Eknath Shinde Sarkarnama
मराठवाडा

Parbhnai-Hingoli MLC Election 2026 : शिंदेंच्या शिवसेनेकडूनही खान-बाण कालबाह्य, सईद खानच्या उमेदवारीने दिला नवा संदेश!

Parbhani Hingoli Election News : हिंदू वोट बँक कायम शिवसेनेच्या पाठीशी राहिली. पण तीन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना फुटली आणि 2024 मधील लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने मुस्लिमांबद्दल मवाळ भूमिका स्वीकारली.

Jagdish Pansare

Shivsena News : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेनेने सईद खान हा तरुण मुस्लिम चेहरा मैदानात उतरवला आहे. आतापर्यंत जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेने खान हवा की बाण? या जोरावरच यश संपादन केले होते. मुस्लिमविरोधी राजकारणाचा शिवसेनेला अनेक वर्ष लाभही झाला. हिंदू वोट बँक कायम शिवसेनेच्या पाठीशी राहिली. पण तीन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना फुटली आणि 2024 मधील लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने मुस्लिमांबद्दल मवाळ भूमिका स्वीकारली.

भाजपाला विरोध म्हणून मुस्लिम मतदारही बऱ्याच प्रमाणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमागे आला. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासह मराठवाड्यातील हिंगोली, धाराशीव, परभणी या तीन जिल्ह्यात ठाकरेंच्या पक्षाचे खासदार निवडून आले. यात मुस्लिम मतदारांचा वाटाही होता. मुस्लिम मतदार उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे वळू लागला हे लक्षात आल्यानतंर आता परभणी जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेनेही मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू केले होते.

माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या पाथरी आणि परभणी जिल्ह्यातील वर्चस्वाला आव्हान देणारा आश्वासक दुसरा मुस्लिम चेहरा शिंदेंच्या हाती लागला. सईद खान यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आणि परभणी जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेनेही बेरजेचे राजकारण केले. खान हवा की बाण? याला छेद देत त्यांनी सईद खान यांना ताकद दिली. त्याचा परिणाम पाथरी नगरपरिषदेतील सत्तांतरात झाला. 30-35 वर्षाच्या बाबाजानी दुर्राणी यांच्या नगरपरिषदेतील सत्तेला सईद खान यांनी सुरूंग लावला.

परभणी आणि पाथरीमध्ये सईद खान यांची लोकप्रियता वाढली. तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठीशी उभा राहिला. बाबाजानी दुर्राणी यांना आव्हान देत सईद खान यांनी जिल्ह्यात संघटना वाढीत मोठी झेप घेतली. परभणी महापालिकेत शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुस्लिम महापौर करत खळबळ उडवून दिली होती. यावरून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर तोंडसुख घेण्यात एकनाथ शिंदेंची शिवसेना आघाडीवर होती. परंतु सत्तेची समीकरण जुळवण्यासाठी आता शिंदेंच्या शिवसेनेनेही तोच मार्ग निवडल्याचे सईद खान यांच्या उमेदवारीवरून स्पष्ट होते.

तगडा उमेदवार..

शिवसेनेने परभणी-हिंगोलीची जागा आपल्याकडे राखत सईद खान यांच्यासारखा तगडा आणि मुस्लिम चेहरा दिला. विधान परिषदेची निवडणूक ही प्रचंड खर्चिक असते, त्यात सईद खान कुठेही कमी पडणार नाहीत. महायुती असली तरी पक्षांतर्गत नाराजीचा फटका सईद खान यांना बसू शकतो. मात्र ही भरपाई ते महाविकास आघाडीतील मतदान फोडून भरून काढू शकतात? परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र मित्र पक्षांची आकडेवारी जोडत भाजपने आम्हीच एक नंबर असल्याचा दावा करत जागा मागितली होती.

विधान परिषदेच्या सतरा पैकी कोणी कोणत्या जागा लढायच्या? या वाटाघाटीत महायुतीतील तीनही पक्षांना तडजोडी स्वीकाराव्या लागल्या. यात तडजोडीतून परभणी-हिंगोलीची जागा शिवसेनेने छत्रपती संभाजीनगर-जालन्याच्या जागेवर पाणी सोडत राखली. महाविकास आघाडीकडे या मतदारसंघात उमेदवार निवडून आणण्या इतके संख्या बळ नाही. शिवाय फोडाफोडी करण्याइतपत आर्थिक ताकदही या पक्षाकडे उरलेली नाही. अशावेळी सईद खान सारखा तगडा उमेदवार सहज निवडून येऊ शकतो, असे चित्र आहे.

सईद खान यांना पक्षातून उमेदवारीसाठी स्पर्धा होती. जालन्याचे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी अचनाक विप्लव बाजोरिया यांना असलेल्या विरोधाचा फायदा उचलण्यासाठी मुलगा अभिमन्यू खोतकर यांचे नाव पुढे रेटले होते. यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार यांची भेटही घेतली होती. सईद खान यांची दावेदारी भक्कम असताना त्यांना विरोध होईल असा खोतकरांचा अंदाज होता. परंतु एकनाथ शिंदे यांनी सईद खान यांच्या नावाला पसंती दिली. त्यामुळे मुलाला आमदार करण्याचे खोतकर यांचे स्वप्न भंगले.

बजोरियांचा बॅन्ड वाजला..

2018 मध्ये शिवसेनेने विदर्भातील विप्लव बाजोरिया यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. आर्थिक ताकदीच्या जोरावर ते निवडून आले. पण सहा वर्षात ते परभणी-हिंगोलीत फारसे फिरकले नाही. याचा फटका त्यांना यावेळी बसला. पक्षातून आणि महायुतीतील मित्रपक्षांकडूनच बाजोरिया यांना विरोध झाला. गोपीकिशन बाजोरिया यांनी पत्रकार परिषदेतून 130 कोटींची कामे केल्याचा दावा, मतदारांच्या संपर्कात असल्याचे सांगणे देखील कामाला आले नाही. बाहेरचा उमेदवार म्हणून बाजोरिया यांचे पार्सल परत पाठवण्याची पूर्ण तयारी यावेळी स्थानिक नेत्यांनी केली होती. त्यामुळे अखेर बाजोरिया यांचा बॅन्ड वाजलाच.

SCROLL FOR NEXT