Nanded Sarkarnama
मराठवाडा

Loksabha Election 2024 : चव्हाण - चिखलीकरांत दिलजमाई; दोन्ही कट्टर विरोधक एकत्र...

Nanded BJP : आमच्यातील कटुता संपली असून येणाऱ्या निवडणुकीत समन्वय रहावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची भूमिका दोन्ही नेत्यांनी केली स्पष्ट.

Laxmikant Mule

Nanded News : नांदेड जिल्ह्याने गेल्या वीस वर्षांत खासदार अशोक चव्हाण व खासदार प्रतापराव पाटील - चिखलीकर यांच्यातील राजकीय वैर पाहिले आहे. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर सडकून टीका केली आहे. पण सध्या तरी हे चित्र बदलायला सुरुवात झाली आहे. याचे कारण म्हणजे अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये झालेला प्रवेश. आता हे दोन्ही कट्टर विरोधक एकत्र दिसत आहेत.

भाजपत प्रवेश केल्यानंतर नांदेड शहरात अशोक चव्हाण यांचे दोन दिवसांपूर्वी आगमन झाल्यानंतर त्यांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. त्यांचा शहरात आठ दिवस मुक्काम राहणार आहे. या मुक्कामाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी काॅंग्रेसच्या 55 माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश करुन घेतला. तर सायंकाळी शासकीय विश्रामगृहात आजी - माजी खासदार, आमदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला चिखलीकर येणार की नाही याकडे लक्ष लागले होते.

बंद दराआड झालेल्या बैठकीत चिखलीकर उपस्थित राहिले. तसेच अशोक चव्हाण यांचे जुने सहकारी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, सुर्यकांताबाई पाटील, माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर यांच्यासह खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमदार राम पाटील रातोळीकर आमदार भिमराव केराम, माजी आमदार अमरनाथ राजूरकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यावेळी उपस्थित होते.

आमच्यातील कटुता संपली असून येणाऱ्या निवडणुकीत समन्वय रहावा यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, अशी भूमिका दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केली आहे. नांदेड शहरात चिखलीकरांनी शनिवारी सायंकाळी रामकथेचे आयोजन केले आहे. या सोहळ्याचे उद्घाटन अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्ताने हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. अशोक चव्हाण यांनी बोलाविलेल्या बैठकीला चिखलीकरांनी उपस्थिती लावल्याने रामकथेच्या उद्धाटनाला अशोक चव्हाण उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वरकरणी दिलजमाई...

या दोन्ही नेत्यांत वरकरणी दिलजमाई होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हे दोन्ही नेते जिल्ह्यातील राजकारणात तोलामोलाचे आहेत. एका म्यानात दोन तलवारी ठेवण्याची कसरत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना करावी लागणार आहे. लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आल्याने सध्या तरी वाद नको, अशी भूमिका घेतली असावी अशी चर्चा सुरू झाली आहे. तसेच उमेदवारी कोणाला मिळणार हे निश्चित नाही. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी हम साथ साथ है... दाखवायला सुरुवात केली आहे.

(Edited by Amol Sutar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT