Haribhau Bagade News : Sarkarnama
मराठवाडा

Haribhau Bagade News : ...म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीने मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही; हरिभाऊ बागडेंचा गौप्यस्फोट!

Anand Surwase

Haribhau Bagade News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून हिवाळी अधिवेशनात अत्यंत वादळी चर्चा होताना दिसून येत आहे. या चर्चेदरम्यान मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकारच असल्याचा आरोप विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केला आहे. तसेच या राज्यातील गरीब समाज हा काँग्रेस राष्ट्रवादीची वोट बँक आहे, ही वोट बँक कमी होऊ नये म्हणूनच त्यांच्या सरकारने मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण दिले नाही, असा जोरदार हल्लाबोल हरिभाऊ बागडे यांनी तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादीवर केला आहे. (Latest Marathi News)

बागडे म्हणाले, मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावे अशी मागणी बऱ्याच वर्षापासून केली जात आहे. मराठा समाज हा गरीब आहे. त्यामुळे उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळत नाही. परिणामी त्यांना नोकरी मिळत नाही. त्यामुळे मराठा समाजातील गरिबी वाढत गेली. तसेच मराठा समाज हा शेती करणारा समाज आहे. शेती उत्पादनातून जनतेचे उदरभरण करण्याची त्यांची भूमिका होती. त्यांनी व्यवसाय केला नाही, त्यामुळे त्यांची प्रगती झाली नाही. त्यातूनच गरिबी नशिबी आल्याने तरुणांना आता आरक्षणाची गरज वाटू लागली आहे. त्यामुळे सरकारने आतातरी त्यांची ही मागणी पूर्ण केली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी सभागृहात व्यक्त केली.

आरक्षणाचा हा मुद्दा का पेटला आहे,यावरून तरुणांची माथी का भडकली जात आहेत, यावर बोलताना बागडे म्हणाले की, मराठा समाजाने आरक्षण मागण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी अण्णासाहेब पाटील यांनी विधानसभा अधिवेशन सुरू असताना मोर्चा काढला. त्यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. मात्र सरकराने त्यावर ठोस भूमिका न घेतल्याने त्यांनी स्वत:चे बलिदान दिले. त्यांनी आत्महत्या केली. मात्र त्यानंतरही तत्कालीन सरकारने त्यांना एखाद्या कस्पटाप्रमाणे समजत त्यांच्या आत्महत्येची दखल घेतली नाही. आरक्षणावर चर्चाही केली नसल्याचा आरोप बागडे यांनी केला.

गरीब जनता काँग्रस -राष्ट्रवादीची वोट बँक -

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरु झाल्यानंतर मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आरक्षण दिले जात नसल्याचा सुरू आळवला जात आहे. तसेच या प्रकरणी देवेंद्र फडणीवस यांना टार्गेट करत अतंत्य खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ केली जात असल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधत बागडे म्हणाले की, ज्यांनी आरक्षण दिले नाही त्यांचेच कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून फडणवीसांना शिव्या देत आहेत.

या कार्यकर्त्यांना वरतून सांगितले जाते की देवेंद्र फडणवीस यांनीच आरक्षण दिले नाही, त्यांना निशाणा करा. मात्र वरच्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समजावून सांगावे, असा इशाराही बागडे यांनी यावेळी दिला. तसेच मराठा समाजाला आरक्षण ज्यांनी आरक्षण दिले त्यांनाच शिव्या देणे ही संस्कृती योग्य नाही. मराठा समाजाला खरे आरक्षण कोणी दिले नसले तर ते काँग्रेस राष्ट्रवादीने दिले नाही. कारण लोकांची गरिबी ही काँग्रेस राष्ट्रवादीची वोट बँक आहे. म्हणूनच त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही, असा घणाघात हरिभाऊ बागडे यांनी यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केला.

काँग्रेस- राष्ट्रवादीला गरिबांना आरक्षण द्यायचे नाही. गरिबांची संख्या वाढली की त्यांची वोटबँक वाढते असे त्यांचे धोरण असल्याचीही टीका बागडे यांनी यावेळी केली. कारण ज्यावेळी 1978 ला मंडळ आयोग स्थापन झाला. त्या आयोगाने 1980 मध्ये त्यांचा अहवाल सादर केला. मात्र तो 1991-92 साली लागू झाला. मग ज्या अहवालातून अनेकांना आरक्षण मिळणार होते, तो दहावर्षे का लपवून ठेवला, याचे कारण म्हणजेच लोकं गरीब रहावी. गरीब राहिली की आपली वोट बँक वाढते म्हणून त्या सरकारने आरक्षण मिळू दिले नसल्याचा आरोपही बागडे यांनी केला.

मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी काँग्रेस-राष्ट्रवादीच -

बागडे पुढे म्हणाले, अण्णासाहेब पाटील यांच्या बलिदानानंतर सरकारला मराठा समाजास आऱक्षण देण्याची संधी होती. 1993 ला खत्री समितीला मागास जातीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यात मराठा समाजाचा समावेश का केला नाही. त्यावेळी समितीला शिफारस करण्याचा अधिकार होता, जर मराठा समाजाचा त्यावेळी मागासलेपणाचा सर्वे झाला असता तर आरक्षण देता आले असते. परंतु तत्कालीन सरकारला मराठा समाजाच्या आरक्षणावर विचाराच करायचा नव्हता, समाजाला आरक्षण देण्याची इ्च्छाच नव्हती, त्यामुळे मराठा आरक्षणाचे मारेकरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच असल्याचा आरोप करत बागडे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीला उघडे पाडले.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT