Ashok Chavan-Hemnat Patil News Sarkarnama
मराठवाडा

MLA Hemant Patil News : अशोकाचे झाड उंच, पण ना सावली, ना फळ! नांदेडला मंत्रीपद न मिळाल्यावरून आमदार हेमंत पाटलांचा टोला..

Nanded district does not have a ministerial post - MLA Hemant Patil targets Ashok Chavan : जिल्ह्याला मंत्रीपद न मिळण्यास अशोक चव्हाण हेच जबाबदार असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. पाटील यांनी अशोकाच्या झाडाचे उदाहरण दिल्यामुळे उपस्थितांना त्यांचा रोख कोणाकडे होता? हे लक्षात आलेच.

Jagdish Pansare

नांदेड : लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर महायुतीने विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये महायुतीला शंभर टक्के यश मिळाले. (Nanded) नांदेड जिल्ह्यातील सर्व नऊ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आले. मात्र मंत्रीमंडळ विस्तारात मात्र जिल्ह्याच्या वाट्याला एकही मंत्रीपद आले नाही.

कधीकाळी मंत्रीमंडळात कायम वर्चस्व राहिलेला नांदेड जिल्हा मंत्रीपदापासून वंचित राहिल्याची सल महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या शिवसेनेलाही आहे. हिंगोलीचे माजी खासदार आणि विधान परिषदेतील विद्यमान आमदार (Hemant Patil) हेमंत पाटील यांनी नेमकी ही सल पत्रकार दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात काल बोलून दाखवली.

काँग्रेसमध्ये असतांना राज्याचे मुख्यमंत्री पद भुषवलेले आणि आता भाजपचे खासदार असलेले अशोक चव्हाण यांच्याकडे त्यांचा रोख होता हे त्यांच्या एका उदाहरणावरून दिसून आले. कार्यक्रमास्थळासमोर असलेल्या एका अशोकाच्या झाडाकडे हेमंत पाटील यांचे भाषण करताना लक्ष गेले आणि त्यांनी अशोक चव्हाणांना लक्ष्य केले.

थेट अशोक चव्हाण यांचे नाव न घेता अशोकाचे झाड उंच, हिरवेगार असते. पण त्याला न फळ असते ना ते कोणाला सावली देऊ शकते. दुपारी बारा वाजले की ते स्वतःलाच सावली देते, असा टोला लगावत हेमंत पाटील यांनी जिल्ह्याला मंत्रीपद न मिळण्यास अशोक चव्हाण हेच जबाबदार असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.

पाटील यांनी अशोकाच्या झाडाचे उदाहरण दिल्यामुळे उपस्थितांना त्यांचा रोख कोणाकडे होता? हे लक्षात आलेच. हेमंत पाटील यांची हिंगोली लोकसभा मतदारसंघातील जाहीर झालेली उमेदवारी ऐनवेळी रद्द करावी लागली होती. पण यात महायुतीलाच फटका बसला आणि तिथे शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे नागेश पाटील आष्टीकर निवडून आले. तिकडे वाशिममध्ये राजश्री पाटील यांचाही पराभव झाला. त्यामुळे हेमंत पाटील यांचे राजकीय अस्तित्व संपते की काय? अशी चर्चा हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात सुरू झाली होती.

पण एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांची आधी हळद संशोधन केंद्राचे प्रमुख आणि त्यानंतर विधानपरिषदेवर निवड करत त्यांचे राजकीय पुनर्वसन केले. एवढेच नाही तर त्यांना पक्षाचे प्रतोदही केले. मात्र नांदेड जिल्ह्याला मंत्रीपद न मिळाल्याचे दुःख पाटील यांना सतावत आहे. अशोक चव्हाण यांच्यासारखा दिग्गज नेता असताना, सर्व नऊ आमदार महायुतीचे निवडून आलेले असतांना नांदेडला मंत्रीपद मिळू नये, याबद्दल पाटील यांनी नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT