Chhatrapati Sambhaji Nagar : भाजपाचे प्रदेश सरचिटणीस असलेल्या संजय केनेकर यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली. मंत्री अतुल सावे, खासदार डाॅ. भागवत कराड यांच्याशी फारसे सख्य नसताना केनेकर यांची झालेली निवड या स्थानिक नेत्यांसाठी धक्का देणारी होती. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ही निवड केली असल्याने या सगळ्या नेत्यांनी 'देवाभाऊं'चा आदेश शिरसावंद्य मानत आमदार संजय केनेकर यांचे जल्लोषात स्वागत केले.
विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्यानंतर पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) दाखल झालेल्या संजय केनेकर यांच्या मिरवणुकीला क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरुवात झाली. फुलांनी सजवलेल्या वाहनात संजय केनेकर यांच्यासोबत मंत्री अतुल सावे, खासदार डाॅ. भागवत कराड, शहर-जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर व सर्वच महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.
संजय केनेकर यांची विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर शहर (BJP) भाजपामध्ये नाराजी असल्याच्या चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू होत्या. आज या चर्चांना सगळ्याच स्थानिक नेत्यांनी विजयी मिरवणुकीत सहभागी होत पुर्णविराम दिला. इतर कुठल्याही राजकीय पक्षातील नाराजी ही उघडपणे समोर येते. मात्र शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपात ती फारसी व्यक्त होत नाही.
गेल्या दोन अडीच वर्षात राज्यात घडलेल्या घडामोडी, सत्तांतर, युतीमध्ये शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी यांची एन्ट्री झाल्यानंतर आपल्या वाट्याची मंत्री पदं गेल्याचे दुःख अनेक भाजपा आमदारांना झाले. पण कुणीही व्यक्त झाले नाही, की उघड नाराजी व्यक्त केली नाही. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक भाजपाचे आमदार निवडून आल्यानंतरही तीन पक्षांचे सरकार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळ स्थापन करताना अनेक इच्छुकांच्या नावावर फुली मारली होती.
संजय केनेकर हे गेल्या अनेक वर्षापासून भाजापमध्ये कार्यरत आहेत. अगदी विद्यार्थी दशेपासून संघटनेत विविध पदांवर काम करत त्यांनी आमदार पदापर्यंतचा प्रवास केला आहे. 2014 मध्ये उमेदवारीची आशा बाळगून असलेल्या केनेकर यांना ऐनवेळी डावलण्यात आले आणि अतुल सावे यांना उमेदवारी देण्यात आली. तेव्हापासून सावे विरुद्ध केनेकर वाद असल्याच्या चर्चा होत्या. स्थानिक पातळीवर हे नेते ऐकमेकांना पाण्यात पाहत होते.
सावे मंत्री, तर केनेकर संघटनेत प्रदेश सरचिटणीस म्हणून काम पाहत होते.अनेकदा या दोघांमध्ये खटकेही उडाले. पण त्याचा कुठेही अतिरेक किंवा उद्रेक झाला नाही. लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना अधिक बळकट झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपासाठी हे चांगले चित्र नाही, हे ओळखूनच देवेंद्र फडणवीस यांनी संजय केनेकर यांना विधानपरिषदेवर घेण्याची खेळी केली.
अतुल सावे,संजय केनेकर यांच्यात मतभेद असले तरी हे दोघे देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आहेत. सावे यांना आमदार आणि मंत्री करण्याचा निर्णय जसा फडणवीस यांचा होता, तसा केनेकरांच्या बाबतीतही आहे. त्यामुळे 'गिले शिकवे भूल के, दुश्मन भी गले मिल जाते है' याची प्रचिती या पुढील काळात येणार आहे. नाराजीच्या चर्चांना पुर्णविराम देत नवनिर्वाचित आमदार आणि पक्षातील सहकारी असलेल्या संजय केनेकर यांच्या विजयी मिरवणुकीत स्थानिक सगळ्या नेत्यांनी सहभागी होत 'हम साथ साथ है'चे दर्शन घडवले आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.