Manoj Jarange-Patil Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil News : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात मनोज जरांगेंची आणखी एक 'रेकॉर्ड ब्रेक' सभा? एक लाख बांधवाची...

अविनाश काळे

Umraga News : मराठा आरक्षणासाठी लढा पुकारलेले मनोज जरांगे पाटील यांची उमरगा शहरात रविवारी (ता.१०) रात्री श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयाच्या शिवाजी दाजी मोरे क्रिडा संकुलाच्या मैदानावर होणाऱ्या आरक्षण जनजागृती सभेची जय्यत तयारी सुरू आहे. उमरगा तालुक्यासह कर्नाटकातील सीमावर्ती भागातील एक लाखापेक्षा अधिक मराठा बांधव उपस्थित रहाणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली. (Latest Marathi News)

जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी लढा उभा केला आहे, त्यांच्या समर्थनार्थ उमरगा येथील मराठा बांधवांनी आंदोलन, उपोषण केलेले आहे. आता आरक्षणाचा लढा अंतिम टप्यात आला आहे,  कसल्याही परिस्थितीत आरक्षण मिळवून घेण्यासाठी व्यापक जनजागृती सुरू आहे, त्या अनुषंगाने उमरग्यात विराट सभेचे नियोजन करण्यात आले आहे.

सभेसाठी २० बाय २० आकाराचे, आठ फुट उंचीचे व्यासपीठ उभारण्यात आले आहे, त्या पुढे शंभर फुट लांबीचा रँप तयार करण्यात आला आहे. सभेला एक लाख लोकांच्या उपस्थितीचे नियोजन करण्यात आले असून पश्चिमेच्या बाजूने येणाऱ्या वाहनांसाठी दत्त मंदिर, पाटबंधारे विभाग व ईदगाह मैदानावर तर पूर्वेकडून येणाऱ्या वाहनांसाठी आईसाहेब मंगल कार्यालय, काळा मारूती मंदिर, अंतुबळी सभागृहाच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

महिलांच्या वाहनांसाठी साईधाम परिसर, पंचायत समिती मैदानावर वाहन पार्किंगची व्यवस्था राहिल. महिलांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. सकल मराठा समाजाने ग्रामीण भागासह सीमावर्ती भागात आरक्षण संदर्भात प्रबोधन, बॅनर्स, प्रचार करण्यात आला आहे, त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. शिस्तपालनासाठी एक हजार स्वंयसेवकांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

सिमावर्ती भागात पहिलीच सभा -

महाराष्ट्र - कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेल्या उमरगा, लोहारा तालुक्यात मराठा बांधवांची मोठी संख्या आहे, शिवाय सीमेलगत असलेल्या कर्नाटकातील जवळपास वीस गावात मराठी भाषिक बांधव आहेत, विशेषतः त्यात मराठा समाजाची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण मिळण्यासाठी सुरु असलेला जरांगे पाटील यांचा लढ्यामुळे या भागातील नागरिकांना त्यांचे आकर्षण आहे. उमरगा सकल मराठा समाजाने कर्नाटकातील गावात आरक्षण व सभेविषयी प्रबोधन केले आहे.

शंभर जेबीसीने होणार फुलांचा वर्षाव -

मराठवाड्याच्या अगदी टोकाला, कर्नाटक सीमेलगत असलेल्या उमरगा शहरात मनोज जरांगे पाटील पहिल्यांदाच येत असल्याने रविवारी सांयकाळी आगमन झाल्यानंतर त्यांच्यावर शंभर जेबीसीच्या सहाय्याने फुलांचा वर्षाव करण्यात येणार आहे. दरम्यान सभेला उपस्थित रहाणाऱ्या मराठा बांधवांनी मराठा व्यापारी बांधवाच्या वतीने अल्पोहाराची सोय करण्यात आली आहे.

(Edieted By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT