

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार जोरात सुरू आहे.
एकनाथ शिंदे यांच्या कोकणातील सभांपूर्वीच शिंदे सेनेने बंडखोर परशुराम कदम यांची हकालपट्टी केली.
या कारवाईमुळे कोकणासह राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
Ratnagiri News : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी 7 तारखेला मतदान होणार असून 9 तारखेला निकाल लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राज्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार प्रचार केला जात आहे. जाहीर सभा घेतल्या जात आहेत. दरम्यान कोकणात एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभांच्या आधीच पक्षाने मोठी कारवाई करत पक्षातील नेत्याच्याच विरोधात उमेदवारी अर्ज भरणाऱ्या बंडखोर परशुराम कदम यांची थेट हकालपट्टी केली आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडखोर परशुराम कदम यांची थेट हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या या निर्णयामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून हातखंबा गटात शिंदे शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. याच मतदार संघात पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांचे घर आहे. दरम्यान होमपिचवरच त्यांना आव्हान निर्माण झाल्यानेच पक्षाने त्यांच्यावर अशी कारवाई केल्याची आता चर्चा सुरू आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हातखंबा गटात शिवसेनेकडून परशुराम कदम इच्छुक होते. त्यांनी तशी तयारी करताना मोर्चे बांधणी केली होती. त्यांना उमेदवारी देण्याचे आश्वासनही पक्षाकडून देण्यात आले होते. मात्र अंतिम उमेदवार यादीत त्यांचे नाव आले नाही.
पक्षाने त्यांचे त्यांना उमेदवारी नाकारत दुसऱ्याला उमेदवारी दिली. ज्यानंतर नाराज झालेल्या परशुराम कदम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. ते शिंदे यांच्या शिवसेनेचे युवा सेना कोकण विस्तारक म्हणून कार्यरत होते. पण आता शिवसेनेने कठोर भूमिका घेत कदम यांच्यांवर थेट पक्षातून हकालपट्टीची कारवाई केली आहे. ज्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. याबाबतचे अधिकृत पत्र शिंदे शिवसेनेकडून जारी करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे परशुराम कदम यांनी 30 ऑक्टोबर 2024 रोजी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्यावर शिवसेनेचे युवा सेना कोकण विस्तारक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. पण पक्षप्रवेशावेळी हातखंबा गटातून उमेदवारी देण्याचे आश्वासन देवूनही ते पाळण्यात न आल्याचा दावा कदम यांनी केला आहे.
1. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे मतदान कधी आहे?
७ तारखेला मतदान होणार असून ९ तारखेला निकाल जाहीर होणार आहेत.
2. शिंदे सेनेने कोणावर कारवाई केली आहे?
पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अर्ज भरणाऱ्या परशुराम कदम यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
3. ही कारवाई कधी करण्यात आली?
एकनाथ शिंदे यांच्या कोकणातील जाहीर सभांपूर्वीच ही कारवाई झाली.
4. या निर्णयाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
पक्षातील बंडखोरीवर आळा बसण्याची आणि प्रचार अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
5. सध्या राज्यातील राजकीय वातावरण कसे आहे?
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी आणि राजकीय तापमान दोन्ही वाढले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.