Sandeep Kshirsagar News  Sarkarnama
मराठवाडा

Sandeep Kshirsagar : "माझ्या घरावर हल्ला झालाय, कोणालाही सोडू नका, पण..."; संदीप क्षीरसागरांची नेतेमंडळींना विनंती

Nagpur Winter Session : "त्या दिवशी झालेला हल्ला हा हल्लेखोरांनी..."

Anand Surwase

Nagpur News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान 30 ऑक्टोबरला बीड शहर आणि जिल्ह्यात जाळपोळीच्या घटना घडल्या. त्यात माझ्यासह बीडमधील इतर राजकीय नेत्यांची घरे जाळण्यात आली. माझं संपू्र्ण कुटुंब घरात असताना माझ्या घराला आग लावण्यात आली. केवळ नेत्यांची घरेच नाही तर व्यापाऱ्यांचीही दुकाने त्यावेळी जाळण्यात आली. त्यामुळे या घटनेतील कोणत्याही आरोपीला सोडू नका, मात्र ही कारवाई करत असताना माझ्या घरावर झालेल्या हल्ल्याचे राजकीय भांडवल करू नका, अशी विनंती बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सर्वपक्षीय नेत्यांना केली आहे.

बीडमध्ये झालेल्या जाळपोळीच्या घटनेचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात वारंवार चर्चेत आला. या घटनेत राजकीय पक्षाची कार्यालये आणि लोकप्रतिनिधींचे घरे पेटवून देण्यात आली होती. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar), आमदार प्रकाश सोळंके, यांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी बहुतांश लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे.

तसेच या प्रकरणातील आरोपींचे राजकीय लागेबंध असल्याच्या प्रकरणावरूनही सभागृहात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या आहेत. त्यावरून अखेर आमदार संदीप क्षीरसागर यांनी त्या दिवशी नेमके काय घडलं, त्यामध्ये कोणाचा सहभाग होता. पोलिसांकडून कशाप्रकारे दुर्लक्ष करण्यात आले यासह अन्य काही गोष्टींकडे लक्ष वेधले.

घराच्या जाळपोळीच्या घटनेबाबत सांगत असताना आमदार क्षीरसागर म्हणाले की, त्या दिवशी झालेला हल्ला हा हल्लेखोरांनी सुनियोजितपणे हा हल्ला केला आहे. मी त्या दिवशी बीड शहरात नव्हतो. त्यावेळी हल्लेखोरांनी माझ्या घराची लाईट तोडली. पाण्याचे कनेक्शन तोडले. त्यावेळी माझ्या घरासमोर पोलिस गाडी उपस्थित होते. पण, हल्लेखोरांचा जमाव आल्यानंतर पोलिस तेथून निघून गेल्याचा आरोप आमदार क्षीरसागर यांनी केला. (Maratha Reservation)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यावेळी माझ्या मुलाने जमावाने घर पेटवल्याची माहिती देऊन घरी लवकर घरी येण्यास सांगितले. माझे घर जळत असताना कुटुंबातील सर्व सदस्य घरातच होते. ते कसेबसे बचावले असल्याचेही क्षीरसागर म्हणाले.

पोलिसांनी कारवाई केली नाही...

हे हल्लेखोर शहरात चालत फिरत होते. सात ते आठ हा प्रकार घडत होता. त्यावेळी पोलीस देखील त्यांच्यासोबत चालत होते. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. माझे घर पेटवल्यानंतर त्यांनी पुढे जयसिंगदादा सोळुंकेंचे घर जाळले, शिवाजीदादा कोंडिल यांच्या घरावर दगडफेक केली. त्यानंतर त्यांनी बस स्टँड आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हल्ला केला. त्यानंतर ते चेहरे धुवून निघून गेले. याचे सर्व सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहेत.

हे सर्व होत असताना पोलिसांनी त्यांना कुठेही अटकाव केला नाही. माझ्या घरासमोर पोलिस मुख्यालय आहे. मी बीड बाहेर असल्याने पोलिसांना फोन करून मदत मागण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांकडून कोणतीच मदत मिळाली नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच या हल्ल्यानंतर 7 ते 8 तासांत पोलिसांची कुमक का आली नाही, दुसऱ्या जिल्ह्यातून कुमक तिथे आली असती, मग पोलिसांना रोखण्याचे आदेश कोण दिले? असा सवालही आमदार क्षीरसागर यांनी केला. (Nagpur Winter Session)

मास्टरमाईंड कोण?

आमदार क्षीरसागर म्हणाले, हल्ले करणारे हे समन्वयक होते. मात्र हे ठरवून वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला करत होते. हा हल्ला पूर्वनियोजित होता. मग या मागचा मास्टरमाईंड कोण आहे हे शोधून काढणे, तसेच या प्रकरणाची मुळापर्यंत जाण्यासाठी न्यायालयीन चौकशी लावण्यात येईल का याची मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी सभागृहात केली.

" मराठा समाजाचा जाळीपोळीत सहभाग नाही..."

या जाळीपोळीच्या घटनेची माहिती देत असताना आमदार क्षीरसागर यांनी या घटनेमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलकांचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. यामध्ये जे कोणी हल्लेखोर होते, ते मराठा समाजाच्या विरोधात कारवाई करणारेच होते. त्यामुळे यामध्ये मराठा समाजाचा कसलाही हात नसून हे कृत्य जाणीवपूर्वक काही समाजकंटकांनी घडवून आणले आहे. त्यामुळे ज्यांचा यात सहभागही नाही अशा काही लोकांना अटक करण्यात आली आहे. त्या लोकांना सोडून द्यावे अशी मागणी आमदार क्षीरसागर यांनी केली आहे.(Beed News)

राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहणे गरजेचे...

दरम्यान, या प्रकरणी कारवाईची माहिती देत असताना गृहमंत्री फडणवीस म्हणाले की, यामध्ये जेजे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई ही होणारच! मग तो कोणत्या पक्षाचा किंवा जातीचा आहे, याचा विचार केला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाचे राजकारण न करता कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यावेळी आमदार संदीप क्षीरसागर यांनी फडणवीसांनी दिलेल्या उत्तरातील त्रुटी दाखवून देताना माझ्या घरावर हल्ला झाला आहे, जे दोशी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करा.. मात्र या घटनेचे राजकीय भांडवल करू नका अशी विनंती सभागृहात केली.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT