Raosaheb Danve - Abdul Sattar Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar On Raosaheb Danve : होय, दानवेंना पाडण्यासाठी काळेंना मदत केली ; अब्दुल सत्तारांनी उघडउघड सांगितले

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar news : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा जालना लोकसभा मतदारसंघातून झालेल्या पराभवाची चर्चा काही केल्या थांबत नाहीये. दानवे यांना स्वतःच्या मुलाच्या भोकरदन-जाफ्राबाद मतदारंसघातूनही विरोधी उमेदवार कल्याण काळे यांच्यापेक्षा कमी मते मिळाली आहेत. त्यामुळे रावसाहेब दानवे यांच्या पराभवाला नेमकं कोणाला जबाबदार धरावं, असा प्रश्न पडला आहे.

त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीत आपण कल्याण काळे यांना मदत केल्याची कबुली दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी ही कबुली दिली. जालना (Jalna) विधानसभा मतदारसंघ सोडला तर जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे आमदार आहेत.पैकी पैठण-सिल्लोडमध्ये तर भुमरे-सत्तार हे दोन मंत्री असूनही दानवे यांची या मतदारसंघात पिछेहाट झाली. सत्तार यांनी महायुती असूनही मित्र धर्म पाळला नाही,असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.

यावर एका वृत्तावाहिनीशी बोलतांना सत्तार यांनी माझे कार्यकर्ते रावसाहेब दानवे यांच्यावर प्रचंड नाराज होते. लोकसभेला आपण त्यांना मदत करतो, पण विधानसभेला त्यांच्याकडून आपल्याला मदत होत नाही,याबद्दल त्यांच्या मनात राग होता. त्यामुळे मी जरी दानवेंच्या विरोधात काम केले नसले तरी माझ्या कार्यकर्त्यांनी मात्र कल्याण काळे यांना मदत केल्याची कबुली अब्दुल सत्तार यांनी दिली.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्र्यांना देखील आपण माहिती दिली होती,असेही सत्तार यांनी म्हटले आहे. रावसाहेब दानवे यांच्या पराभवानंतर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय झालेल्या मतांचा आकडा बाहेर आला.यात अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात रावसाहेब दानवे 25 हजाराहून अधिक मतांनी पिछाडीवर असल्याचे समोर आले. या शिवाय पैठण,बदनापूर, भोकरदन,जालना या मतदारसंघात दानवे यांच्यापेक्षा कल्याण काळे यांनाच अधिक मते मिळाली आहेत. या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांनी स्पष्टीकरण देतांना काँग्रेसचे कल्याण काळे आपले मित्र असल्यामुळे त्यांना मदत केल्याचे सांगितले.

मराठवाड्यात सगळ्या मतदारसंघामध्ये मनोज जरांगे फॅक्टर होता. दानवे यांच्यासाठी मी सभा घेतल्या, पण आमचे कार्यकर्ते यावेळी नाराज होते. दानवे यांना मी याची कल्पना दिली होती.केवळ सिल्लोडच नाही तर इतर सगळ्याच मतदारसंघात दानवे यांना काळे यांच्यापेक्षा कमी मते मिळाली आहेत. मराठा (Maratha) आरक्षणावर त्यांनी घेतलेली भूमिका, मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात केलेले विधान या सगळ्याचा फटका रावसाहेब दानवे यांना बसला.

दानवे यांच्याशी मैत्री असली तरी माझे कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मी मतदारसंघात दानवे यांच्यासाठ 17 सभा घेतल्या, पण कार्यकर्त्यांची नाराजी कायम होती. माझ्याकडून शक्य तेवढी मदत करण्याचा मी प्रयत्न केला. पण माझ्या कार्यकर्त्यांनी कल्याण काळे यांचे काम केले, याचा पुनरुच्चार सत्तार यांनी केला.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT