Nanded News : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी नांदेड शहरात वसतीगृहात राहत असलेल्या एका 25 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. हा प्रकार शुक्रवारी दुपारी नांदेड येथील हडको परिसरात घडला. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात मृत विद्यार्थिनीच्या नातेवाइकांनी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ठिय्या मांडला होता. या विद्यार्थिनीची वसतीगृहाची आठ महिन्यापासूनची फीस थकल्याने वसतीगृहचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी मानसिक त्रास दिला होता. या सर्व त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली असल्याचा आरोप विद्यार्थिनीच्या नातेवाइकांनी केला आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. त्यानुसार ग्रामीण पोलिसानी राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला.
नांदेड शहरातील हडको येथील शामराव कदम होमिओपॅथिक महाविद्यालयातील द्वितीय वर्षात आकांक्षा मुंजाजी गायकवाड ही 25 वर्षीय विद्यार्थिनी शिक्षण घेत होती. या महाविद्यालयापासून काही अंतरावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार पक्षाचे प्रदेश चिटणीस जीवन घोगरे-पाटील यांचे निवासस्थान आहे. घोगरे-पाटील यांनी त्यांच्या मालकीच्या इमारतीत कॉट बेसिसवर वसतीगृह सुरू केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून शिक्षणानिमित्त आकांक्षा ही कॉट बेसिसवर याठिकाणी राहत होती. शुक्रवारी दुपारी ती वस्तीगृहाच्या खोलीत पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.
दरम्यान, या वसतीगृहात 40 हून अधिक मुली कॉट बेसेसवर राहतात. महिन्याला प्रत्येकी अडीच हजार रुपये वसतीगृह चालकाकडून घेतले जायचे. या वसतीगृहाला परवानगी नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जीवन घोगरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठाण मांडले होते. त्यानंतर पोलिसांकडून (Police) घोगरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
मृत आकांक्षाचे आई-वडील वीट भट्टीवर मजुरीचे काम करतात. गेल्या आठ महिन्यापासूनची वसतीगृहाची फीस थकल्याने वसतीगृहचालक तथा राष्ट्रवादीचे नेते जीवन घोगरे हे मानसिक त्रास देत होते, या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली," असा आरोप पीडित कुटुंबीयाने केला. त्यासोबतच पोलीस ठाण्याच्या परिसरताच त्यांनी ठाण मांडले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. दुसरीकडे मयत तरुणीच्या कुटुंबीयांनी वसतीगृहचालक तथा राष्ट्रवादीच्या नेत्यावर गंभीर आरोप केले. आठ महिन्यापासून फीस थकल्याने जीवन घोगरे यांच्याकडून आकांक्षाला मानसिक त्रास सुरु होता, त्यामुळे या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे.
दरम्यान, जीवन घोगरे-पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन वर्षापूर्वी उभी फूट पडल्यानंतर घोगरे पाटील हे अजित पवार यांच्या पक्षात गेले होते. अजित पवार यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी नांदेड महापालिकेचे विरोधी पक्ष नेतेपदही भूषवले आहे. त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.