Ramesh Karad, Dhiraj Deshmukh  Sarkarnama
मराठवाडा

Latur Rural Assembly Constituency : लातूर ग्रामीणमधील घडामोडींकडे लक्ष; पुन्हा होणार का तडजोडीचे राजकारण ?

सरकारनामा ब्युरो

सुधाकर दहिफळे

Latur News : लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत तडजोडीच्या राजकारणाचा मतदारांना अनुभव आला. त्यातही भाजप समर्थक कार्यकर्त्यांना पक्षाच्या उमेदवारीची अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली. याबाबतचा संतापही मतदानात दिसून आला.

विशेष म्हणजे या प्रकाराने दुसऱ्या क्रमांकाची मते चक्क नोटाला मिळाली होती. यंदा मात्र काँग्रेसप्रमाणे (Congress) भाजपकडूनही मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यामुळे या भागातील राजकीय घडामोडीकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. (Latur Rural Assembly Constituency News)

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात रेणापूर तालुक्यातील 85 गावे लातूर तालुक्यातील 90 व औसा तालुक्यातील 25 गावांचा समावेश आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर झालेल्या 2009 च्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे वैजनाथ शिंदे, 2014 च्या दुसऱ्या निवडणुकीत काँग्रेसचे ॲड. त्र्यंबक भिसे तर 2019 च्या तिसऱ्या निवडणुकीत काँग्रेसचे धीरज देशमुख ( Dhiraj Deshmukh) विजयी झाले.

माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा प्रभाव व देशमुख परिवाराची साखर कारखान्यावरील वर्चस्व यामुळे येथे काँग्रेसचे वर्चस्व आहे. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे वैजनाथ शिंदे व भाजपचे (Bjp) रमेश कराड यांच्यात लढत झाली. त्यावेळी विलासराव देशमुख यांनी स्वतः प्रचारसभा घेतल्यामुळे वीस हजाराच्या फरकाने शिंदे विजयी झाले.

दुसऱ्या निवडणुकीत वैजनाथ शिंदे यांनी प्रयत्न करूनही त्यांना डावलून त्रिंबक भिसे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली तर भाजपने रमेश कराड यांना परत मैदानात उतरवले या निवडणुकीत करडांचा निसटता झालेला पराभव भाजपच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला. परंतु राज्यात भाजपचे सरकार आल्यामुळे रमेश कराड यांनी पुन्हा जोरदार तयारी सुरू केली कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून मोठी विकासकामे मतदारसंघात खेचून आणली.

याउलट आमदार भिसेंना पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागत होता. जिल्हा परिषद, पंचायत समिती व रेणापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपला मोठी यश मिळाले यामुळे वर्ष 2019 च्या निवडणुकीत कराड आमदार होणार अशी परिस्थिती झाली होती. परंतु एकही सरपंच नसलेल्या शिवसेनेला ही जागा सोडली आणि नवखा व अपरिचित उमेदवार दिल्यामुळे मतदारांत संभ्रम निर्माण झाला.

हे राजकारण तडजोडीचे असल्याची भावना झाली. त्यात काँग्रेसनेही आमदार भिसेंचा पत्ता कट करत धीरज देशमुख यांना उमेदवारी दिली. निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार मतदारसंघात फिरकलाच नाही. त्यामुळे निकाल काय लागणार हे सर्वांनाच कळले होते. आपल्याला गृहीत धरले म्हणून मतदारांतही नाराजी पसरली होती. पूर्वीच्या रेणापूर मतदारसंघात गोपीनाथ मुंडे यांनी नेतृत्व केले मग हा मतदारसंघ भाजपने कशामुळे सोडला या प्रश्नांची उत्तर कार्यकर्त्यांना कळाली नाहीत.

भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांनी नोटाला मतदान करणे पसंत केले. परिणामी नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. याची भाजप पक्षश्रेष्ठींनी दखल घेत कराड यांना काही महिन्यातच जिल्हाध्यक्ष केले. एका वर्षातच 2020 मध्ये रमेश कराड यांना विधान परिषदेवर घेत चुकीची दुरुस्ती केली. अर्थात जनतेतून निवडून येण्याची आमदार कराडांची प्रबळ इच्छा असल्यामुळे ते जोरदार तयारी करत आहेत. मात्र, या निवडणुकीत पुन्हा तडजोडीचे राजकारण होईल काय ? याची चर्चा मतदारसंघात आहे. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

देशमुखांच्या उमेदवारीबाबत काँग्रेसकडून ठराव

काँग्रेसचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांना परत उमेदवारी देण्यात यावी असा एकमुखी ठराव काँग्रेसच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला. त्यामुळे धीरज देशमुख यांची उमेदवारी निश्चितच मानली जात आहे. यामुळे आतापासूनच देशमुख यांनी तयारी सुरू केली आहे. विकासकामांच्या उद्घाटनाच्यानिमित्ताने त्यांनी रेणापूर तालुक्यात दौरे सुरू केले आहेत

भाजपकडून कराड दावेदार

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात धीरज देशमुख यांना लढत देण्यासाठी भाजपकडे आमदार रमेश कराड यांच्यासारखा दुसरा प्रबळ उमेदवार नाही. त्यामुळे कराड भाजपकडून सशक्त दावेदार असतील. त्यातही गेल्या वेळेला केलेली चूक भाजप पक्षश्रेष्ठी यावेळी करणार नाहीत, अशी आशा कराड समर्थकांना आहे. विशेष म्हणजे कराड व देशमुख यांच्यातच लढत व्हावी, अशी अनेक मतदारांचीही इच्छा आहे. दोघात लढत झाली तरच कार्यकर्त्यांना मान - सन्मान मिळणार आहे. गेल्यावेळेस कार्यकर्त्यांना, मतदारांना कोणी विचारले सुद्धा नाही याचा राग आजही अनेकांच्या मनात आहे.

व्हीआयपी आमदार ठसा पुसावा लागणार

आमदार धीरज देशमुख हे सतत मुंबईत असतात. हा मतदारसंघ ग्रामीण असल्यामुळे गोरगरीब लोकांना ते सहज उपलब्ध होत नाहीत. अशी चर्चा नागरिकांमध्ये असते. त्यामुळे त्यांची ओळख व्हीआयपी आमदार झाली आहे. ती पुसण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. या उलट आमदार कराड हे दिवसभर त्यांच्या कार्यालयात बसून असतात ते आलेल्या प्रत्येक व्यक्तीला भेटतात ही वस्तुस्थिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT