Uddhav-Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Shiv Sena UBT MP : ठाकरेंचा खासदारच म्हणतो, ईव्हीएममध्ये घोळ नाही; असता तर मी निवडून आलो असतो का?

Political News : सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीचे राज्यात महाविकास आघाडीने अक्षरशः पानीपत केले. 48 पैकी तब्बल 30 जागा आघाडीने जिंकल्या, तर युतीला 18 जागांवर समाधान मानावे लागले होते.

Jagdish Pansare

Shivsena UBT News : दोन वर्षापुर्वी देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने धक्कादायक निकाल दिले. सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीचे राज्यात महाविकास आघाडीने अक्षरशः पानीपत केले. 48 पैकी तब्बल 30 जागा आघाडीने जिंकल्या, तर युतीला 18 जागांवर समाधान मानावे लागले होते. मोदींच्या 'अब की बार चारसौ पार'ला यामुळे ब्रेक लागला होता. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत मात्र महायुतीने आघाडीची धूळधाण उडवली होती.

या पराभवानंतर प्रामुख्याने ईव्हीएम मशीनमध्ये घोळ, वोट चोरीचा आरोप विरोधकांकडून केला गेला. पण आता याच महाविकास आघाडीतील शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदाराने ईव्हीएम मशीनमध्ये घोळ नाही, असे ठणकावून सांगितले. धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा एका जाहीर सभेतील व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

धाराशीव जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. याच निवडणुकीच्या एका प्रचार सभेत ओमराजे निंबाळकर यांनी 'मशीनमध्ये घोळ नाही' असे बजावून सांगितले. मशीनमध्ये घोळ झाला का? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला तेव्हा समोरून हो, असे उत्तर देण्यात आले. यावर ओमराजे यांनी पुन्हा ईव्हीएम मशीनवर संशय घेऊ नका, त्यात घोळ झालेला नाही, याचा पुनरुच्चार केला.

मोदीसाहेबांसाठी लोकसभेची निवडणूक महत्वाची होती का नगरपंचायतीची? मग मशीनमध्ये घोळ करायचा असता, तर तो त्यांनी लोकसभेला केला नसता का? आणि जर तो केला असता, तर ओमराजे खासदार झाला असता का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थितांना केला. त्यामुळे मशीनमध्ये कोणत्याही प्रकारचा घोळ नसल्याचे ओमराजे यांनी ठामपणे सांगितले.

विशेष म्हणजे, महाविकास आघाडीतील काँग्रेस (Congress), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इतरांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांनीही वोट चोरी, ईव्हीएमवर संशय व्यक्त केला होता.

नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात बोगस मतदान, मतदार याद्यांमधील घोळ, ईव्हीएमवर बटन दाबले की मत भाजपलाच जात असल्याच्या तक्रारी आणि आरोप झाले. निवडणुक आयोग भाजपाच्या इशाऱ्यावर नाचतो, असेही बोलले गेले. विरोधक ईव्हीएममधील घोळ, वोट चोरीवर ठाम असताना उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या खासदारानेच मशीनमध्ये घोळ नसल्याचे ठामपणे सांगितल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT