Manoj Jarange Prasad Lad Radhakrishna Vikhe Patil: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समाजाच्या मागण्यांवर शासनाकडून काढण्यात आलेल्या जीआरची अंमलबजावणी व विविध मागण्यासाठी उपोषणाची घोषणा केली आहे. उद्या, 30 मे पासून अंतरवाली सराटीत जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत. या पार्श्वभूमीवर हे आंदोलन होऊ नये, मराठा समाजासाठी सरकारकडून काय करण्यात आले? काय केले जात आहे आणि काय करणार? याची सविस्तर माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपा आमदार प्रसाद लाड हे पुन्हा अंतरवालीत जाऊन जरांगे पाटील यांना देणार आहेत.
अंतरवाली सराटीत जाण्यापुर्वी विखे पाटील, प्रसाद लाड यांनी विभागीय आयुक्तालयात महत्त्वाची बैठक घेतली. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांनी हैदराबाद गॅझेटच्या जीआर नंतर किती कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप झाले, मराठा विद्यार्थ्यांच्या वसतीगृहांची स्थिती, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, आंदोलना दरम्यान मराठा आंदोलकांवर दाखल गुन्ह्यांची सद्यपरिस्थिती, कुणबी प्रमाणपत्रांच्या वैधतेची प्रलंबित प्रकरणे अशा विविध विषयावरील सखोल माहिती विखे-लाड यांनी जाणून घेतली.
सरकारकडून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या बहुतांश मागण्या सरकारने पूर्ण कलेल्या आहेत. उर्वरित मागण्यांवरही काम चालू असल्याचा दावा केला जात आहे. मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा उपोषणाला बसावे लागणार नाही, असा दावाही विखे पाटील आणि लाड यांनी अंतरवालीत जाण्याआधीच केला आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तालयात होत असलेल्या या बैठकीला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, 22 मे रोजी आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. तत्पूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसाद लाड यांना मराठा संघटनेच्या काही कार्यकर्त्यांकडून धमकीचे फोन आणि ते थांबलेल्या हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयात राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड व विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीच्या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
ही बैठक पार पडल्यानंतर विखे पाटील आणि प्रसाद लाड हे तातडीने अंतरवाली सराटीकडे रवाना होणार आहेत. सरकारच्यावतीने हे शिष्टमंडळ अंतरवालीत जाण्याआधी जरांगे पाटील यांच्या निवासस्थानी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. एकूणच जरांगे पाटील यांच्या उद्याच्या बेमुदत उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.