Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्याची अन् राज्याची पर्यटन राजधानी म्हणून देशाच्या नकाशावर झळकत असलेल्या छत्रपती संभाजीनगरात नागरिकांना मात्र पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. जागतिक वारसा असलेल्या अजिंठा-वेरुळच्या लेण्या, अजिंक्य असा देवगिरी किल्ला, बीबी का मकबरा, पाणचक्की आणि बावन्न दरवाजांचे शहर अशी ओळख असलेल्या संभाजीनगरची ओळख आता पाणी नसलेले शहर अशी होऊ लागली आहे. अर्थात याला जबाबदार येथील लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार आणि केंद्र-राज्यात मंत्रीपद भोगलेले पुढारी आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहराचा (Chhatrapati Sambhajinagar) विचार केला तर आधी काँग्रेसच्या प्रभावाखाली आणि गेल्या पंचवीस वर्षात शिवसेना-भाजप पक्षाच्या सत्तेत शहर आणि जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे. औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रात शहराने कात टाकली असली तरी मुलभूत गरजांकडे राजकारण्याचे सातत्याने दुर्लक्ष झाले. त्यात महत्वाचा घटक म्हणजे पाणी. या शहरातील नागरिकांना दहा-बारा दिवसानंतर पाणी मिळते, असे सांगितले तर कोणालाही पटणार नाही. पण ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. सगळ्याच राजकीय पक्षाने आलटून पालटून या शहरावर जिल्ह्यावर अधिराज्य गाजवले, पण पाण्याचा प्रश्नाकडे कोणीच गांभीर्याने पाहिले नाही.
शहरापासून पन्नास किलोमीटरवर आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून जायकवाडी प्रसिद्ध आहे. या धरणातील पाण्यावर (Water Crisis) संभाजीनगरचे उद्योग, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील शेती अवलंबून आहे. तर याच धरणातील पाण्यावर संभाजीनगरकरांची तहानही भागते. पण शहराचा विस्तार आणि औद्योगिकरण वाढले तशी लोकसंख्याही वाढली. पण याचा विचार न करता आपल्याच मस्तीत राजकारणी दंग राहिले. तहान लागल्यावर विहिर खणण्याचा प्रकार म्हणजे आताची पाणीपुरवठा योजना म्हणावी लागेल. या सगळ्या परिस्थितीला जबाबदार कोण असेल तर येथील राजकारणी.
अनेक वर्ष सत्ता, पदं, आमदारकी, खासदारकी, मंत्री म्हणून मिरवणाऱ्या पुढाऱ्यांना आता पाणी कुठे आहे? असा जाब जनता विचारू लागली आहे. गेल्या वीस वर्षांत शहरातील बड्या नेत्यांनी मंत्रिपदे, आमदारकी, खासदारकी उपभोगली. घटनात्मक पदे मिळाल्यानंतर त्यांच्या आरत्याही ओवाळल्या गेल्या. पण, जनतेच्या घशाची कोरड कायम राहिली. भर उन्हाळ्यात तब्बल 10 ते 12 दिवसांनंतर नळाला पाणी येत असल्याने नेत्यांनी मिळवलेली वा त्यांना मिळालेली पदे केवळ खुर्च्या उबवण्यासाठी वापरली का? असा संतप्त सवाल शहरातील जनतेतून केला जात आहे.
महापालिकेतून राजकारणाची सुरवात करणारे चंद्रकांत खैरे चार वेळा खासदार, दोन वेळा आमदार राहिले. पालकमंत्री असलेले संजय शिरसाट चौथ्यांदा आमदार झाले. मंत्री अतुल सावे, आमदार प्रदीप जैस्वाल यांनी तर हॅटट्रिक केली. राजस्थानचे राज्यपाल असलेले हरिभाऊ बागडे विधानसभेचे अध्यक्ष होते. त्यासोबतच अनेकांनी शहराचे प्रतिनिधित्व केले, पण हे पद फक्त मिरवण्यासाठीच होते का, पाण्यासाठी यांनी काय केले, असा प्रश्न नागरिक करत आहेत.
बागडे विधानसभेचे अध्यक्ष झाले, पण पाण्यावर गप्पच
राजस्थानचे विद्यमान राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी 2014 ते 19 अशी पाच वर्षे विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम केले. त्याआधी 1995 ते 99 मध्ये रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री होते. युती सरकारच्या काळात 2019 मध्ये 1680 कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर झाली, तरी सहा वर्षांत या पाणी योजनेचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. या विषयावर विधानसभा अध्यक्ष असताना बागडे यांनी कधी तरी आपल्या दालनात बैठक बोलावली का? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
चंद्रकांत खैरे वीस वर्ष खासदार, दहा वर्ष आमदार
शिवसेने छत्रपती संभाजीनगरवर वर्चस्व मिळवल्यानंतर सर्वाधिक सत्ता चंद्रकांत खैरे यांनी उपभोगली. सलग चार टर्म खासदार, दोनवेळा आमदार आणि राज्यात मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेल्या खैरेंना लोक इतकी वर्ष तुम्ही काय केले? असा सवाल करत आहेत. महापालिकेतही खैरे यांच्याशिवाय पान हलत नव्हते, मग ते नागरिकांना पाणी का देऊ शकले नाहीत? असा प्रश्न विचारणे सहाजिकच आहे.
चंद्रकांत खैरे यांनी समांतर पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली. पण त्याला विरोध होऊन ती रद्द झाली तरी ते त्यातच अडकून पडले. खैरेंना या योजनेत एवढा रस होता, की तत्कालीन शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्यासह त्यांची योजनेत भागीदारी असल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला. शिवसेनेच्या खासदाराने केंद्रातून ही योजना मंजूर करून आणली, त्याच शिवसेनेचे महापौर असताना त्र्यंबक तुपे यांनी योजना बंद करण्याचा ठराव घेतला हे विशेष!
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.