आनंद खर्डेकर
Paranda News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची लगबग सुरू होताच मराठवाड्यासह राज्यात पक्षांतराचे वारेही जोरात वाहू लागले आहेत. जालना, परभणीत काँग्रेसच्या माजी आमदारांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही इनकमिंग सुरू झाले आहे. काही दिवसापुर्वी परभणीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार विजय भांबळे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर आता धाराशीव जिल्ह्यातील भूम-परांडा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी पुन्हा एकदा अजित पवारांना साद घातली आहे. लवकरच त्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
काका, मामा सत्तेत असल्याने परंडा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार राहूल मोटे यांनी नात्याने काका असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल चाळीस वर्षांपूर्वी राज्यातील काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार व जिल्ह्यातील राजकारणात वचक असलेले डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या पाठिंब्यावर सांगली येथे नोकरीस असलेले भूम तालुक्यातील गिरवली या खेडेगावातील महारुद्र मोटे मतदारसंघाच्या राजकारणात सक्रिय झाले. वागण्या बोलण्यात ग्रामिण बाज असलेले मोटे अल्पावधीत लोकप्रिय झाले.
सलग दोनवेळा या मतदार संघातून ते आमदार झाले. मोटे यांनी राजकारणात शरद पवार (Ajit Pawar) अन् डॉ. पद्मसिंह पाटील घराण्याचा शब्द मोडला नाही. निष्ठा अन् नात्यांची वीण घट्ट करणाऱ्या मोटे यांना पवार आणि पाटील यांनी राजकारणात सर्वार्थाने सक्षम केले. महारूद्र मोटे यांच्या अकाली निधनानंतर वयाने लहान असलेले त्यांचे चिरंजीव राहुल मोटे यांना राजकीय ताकद देण्याचे काम काका पवार व मामा असलेल्या पाटील घराण्याने केले. राहूल मोटे यांनी शिवसेनेचे तत्कालीन आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा पराभव करत विधानसभेत दमदार एन्ट्री केली.
मतदार संघाच्या राजकारणाची सुत्रे हाती घेतल्यानंतर सलग तीनवेळा आमदार झालेल्या राहूल मोटे यांना अनेक वर्षापासून कायम स्वतः भोवती सत्ता ठेवणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काहीच कमी पडू दिले नाही. उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे असलेल्या जलसंपदा मंत्री व उर्जामंत्री पदाच्या काळात दोन्ही खात्याच्या अनेक योजना मतदार संघात राबविण्यात मोटे यांना यश आले.
असे असले तरी 2019 च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचे डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून मोटे यांना पराभव स्वीकारावा लागला. यातच देशाच्या अन् राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या, पक्षांतरांची लाट उसळली. मातब्बरांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. मोटे यांना राजकीय पाठबळ देणारे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीही हाती कमळ घेतले. मात्र मोटे यांनी पवार घराण्याच्याच पाठीशी राहण्याची भुमीका घेतली.
यातच पुन्हा राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली . जेष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार राजकीय पक्ष म्हणून वेगवेगळे झाले. यामुळे मोटे यांची द्विधा मनस्थिती झाली. जेष्ठ नेते शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग मतदारसंघात आहे. तर सत्तेच्या राजकारणात अजित पवार यांनी कायम साथ दिली. नेमकी कोणती भुमिका घ्यावी? असा प्रश्न मोटे यांच्या समोर निर्माण झाला. विधानसभा निवडणूकीची राजकीय सोय म्हणून मोटे यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. 2024 मध्ये विधानसभा निवडणूकीत मोटे यांचा पराभव झाला. राजकीय साथ देणारे अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले तर राणाजगजितसिंह पाटील हे भाजपाचे आमदार आहेत.
पवार अन् पाटील दोन्ही सत्तेत सहभागी असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात असलेले मोटे मात्र अस्वस्थ होते. कार्यकर्ते समर्थक देखील मोटे यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घ्यावा, याच भूमिकेत होते. मागील काही दिवसापासून मोटे यांच्या राजकीय घडामोडी पाहता ते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत असे प्रकर्षाने जाणवत आहे. वेगवेगळ्या बैठका, कार्यकर्त्यांसोबत वाढत चालेला संवाद व दबाव पाहता मोटे यांची देखील अजित पवार गटात प्रवेश करण्याची तयार झालेली दिसते. त्यांची ही मानसिकता पाहता हा प्रवेश सोहळा लवकरच संपन्न होण्याची शकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.