Imtiyaz Jaleel, Bhagwat Karad, Chandrakant Khaire  Sarkarnama
मराठवाडा

Loksabha Election 2024 : कराड-इम्तियाज यांचा उद्घाटन, भूमिपूजनावर भर; तर खैरेंचा प्रचार निष्ठेवर...

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर होईल तेव्हा होईल, त्याआधी संभाव्य उमेदवारांचा प्रचार मात्र जोरात सुरू झाला आहे. भाजपचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी जिल्हाभरात उद्घाटने, भूमिपूजनांचा धडका लावला आहे. तर एमआयएमचे विद्यमान खासदार यांनीही राखून ठेवलेल्या खासदार निधीतून जिल्ह्यातील देवस्थानांकडे जाणारे रस्ते, सभामंडप, शहरातील मोहल्ल्यांमध्ये सिमेंट रस्त्यांच्या कामावर जोर दिला आहे.

तर शिवसेना ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्याकडे मात्र सध्या सांगण्यासारखे काही नसल्यामुळे ते पक्षनिष्ठेवरच भर देऊन जिल्हाभरात प्रचार करत आहेत. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडी आणि एमआयएम (MIM) अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. महायुतीकडून ही जागा भाजप लढवणार हे स्पष्ट आहे, उमेदवार म्हणून कराड यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे.

गेल्या वर्षभरापासून त्यांची सुरू असलेली तयारी आणि त्याला आता आलेला वेग पाहता पक्षाने त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवल्याचे बोलले जाते. त्यामुळे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून डाॅ. भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी केलेल्या कामासह केंद्राच्या विविध योजनाचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आचारसंहिता लागण्यापूर्वी पोहाेचवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा झालेल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरच बुधवारी दि. 13 मार्च 2024 रोजी "समुद्धी से संमेलन" हा कार्यक्रम आयोजित केला आहे.ू

केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना एकाच छताखाली लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. दुसरीकडे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनीही सोशल इंजनिअरिंग साधत कन्नड येथील शेलगावात सभामंडप, महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करताना दिसत आहेत. या शिवाय शहरातील विविध भागात सिमेंट रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ करत त्यांनीही प्रचारात उडी घेतली आहे. मी मुंबईतून लोकसभा निवडणूक लढणार, असे सांगणारे इम्तियाज जलील संभाजीनगरातच सक्रिय झाल्याने ते इथूनच लढणार हे स्पष्ट झाले आहे.

खैरेंची मदार निष्ठेवरच...

शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे हे संभाजीनगर जिल्ह्याचे सलग चार टर्म खासदार होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा साडेचार हजार मतांनी पराभव झाला. पराभूत झाल्यानंतरही त्यांनी जनतेशी संपर्क कायम ठेवला, पण विकासकामे त्यांना करता आली नाहीत. त्यामुळे आता पुन्हा निवडणुकीला सामोरे जाताना शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतरही मी उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलो, यावरच ते जोर देताना दिसत आहेत. शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एमआयएमचा खासदार निवडून आल्यामुळे जिल्ह्याचे कसे नुकसान झाले, हे सांगून सहानुभूतीच्या लाटेवर खैरे स्वार होण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

(Edited by Amol Sutar)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT