नव्हती. त्यामुळे ते भाजपच्या विरोधात भूमिका घेणार याची कल्पना सर्वाना आली होती. त्यानुसारच आता त्यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 15 तर काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 11, तर 2 अपक्ष यांच्या मदतीने 28 जणांचा आकडा गाठला असल्याची चर्चा जोर धरली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला काँग्रेस व उद्धव ठाकरेंची शिवसेना बाहेरून पाठींबा देणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, धाराशिवमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेत दोन गट आहेत. तानाजी सावंत यांनी भाजपविरोधी भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे रवींद्र गायकवाड यांनी त्यांच्या गटाचे तीन सदस्य महायुतीमधील भाजपसोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

महायुतीचा निर्णय मुंबई दरबारी

धाराशिव जिल्ह्यात दोन्ही शिवसेना एकत्र येणार नाही, असे रवींद्र गायकवाड यांनी स्पष्ट केले असले तरी धाराशिव जिल्ह्यातील अध्यक्षपदाबाबत महायुतीमधील ज्येष्ठ नेतेमंडळीत मुंबईत चर्चा सुरु आहे. त्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री प्रताप सरनाईक हे दोघेजण शिवसेनेबाबतचा निर्णय घेणार आहेत. त्यामुळे सर्वांचे त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT