Supriya Sule Met Sarpanch Deshmukh Family Sarkarnama
मराठवाडा

Supriya Sule Vist Massajog News : सुरेश धस यांच्याभोवती संशयाचे जाळे, सुप्रिया सुळेंनी घेतली देशमुख कुटुंबियांची दुसऱ्यांदा भेट!

MLA Suresh Dhas surrounded by suspicion, MP Supriya Sule pays second visit to Deshmukh family. : बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड हे यावेळी सुळे यांच्यासोब होते. संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सुरूवातीपासून आक्रमक भूमिका घेतली होती.

Jagdish Pansare

Beed News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात आरोपी आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आक्रमकपणे रस्त्यावर उतरलेले भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याभोवती सध्या संशाचे जाळे निर्माण झाले आहे. ज्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी रान पेटवले, त्यांचीच गुप्तपणे घेतलेली भेट उघड झाली आणि धस यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. देशमुख कुटुंबासह विरोधकांनी देखील धस यांच्या या भेटीबद्दल नाराजी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज दुसऱ्यांदा मस्साजोगला भेट देत देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. एवढेच नाही तर परळीतील व्यापारी दिवंदत महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सात्वंन करून न्याय मिळवून देण्याचा शब्द दिला. बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड हे यावेळी सुळे यांच्यासोब होते. संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सुरूवातीपासून आक्रमक भूमिका घेतली होती.

स्वतः राष्ट्रवादीचे (NCP) नेते शरद पवार यांनी मस्साजोगला भेट देऊन देशमुख कुटुंबिय आणि गावकऱ्यांशी चर्चा केली होती. तसेच या परिस्थितीला एकत्रितपणे तोंड देऊन आरोपींना शिक्षा होईल यासाठी लढा देऊ, असे आवाहन शरद पवार यांनी केले होते. दरम्यान, भाजपचे आमदार सुरशे धस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला यासाठी न्याय मोर्चे काढण्यात आले.

सुरेश धस दररोज नवे आरोप, घोटाळ्याची प्रकरण त्याचे पुरावे आणि यात धनंजय मुंडे यांचा कसा दबाव आहे हे सांगत होते. धस यांच्या आक्रमक भूमिकेमुळे देशमुख कुटुंबियांसह संपूर्ण मराठा समाजाने त्यांच्यावर विश्वास टाकला. पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धस आणि धनंजय मुंडे यांची साडेचार तास भेट झाल्याचे गुपित जाहीर केले आणि धस अडचणीत आले. डोळ्याचे आॅपरेशन झाल्यामुळे मी त्यांना भेटायला गेलो होते, माझा लढा सुरूच राहील असे ते सांगत असले तरी त्यांनी आता विश्वास गमावला एवढे मात्र निश्चित.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात आक्रमक भूमिका घेत या कुटुंबाच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत, असा विश्वास दिला.मारेकऱ्यांना फाशी व्हावी यासाठी फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. तसेच या प्रकरणातील आरोपींनी खंडणी मागितल्याचे देखील समोर आले आहे. खंडणी मागणे हा गुन्हा असून याप्रकरणी ईडी-सीबीआय या तपास संस्थांच्या माध्यमातून तपास झाला पाहिजे, असेही सुळे यांनी माध्यमांशी बोलतांना स्पष्ट केले.

या खूनप्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता आहे. हा आरोपी यंत्रणांना का सापडत नाही? सदर खूनप्रकरणाला अनेक कंगोरे असून या घटनेशी संबंधित सर्वांच्या फोनचे सीडीआर मिळाले पाहिजे. या प्रकरणाला राजकीय रंग देण्याची आमची इच्छा नाही. परंतु एका पिडीत कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचे सुळे यांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आम्ही या प्रकरणात भेट घेऊन आरोपींना तातडीने शिक्षा व्हावी, अशी मागणी केल्याचे त्या म्हणाल्या.

देशमुख कुटुंबाना न्याय आणि मारेकऱ्यांना शिक्षा मिळावी यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करीत राहणार आहोत. पिडीत कुटुंबाच्या लढ्यात आम्ही सर्वशक्तीनिशी त्यांच्यासोबत आहोत, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी देशमुख कुटंब आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांना दिला. पिडीत कुटुंबाचे म्हणणे शासनापर्यंत पोहोचावे यासाठी आम्ही सर्वांनी मुख्यमंत्री महोदयाची वेळ मागितली असून त्यांनी वेळ दिल्यानंतर त्यांना भेटून आम्ही गुन्हेगारांना कठोर शासन अर्थात फाशी व्हावी, अशी मागणी करणार असल्याचे सुळे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT