(भगवंत सुरवसे)
Naldurg News : नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीत विजयाने थोडक्यात हुलकावणी दिलेल्या सहा उमेदवारांची चर्चा जोरात सुरू आहे. त्याचबरोबर भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बसवराज धरणे, एमआयएमचे शहबाज काजी यांच्यामध्येही शेवटच्या फेरीपर्यंत अटीतटीचा सामना रंगला होता. त्याचीही चर्चा सध्या जोरात सुरु आहे. शेवटच्या फेरीपर्यंत या दोघांमधील लढतीची उत्सुकता ताणली गेली होती. शेवटच्या फेरीत बसवराज धरणे यांनी मताधिक्य कायम ठेवत 420 मतांनी विजय मिळवल्याने कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत आमदार राणाजगजितसिंह पाटील व युवा नेते सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाला नळदुर्गकरांनी पसंती दिल्याचे स्पष्ट झाले. इतिहासात पहिल्यांदाच भाजपचे 10 नगरसेवक व नगराध्यक्ष निवडून आले. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये दाखल झालेले अशोक जगदाळे यांना सत्तेपासून दूर ठेवत काँग्रेसचे नऊ नगरसेवक निवडून दिल्यामुळे जगदाळेंचे पक्षांतर नळदुर्गकरांना रूचले नसल्याचे अधोरेखित होत आहे. एमआयएम व काँग्रेसमधील मत विभाजनाचा मोठा फायदा भाजपला झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.
गेल्या निवडणुकीच्या मानाने काँग्रेसची एक जागा वाढली आहे. भाजपच्या दहा जागा व नगराध्यक्ष वाढले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बारा जागा व नगराध्यक्ष पदाचे नुकसान झाले. बहुतांशी प्रभागात क्रॉस मतदान झाल्यामुळे वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार निवडून येण्याचे प्रमाण हे धक्कादायक आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय बताले, एआयएमआयएमचे शहबाज काझी व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मेहबूब शेख यांनी नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदासाठीही अनुक्रमे प्रभाग क्रमांक 4,5 व 9 मधून नशीब अजमावले. मात्र ते दोन्ही ठिकाणी पराभूत झाले.
बारा नवे चेहरे नळदुर्ग पालिकेचा सभागृहात पहिल्यांदाच प्रवेश करणार आहेत. नितीन कासार, मंगल सुरवसे, मुनवर सुलताना कुरेशी, शहबाज काजी, मुस्ताक कुरेशी या माजी नगराध्यक्षासह कमलाकर चव्हाण, संजय बताले, सुमन जाधव, संगीता कांबळे या आजी-माजी नगरसेवकांचा पराभव झाला. शहरातून एक पत्रकार तानाजी जाधव व इंग्रजी शाळांचे संस्थाचालक मारुती खारवे विजयी झाले तर संजय बताले पराभूत झाले.
मराठा गल्ली येथील नगराध्यक्षाला विजयी लीड देणारे केंद्र ठरलेल्या 5/1 या बुथवर भाजपचे बसवराज धरणे यांना सर्वाधिक 225 मताची आघाडी मिळाली. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या रेखा जगदाळे यांना या बुथवर सर्वाधिक आघाडी घेत त्यांनी विजय मिळवला होता.
भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बसवराज धरणे यांना अनुक्रमे एक, तीन, चार व दहा या चार प्रभागात मताधिक्य तर प्रतिस्पर्धी शहबाज काझी यांना दोन, पाच, सहा, सात व नऊ या पाच प्रभागातून मताधिक्य मिळाले. मात्र काँग्रेसचे अशोक जगदाळे यांना फक्त प्रभाग आठमधून सर्वाधिक 132 मताची आघाडी मिळाली.
भाजपच्या मीनाक्षी काळे यांनी एकूण झालेल्या मताच्या 63 टक्के तर सर्वात कमी भाजपचे रिजवान काझी यांनी 25 टक्के मतदान घेतले. पुरुषांमध्ये काँग्रेसचे अब्दुल गफूर कुरेशी यांनी प्रभाग सातमधून 822 तर महिलांमधून काँग्रेसच्या जुलेखाबेगम इनामदार यांनी 798 हे सर्वाधिक मतदान घेतले. मात्र, नगराध्यक्ष पदासाठी मात्र या ठिकाणहून काँग्रेसचे अशोक जगदाळे यांना फक्त 359 मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसला एक ही जागा मिळाली नसली तरी 6, 7, 8 व 9 या प्रभागातील सहा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
राष्ट्रवादीच्या तैबा कादरी एक मताने, काँग्रेसचे दत्ता राठोड, मुशिराबी शेख व रेश्मा पवार या अनुक्रमे चार, पाच व आठ मतांनी, भाजपचे सुशांत भूमकर बारा मतांनी तर अपक्ष इलियास बेगम काझी यांना फक्त अठरा मताच्या फरकाने यशाला हुलकावणी दिली.
मतमोजणी प्रतिनिधींना फुटला घाम
नगरपालिका निवडणुकीत उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींचाही कस लागल्याचे मतमोजणी वेळी पहायला मिळाले. कारण सहा उमेदवारांमध्ये एक मतापासून ते अठरा मतांपर्यंतचे अंतर राहिल्यामुळे मतमोजणी प्रतिनिधींना आकडेमोड व बेरीज करताना अक्षरशः घाम फुटल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.