Maratha Reservation News : राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारखा खमक्या माणूस मराठा आरक्षण उपसमितीचा अध्यक्ष झाला तेव्हा आम्हाला आनंद झाला होता. ते मराठा समाजाचे नुकसान होऊ देणार नाहीत, हैदराबाद गॅझेटनूसार नोंदी शोधून कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करतील, असा आम्हाला विश्वास होता. पण विखे पाटील नेमके उलट वागायला लागले आहेत, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला.
शिंदे समितीची मुदत संपली, पण या समितीला मुदतवाढ देण्याची आठवण उपसमितीला नाही, समिती झोपा काढते का? फक्त सरकारच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे. हैदराबाद गॅझेट लागू का करत नाही? ही उपसमिती फक्त मराठा समाजामध्ये भांडण लावण्यासाठी आहे का? मराठवाड्यातील अभ्यासक आणि आमच्या अनेक समन्वयकांनी उपसमितीची बैठक घ्या, अशी मागणी विखे पाटलांकडे केली. पण ते आमची बैठक घेत नाही आणि काही विकृत लोकांना निमंत्रित म्हणून बोलावून त्यांच्याशी चर्चा करतात, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला.
विखे पाटील (Radhakrishn Wikhe-patil) हे बैठकांचे फोटो टाकून सरकारच्या पैशाची उधळपट्टी करत आहेत. त्यांना मराठा समाजाचे प्रश्न सोडवायचे नाहीत, तर समाजामध्ये भांडण लावायचे आहे, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. शिंदेंच्या काळात कुणबी दाखले दिले जात होते, मग आता का मिळत नाहीत? जून महिना जवळ आला आहे, आमच्या गोरगरिबांच्या लेकरांच्या महाविद्यालयातील प्रवेशाचे दिवस आहेत, त्यांना व्हॅलिडीटी का दिली जात नाही? असा सवाल करत जरांगे पाटील यांनी विखे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली.
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार होते, त्याचे काय झाले? फक्त मराठा समाजाची दिशाभूल सरकार आणि ही उपसमिती करत आहे. सरकारनेच काढलेल्या जीआरची अंमलबजावणी उपसमिताला करता येत नसेल तर मग ती काय कामाची? ती नसललेलीच बरी, अशी उद्विग्नता जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. राज्यात मराठ्यांच्या 58 लाख नोंदी सापडल्या, तुम्ही प्रमाणपत्र किती वाटले? वैधता किती जणांना दिली? असा प्रश्नांचा भडिमार करत जरांगे पाटील यांनी विखे पाटील यांच्या कारभारावर सडकून टीका केली.
सातारा संस्थानच्या गॅझेटचे काय झाले, अहवाल तयार होऊन चार महिने झाले आहेत, सरकारला तो अहवाल घ्यायचा नाही का? पंधरा लाख नोंदी त्यात सापडल्या आहेत. 42 लाख मराठा एकट्या पश्चिम महाराष्ट्राचा जातोय आरक्षणात, नाही न्यायचायं तुम्हाला? ईडब्लूएसमधून मुले उपोषणाला बसले आहेत. महावितरण, शिक्षक भरती, पोलीस भरतीतील तरुणांना 2014 पासून नियुक्त्या नाहीत, याकडेही जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी उपसमितीचे लक्ष वेधले.
सारथीचा निधी थांबला, 80 हजार विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती थांबल्या, मग उपसमिती तिथे बसून काय करते? परदेशात गेलेल्या 75 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थकली आहे. महामंडळाचे पैसे थकले आहेत, असा आरोप करत जरांगे पाटील यांनी उपसमितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.