Chhagan Bhujbal-Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Jarange Vs Bhujbal : जरांगे पाटलांचा भुजबळांवर पलटवार; ‘तुमचा अख्खा बायोडाटाच मराठ्यांकडे...’

Vijaykumar Dudhale

Jalna News : मंत्री छगन भुजबळांचा बायोडाटाही मराठ्यांना माहिती आहे. महाराष्ट्र भवन उभारताना काय काय केलं. त्यांच्या प्रॉपर्ट्या कशा झाल्या. त्यांनी कुणाचं खाल्लं. आम्ही सासरचं तुकडं (भाकरी) मोडलं किंवा कोणा पाहुण्यांचं मोडलं तर आम्ही आमच्याचेच खातोय. आम्ही महाराष्ट्रातील गोरगरीब लोकांच्या ताटातील खाल्लं नाही. त्यांच्या ताट्यात आम्ही तुमच्यासारखं XXXतलो नाही, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्या टीकेला खणखणीत उत्तर दिलं. (Chhagan Bhujbal's entire biography is with the Marathas: Jarange Patil)

जालना जिल्ह्यातील अंबड येथे आज झालेल्या ओबीसी मेळाव्यात बोलताना भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. त्या टीकेला जरांगे पाटील यांनी उत्तर दिले. ‘मी सासरच्या घरचं तुकडं मोडत नाही,’ अशी टीका भुजबळांनी जरांगे यांच्यावर केली होती. त्याला उत्तर देताना जरांगे म्हणाले की, छगन भुजबळ हे कुणाच्या तिथं राहतात, ते कुठचे आहेत, त्यांनी कुठं जाऊन काय काय विकलं, कुठं कुठं कुठचा धंदा केला आहे, हे सर्व माहिती आहे. भुजबळांचा बायोडाटाही मराठ्यांना माहिती आहे. आम्ही त्यांना पहिल्यापासून ओळखतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बीड जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील काही लोकं गोदावरी खोऱ्यात जालना जिल्ह्यात येऊन काम करत आहेत. आपली पोटं भरत आहेत, हे भुजबळ यांना माहिती नाही, असे त्यांनी सासूरवाडीच्या संदर्भाने स्पष्टीकरण दिले. मला मराठ्यांचं देव व्हायचं नाही. पण, तुम्ही देव झाल्यानंतर लेकरांच्या ताटातलं खाल्लं. तुम्ही नुसतं स्वतःच्या स्वार्थासाठी ओरबडत राहिलात. तुमचा आता सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण ओबीसी बांधवांनाही आता माहिती झालं आहे. तुमचा विषय आता संपलेला आहे.

छगन भुजबळ यांच्या एकेरी टीकेवर मनोज जरांगे पाटील यांनी समंजस भूमिका मांडली. त्यांना बोलू द्याना. एकेरी बोलण्याने काही होत नाही. ते अनुभवी, मातब्बर, मुरब्बी नेते आहेत. त्यामुळे ते बोलण्यामुळे काहीच फरक पडत नाही. आमच्या लक्षात आलंय आता, त्यांना महत्त्व द्यायचं नाही. वयानुसार त्यांचा तोल चालला आहे. आपण त्यांना उत्तरं देत राहिलो, तर वयानुसार त्यांना वेगळाच धक्का बसू नये. त्यामुळे त्यांना महत्त्व द्यायचं नाही, असं आम्ही ठरवलं आहे, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

भुजबळांबद्दलचा आदर आज मनातून संपला

जरांगे म्हणाले की, जसे विचार, संस्कार, खायची, ओरबडायची माहिती आहे. त्या ओरबडण्याच्या सवयीनुसार, संस्कारानुसार ते तसे बोलत आहेत. आमच्यासारख्यांनी एवढ्या मोठ्या मातब्बर, मुरब्बी नेत्याला काय उत्तर द्यावं. आमच्या नजरेत मुरब्बी नेते म्हणून होते, आमचा त्यांच्याशी जरी वैचारिक विरोध असेल, पण व्यक्ती म्हणून छगन भुजबळ यांना आमचा पहिल्यापासून विरोध नाही. त्यांच्या विचाराला आमचा विरोध आहे. त्यांच्याविषयी आमच्या मनात जो आदर होता. तो मराठा आणि ओबीसींच्या मनातून आज गेला आहे. सर्वसामान्य ओबीसींची भावना मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, अशीच आहे.

तुमचं कष्ट वाया जाईल; पण मराठा नेते पडणार नाही

छगन भुजबळ यांना निवडणुकीत पाडू असं आम्ही कधी म्हटलं नाही. आमचे मराठा नेते तुम्हाला पडत असतात होय?. आमचे नमुने चांगल्या चांगल्यांना पडले नाहीत आणि तुम्हाला पडत असतात होय? ते लयं निब्बर आहेत. आमचेच नेते आम्हाला सुधरू देत नाहीत आणि तुम्हाला कधी सुधरू देतील. तुम्ही कशाला नाही त्या गप्पा मारता. तुमचे सर्व कष्ट वाया जाईल, तुम्हाला ते सुधरू देणार नाहीत. निवडणुकीच्या राजकारणात मराठा नेते मुरब्बी आहेत. आम्ही गेली ७० वर्षे आरक्षणासाठी लढतो आहाेत. पण आम्हाला ते साथ देत नाहीत, तुम्हाला ते कधी पडणार. तुम्हाला ते पडत नसतात, असा टोलाही जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT