MLA Prashant Bamb Sarkarnama
मराठवाडा

MLA Prashant Bamb News : चार टर्म आमदार असलेल्या प्रशांत बंब यांचा महापालिकेत सहा तास ठिय्या ; तरी प्रशासक जुमानेना!

Municipal Corporation does not provide information to MLA Prashant Bamb : दोन उपायुक्तांच्या दालनावर 77 लाख तर आयुक्तांच्या दालनावर 23 लाख रुपये निविदा न काढता खर्च करण्यात आल्याचा दावा बंब यांनी यावेळी केला.

Jagdish Pansare

छत्रपती संभाजीनगर : सत्ताधारी पक्षाचे चार टर्म आमदार असलेल्या भाजपचे प्रशांत बंब यांच्यावर आज महापालिकेतील गैरकारभाराची माहीती मिळवण्यासाठी सहा तास ठिय्या देण्याची वेळ आली. वैयक्तिक पत्र व्यवहार, माहिती अधिकार अर्ज देऊनही महापालिकेने त्यांना जुमानले नाही. अखेर माहिती मिळत नसल्याने (Prashant Bamb) आमदार प्रशांत बंब सहा तासांचा ठिय्या देऊन निघून गेले. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत आज हा प्रकार घडला.

जिल्हा परिषदेत काल भेट देत प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करणाऱ्या प्रशांत बंब यांनी आज आपला मोर्चा महापालिकेकडे वळवला होता. (Municipal Corporation) महापालिका प्रशासकांकडून दिलेल्या अधिकाराचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप करत बंब यांनी अनेक कामांची माहिती महापालिकेकडे मागितली होती. वारंवार पत्रव्यवहार, माहितीच्या अधिकारात अर्ज करून देखील एका लोकप्रतिनिधीला माहिती का पुरवली जात नाही? असा सवाल करत बंब यांनी आज थेट महापालिकेत धडक दिली.

अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात तब्बल सहा तास ठिय्या देत आमदार बंब यांनी मागितलेली माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, पण अखेर त्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागले. शहरातील नागरिकांना सोयी-सुविधांसाठी अडचणींचा सामना करावा लागत असताना महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त जी. श्रीकांत यांनी 67/3 (सी) या विशेष अधिकाराचा गैरवापर करून नियमबाह्य पद्धतीने कामे केल्याचा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी केला.

सहा महिन्यांपासून माहितीच्या अधिकारात माहिती दिली जात नसल्याचे सांगून त्यांनी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत महापालिकेत ठाण मांडले. त्यानंतरही त्यांना अपेक्षीत माहिती मिळू शकली नाही. महापालिकेत प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलताना बंब यांनी संताप व्यक्त केला. महापालिकेत विशेषतः प्रशासकीय कारभार सुरू झाल्यापासून अवस्ताव खर्च केला जात असल्याची माहिती मला मिळाली.

त्यानुसार मी माहिती अधिकारात माहिती मागितली, पण गेल्या सहा महिन्यांपासून प्रशासनातर्फे टाळाटाळ केली जात आहे. अधिकाऱ्यांना फोनवरून बोललो, पण त्यानंतरही माहिती मिळाली नसल्याने सकाळी महापालिकेत येऊन अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण ते माहिती जमा करत आहेत. महापालिका आयुक्तांना 67/3 (सी) नियमानुसार विशेष अधिकार आहेत. त्याचा गैरवापर करत आयुक्तांचे दालन, अतिरिक्त आयुक्तांच्या दोन दालनांचे नूतनीकरण करण्यात आले असून, माहिती अधिकारात माहिती मागूनही दिली जात नसल्याचा आरोप बंब यांनी केला.

दोन उपायुक्तांच्या दालनावर 77 लाख तर आयुक्तांच्या दालनावर 23 लाख रुपये निविदा न काढता खर्च करण्यात आल्याचा दावा बंब यांनी यावेळी केला. महापालिका प्रशासकांच्या बंगल्यावर लाखोंचा खर्च केला जात असल्याचे माहिती अधिकारातील कागदपत्र यावेळी बंब यांनी सादर केले. प्रत्येक महिन्याला दोन ते पाच लाखांपर्यंत बंगल्यासाठी साहित्य खरेदी केले जाते. त्यात बेबी सोप, टॉवेल, डिनरसेट, बेडसीट, ॲन्टीक फ्लोअर लॅम्प, डोअरमॅट यासह घरगुती साहित्य खरेदी करण्यात आल्याचे बंब यांनी सांगितले.

दरम्यान, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी आमदार बंब यांच्या आरोपावर स्पष्टीकरण दिले. आमदार महोदयांनी काय माहिती मागितली, याची मला माहिती नाही. त्यांनी दिलेला अर्ज माझ्यासमोर आलेला नाही. अनावश्यक काही खर्च केला असेल, तर चौकशी केली जाईल. दालनांच्या दुरुस्तीचा खर्च नियमानुसार केला असेल. तांत्रिक विभागाने याकामाचे इस्टिमेट केले, त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT